Android app on Google Play

 

संग्रह १

 

१.

वैराळ सादवीतो,घ्या ग बायांनो काळाकिता

माझा राजवर्खीचा हेका होता

२.

गोंडाळ माझा हात बांगडी लागे थोडी

भरु राजवर्खी जोडी

फुटली बांगडी,नको करु हाळ्हाळ

म्होर गजरा देतो ढाळ

कापी बिलवर बारा आन्याला ल्याले चार

बयाच्या जीवावर आविंदी केल्या फार

५.

बाहीक बांगडीला देते रुपया इसाराला

बंधुजींचे नाव सांगते कासाराला

६.

हात भरुन बांगडया , गोठ पाटली कुठं ठेउं

बया माऊलीचा रंजीस केला जीउ

७.

वैराळान दिल पाल माझ्या वाड्याला टेकूनी

लेकीसुनांना देखूनी

८.

माग म्होर केरवा,मधी तारेच्या पाटल्या

बयाच्या जीवावरी मौजा करुशा वाटल्या

९.

माग म्होर केरवा मधी बिलवर चार चार

वयाच्या जीवावर मौजा केल्या फार फार

१०.

वैराळ सादवितो चुडे लेनार बाया किती

माझी मायबाई लेकीसुनाची नाव घेती

११.

वैराळ सादवितो ,आधी सादीव वरली आळी

लेकीसुनांनी भरली माळी.

१२.

वैराळदादा,तुझी पेटारी झाली रिती

मायबाई माझी लेकीसुनाची आली होती

१३.

लाडक्या लेकीन वैराळ अडावीला

राजवर्खी जोडीसाठी अंबुर वाढवीला

१४.

बारीक बांगडी नाव चमक - बिजली

हटाला आली मैना राती उपाशी निजली

१५.

बारीक बांगडी नात तिच नागमोडी

भरायासाठी जीव माझा झाला येडी

१६.

बारीक बांगडी गोर्‍या हाती झगझगा

दृष्ट व्हील घालूं नगा

१७.

बारीक बांगडी घारणी गाडीवर येते

कुना हौशाची लेक लेते

१८.

बारीक बांगडी रुपायाल चार

पुन्याला केली तार

१९.

वैराळ सादवीतो हिरव्या काचेचा बिलवर

मैना निजली जागी कर

२०.

वैराळदादा, भर बांगडी काळकिता

म्यां रंजिस केली माता