Get it on Google Play
Download on the App Store

अभंग १ ते ५

१.
सांवळी ते मूर्ति ह्रदयीं बिंबली । देहो बुद्धि पालटली माझी साची ॥१॥
धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव । ह्रदयीं पंढरिराव राहतसे ॥२॥
आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही । चिंता विठ्ठलचरणीं जडोनी ठेली ॥३॥
नामयाचे जनी विश्रांति पैं झाली । ह्रदयीं राहिली विठ्ठलमूर्ती ॥४॥
२.
वामसव्य दोहींकडे । देखूं कृष्णाचें रूपडें ॥१॥
आतां खाले पाहूं जरी । चहूंकडे दिसे हरी ॥२॥
चराचरी जें जें दिसे । तें तें अविद्याची नासे ॥३॥
माझें नाठवे मीपण । तेथें कैंचे दुजेपण ॥४॥
सर्वांठायीं पूर्ण कळा । दासी जनी पाहे डोळां ॥५॥
३.
धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनियां दोर ॥१॥
ह्रदय बंदिखाना केला । आंत विठ्ठल कोंडिला ॥२॥
शब्दें केली जडजुढी । विठ्ठल पायीं घातली बेडी ॥३॥
सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुलती आला ॥४॥
जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडीं मी तुला ॥५॥
४.
दळूं कांडूं खेळूं । सर्व पाप ताप जाळूं ॥१॥
सर्व जिवामध्यें पाहूं । एक आम्ही होउनी राहूं ॥२॥
जनी म्हणे ब्रम्हा होऊं । ऐसें सर्वांघटीं पाहूं ॥३॥
५.
चरण विठोबाचे देखिले । साही रिपु हारपले ॥१॥
नाहीं नाहीं म्हणती आम्ही । सांगसी त्या लागूं कामीं ॥२॥
नाहीं तरी जाऊं देशीं । जनी नामयाची दासी ॥३॥