Get it on Google Play
Download on the App Store

अभंग १६ ते २०

१६.
देव खाते देव पीते । देवावरी मी निजतें ॥१॥
देव देते देव घेते । देवासवें व्यवहारिते ॥२॥
देव येथें देव तेथें । देवाणिणें नाहीं रीतें ॥३॥
जनी म्हणे विठाबाई । भरूनि उरलें अंतरबाही ॥४॥
१७.
श्रीमूर्ति असे बिंबली । तरी हे देहस्थिति पालटली ॥१॥
धन्य माझा इह जन्म । ह्रदयीं विठोबाचें नाम ॥२॥
तृष्णा आणि आशा । पळोन गेल्या दाही दिशा ॥३॥
नामा म्हणे जनी पाहें । द्वारीं विठ्ठल उभा आहे ॥४॥
१८.
जनी द्दष्टि पाहे ।  जिकडे तिकडे हरि आहे ॥१॥
मग म्हणे वो देवासी । तुमच्या नामयाची दासी ॥२॥
नामयाचा प्रसाद । झाला जनीला आनंद ॥३॥
१९.
झाली पूर्ण कृपा आहे । ऐसा पूर जो कां पाहे ॥१॥
ऐसा पूर जो कां पाहे । गुरुपुत्र तोचि होय ॥२॥
पूर्णपदीं जो स्थापिला । जनीं म्हणे धन्य झाला ॥३॥
२०.
नित्य हातानें वारावें । ह्रदय अंतरीं प्रेरित जावें ॥१॥
ऐसा स्वरूपाचा पूर । आला आसे नेत्नावर ॥२॥
स्वरूपाचा पूर आला । पाहातां डोळा झाकूळला ॥३॥
जनी म्हणे ऐसा पूर । पाहें तोचि रघुवीर ॥४॥