Get it on Google Play
Download on the App Store

विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१५०

२१३३

भक्ताचिया काजा । उभा पंढरीचा राजा ॥१॥

घेऊनियां परिवार । उभा तिष्ठे निरंतर ॥२॥

शोभे गोपाळांची मांदी । रूक्मिणी सत्यभामा आदि ॥३॥

शोभे पुढें भीवरा नीर । भक्त करती जयजयकार ॥४॥

एका जनार्दनीं ध्यान । चिमणें रूप गोजिरें ठाण ॥५॥

२१३४

देव भुलला भावासी । सांडोनियां वैकुंठासी ॥१॥

उघडा आला पंढरपुरा । तो परात्पर सोइरा ॥२॥

पाहूनियां पुंडलिका । भुलला तयाच्या कौतुका ॥३॥

उभा राहिला विटेवरी । एका जनार्दनीं हरी ॥४॥

२१३५

भावाचेनी भक्ति थोर । भावें तुटे वेरझार ॥१॥

भावें अंकित देव भक्तांचा । वेदशास्त्रा बोले वाचा ॥२॥

भावें गुरुशिष्य दोन्हीं । भावयुक्त सर्व गुणीं ॥३॥

भावें जालें भक्तिपंथ । भावें पुरे मनोरथ ॥४॥

एका जनार्दनीं भाव । भावें दिसे देहीं देव ॥५॥

२१३६

भावाचिये बळे होऊनि लहान । आपुलें थोरपण विसरला ॥१॥

न म्हणे यातिकुळ तें सुशीळ । उत्तम चांडाळ हो कां कोण्ही ॥२॥

अट्टाहास्यें करितां नामाचा उच्चार । उतरी पैलपार भवनदीचा ॥३॥

एका जनार्दनीं भक्तांची आवडी । घालीतसे उडी वैकुंठाहुनी ॥४॥

२१३७

जीवभाव जेणें अर्पियला देवा । तयाची ते सेवा देव करी ॥१॥

न म्हणे नीच अथवा उंचपण । भावासी कारण मुख्य देवा ॥२॥

देव भावासाठीं लागे पाठोपाठीं । एका जनार्दनीं भेटी देतो देव ॥३॥

२१३८

चरणामृत देव स्वादला । वटपत्रीं तो बाळ जाला ॥१॥

अभिन्नव भक्ति नेली गोडी । चुरचुरा पावो चोखी आवडी ॥२॥

भक्तिरसाची लागली गोडी । तोंडीचा अंगुष्ठ बाहेर न काढी ॥३॥

एका जनार्दनीं सांगतों भावो । आपुली गोडी आपण घ्यावी ॥४॥

२१३९

एका भावासाठीं । देव धांवे उठाउठी ॥१॥

पोहे सुदामदेवाचे । भक्षी आवडीनें साचे ॥२॥

खाऊनियां भाजी पान । दिधलें भोजन ऋषींसी ॥३॥

आवडीनें कण्या खाय । प्रेम न समाय अंतरीं ॥४॥

गौळियांचें उच्छिष्ट खाये । एका जनार्दनीं धाये ॥५॥

२१४०

प्रेमें भक्तांची आवडी । म्हणोनियां धूतो घोडी ॥१॥

ऐसा प्रेमाचा भुकेला । सेवक जाहला बळीद्वारीं ॥२॥

उच्छिष्ट फळें भिल्लणींची । खायें सांची आवडीनें ॥३॥

एका जनार्दनीं उदार । तो हा सर्वेश्वर विटेवरी ॥४॥

२१४१

राम भावाचा भुकेला । सांडोनी दुर्योधनसदनाला ॥१॥

विदुर गृहाप्रति गेला । विश्रांति तेथें पावला ॥२॥

शबरींची फळें भक्षी । क्षीरनिधी शयन साक्षी ॥३॥

एका जनार्दनीं निश्चय ऐसा । देव भक्ताधीन सहसा ॥४॥

२१४२

जें वेदांसी नातुडे श्रुतींसी सांकडें । ते उभे वांडेंकांडें पंढरीये ॥१॥

न माये चराचरीं योगियांच्या ध्याना । तया म्हणती कान्हा नंदाचा जो ॥२॥

आगम निगम लाजोनी राहिले । तया बांधिती वहिलें उखळासी ॥३॥

काळाचा जो काळ भक्ता प्रतिपाळ । तया भेडविती बागुल आला म्हणोनी ॥४॥

बारा चौदा सोळा अठरा विवादती । तो गायी राखी प्रीती गोकुळांत ॥५॥

एका जनार्दनीं भक्तीचा भुकाळू । खाय तुळसीदळू भाविकांचें ॥६॥

२१४३

स्वामीसी तो पुरे एक भाव गांठीं । वाउगा श्रम नेहटी वायां जाय ॥१॥

भावासाठीं देव अंकित अंकिला । राहिला उगला बळीचे द्वारीं ॥२॥

अर्जुनाचे रथीं सारथीं होउनी । राहे मोक्षदानी भावासाठीं ॥३॥

विदुराचे घरीं आवडीनें भक्षी । कण्या साक्षेंपेसी खाती देव ॥४॥

पोहे सुदाम्याचे खाउनी तुष्टला । एका जनार्दनीं दिला सुवर्णगांव ॥५॥

२१४४

भावें घातली कास देव झाला दास । सोशी गर्भवास भाविकांचे ॥१॥

भावचि कारण भावचि कारण । यापरतें साधन आणिक नाहीं ॥२॥

भावाचेनि बळें जीवपणें वोवळें । मन हें सोंवळें ब्रह्मा साम्य ॥३॥

एका जनार्दनीं भावचि कारण । सच्चिदानंदावरी खूण दाविली ते ॥४॥

२१४५

भाव भजनातें निपजवी । भक्त देवातें उपजवी ॥१॥

आतां भजनीं देव केला । भक्त वडील देव धाकुला ॥२॥

सेवा करणें हा संकल्प । भक्त देवाचाही बाप ॥३॥

भक्ता कळवळा देवाचा । देव झाला त्या भक्तांचा ॥४॥

देव भक्तांचे पोटीं । झाला म्हणोनी आवड मोठी ॥५॥

एका जनार्दनीं नवलाव । कैसा भक्तचि झाला देव ॥६॥

२१४६

एका भावें कार्यसिद्धि । एका भावें तुटें उपाधी । एका भावें आधिव्याधी । जन्मजरा पाश तुटे ॥१॥

एक भावें करी भजन । एका भावें संतसेवन । एका भावें वेदवचन । पाळीतां तुटे भवपीडा ॥२॥

एका भावें योगयाग । एका भावें तप आष्टांग । एका भावें द्वैत तें सांग । तेथें द्वैत नको बापा ॥३॥

एका भावें रिघे शरण । एका भावें एक जनार्दन । एका भावें धरीं चरण । कायावाचामनेंशीं ॥४॥

२१४७

योगी रिगाले कपाटीं । हटयोगी साधिती आटी ॥१॥

परी तयांसी दुर्लभ । तो गोकुळीं जाहला सुलभ ॥२॥

यज्ञादिकीं अवदाना नये । तो गोपाळांचे उच्छिष्ट खाये ॥३॥

सदा ध्याती जपी तपी ज्यासी । तो नाचे कीर्तनीं उल्हासीं ॥४॥

एका जनार्दनीं प्रेमळ । भोळ्या भाविकां निर्मळ ॥५॥

२१४८

असोनी सबराभरी बाह्मा आणि अंतरीं । संपुष्टामाझारीं म्हणती देव ॥१॥

कल्पनेचा देव ऐसा जया भाव । तो न करी निर्वाहो आम्हा लागीं ॥२॥

सुक्षेत्रीं पुण्य अनुक्षेत्रीं पाप । न चले हा संताप कल्पनेचा ॥३॥

काशी हो पंढरी तीर्थयात्रा करी । सर्वत्र नरहरी तोचि भाव ॥४॥

एका जनार्दनीं सर्व सिद्धि असे । नाथिलेंचि पिसें मतवाद्या ॥५॥

२१४९

जो जया चित्तीं भाव । तैसा तैसा होय देव । येथें संदेही धरणें न लगे ॥१॥

द्रौपदी स्मरतां माधव । धांव घेतली लवलाहे । जया जैसा भाव । तैसा देव होतसे ॥२॥

अशोक वनीं सीता । शुद्धि जातां हनुमंता । भावेंचि तत्त्वतां । कार्यसिद्धि ॥३॥

समरांगणीं तो अर्जुन । मोहिलासे गोत्र देखोन । तेथेंचि जनार्दन । भावें गीता सांगे ॥४॥

ऐसा भावाचा लंपट । सांडोनी आलासे वैकुंठ । एका जनार्दनीं नीट । विटे उभा राहिला ॥५॥

२१५०

जैसा जैसा जया भाव । तैसा तैसा पावे देव ॥१॥

हा देव अनुभव पहा । देही पहा विदेहीं ॥२॥

शुद्ध करावें तें मन । जनीं पहा जनार्दन ॥३॥

एका जनार्दनीं भाव । देहीं वसतसें देव ॥४॥

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा

Shivam
Chapters
आत्मस्थिति - अभंग १९०१ ते १९२० आत्मस्थिति - अभंग १९२१ ते १९४० आत्मस्थिति - अभंग १९४१ ते १९६० आत्मस्थिति - अभंग १९६१ ते १९८० आत्मस्थिति - अभंग १९८१ ते २००० आत्मस्थिति - अभंग २००१ ते २०२० आत्मस्थिति - अभंग २०२१ ते २०४० आत्मस्थिति - अभंग २०४१ ते २०६० आत्मस्थिति - अभंग २०६१ ते २०८० आत्मस्थिति - अभंग २०८१ ते २१०० आत्मस्थिति - अभंग २१०१ ते २१२० आत्मस्थिति - अभंग २१२१ ते २१३२ विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१५० विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१५१ ते २१९९ भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२२० भक्तवत्सलता - अभंग २२२१ ते २२४० भक्तवत्सलता - अभंग २२४१ ते २२६४ श्रीकृष्ण - उद्धव प्रश्न - अभंग २२६५ ते २२७५ अद्वैत - अभंग २२७६ ते २३०० अद्वैत - अभंग २३०१ ते २३२० अद्वैत - अभंग २३२१ ते २३४० अद्वैत - अभंग २३४१ ते २३६० अद्वैत - अभंग २३६१ ते २३८० अद्वैत - अभंग २३८१ ते २४०० अद्वैत - अभंग २४०१ ते २४२० अद्वैत - अभंग २४२१ ते २४४० अद्वैत - अभंग २४४१ ते २४६० अद्वैत - अभंग २४६१ ते २४८० अद्वैत - अभंग २४८१ ते २५०० अद्वैत - अभंग २५०१ ते २५२० अद्वैत - अभंग २५२१ ते २५४० अद्वैत - अभंग २५४१ ते २५६६ स्थूल देह - अभंग २५६७ सुक्ष्म देह - अभंग २५६८ कारण देह - अभंग २५६९ महाकारण देह - अभंग २५७० नवविधा भक्ति - अभंग २५७१ ते २५७२ सार - अभंग २५७३