Get it on Google Play
Download on the App Store

आत्मस्थिति - अभंग २१०१ ते २१२०

२१०१

सांवळें कोंवळें ढवळें ना पिवळें । रंगरंगा वेगळें पढरींगे माये ॥१॥

चांदिणें जैसें शोभतें नभी । तैसा नट धरुनि नभी चंद्र गे माये ॥२॥

विटेवरी नीट जघनीं कर । उभा देखे परात्पर गे माये ॥३॥

एका जनार्दनीं पाहतां तयासी । मन चक्रोर तृप्त झालें गे माये ॥४॥

२१०२

सर्वांघटीं बिंबोनी ठेला । तो हा आला पंढरीये ॥१॥

सर्वांघटीं ज्यांची वस्ती । ते हीं मूर्ति विटेवरी ॥२॥

सर्वांठायीं भरूनि उरे । पंढरीये पुरे मापासी ॥३॥

जनार्दनाचा एका म्हणे । धन्य पेणें पंढरी ॥४॥

२१०३

त्रिपुटीविरहित कर कटीं उभा । त्रैलोक्याची शोभा शोभे गे माये ॥१॥

परे परता वैखरिये आरुता । पश्यंती निर्धारिता न कळें गे माये ॥२॥

मध्यमा मध्यमीं उभा तो स्वयंभ । अद्वयांनंद कोंभ कर्दळीचा गे माये ॥३॥

एका जनार्दनीं आहे तैसा भला । हृदयीं सामावाला माझ्या गे माये ॥४॥

२१०४

जिकडे जावें तिकडे देवाचि सांगातें । ऐसें केलें नाथें पंढरीच्या ॥१॥

शब्द तिथें झाला समूळचि वाव । गेला देहभाव हारपोनी ॥२॥

अंतरी बाहेरी एकमय जाहलें । अवघें कोंदटलें परब्रह्मा ॥३॥

एका जनार्दनीं ऐसी जाहली वृत्ती । वृत्तीची निवृत्ति चिदानंदीं ॥४॥

२१०५

व्यापक तें नाम अनंत ब्रह्माडीं । मना सोंस सांडीं कल्पनेचा ॥१॥

कल्पनाविरहित नाम तूंचि गाये । सर्व पाहे विठ्ठला पायीं ॥२॥

ठसावेल मूर्ति पाहतां अनुभव । पांचांचा मग ठाव कैंचा तेथें ॥३॥

एका जनार्दनीं संपुर्ण अवघा । भीमातीरीं थडवा उभा असे ॥४॥

२१०६

सर्व इंद्रियांचे पुरले कोड । नामवाड ऐकतां ॥१॥

हरुषें नाचतां वाळूवंटीं । गेलें कसवटीं पळूनी ॥२॥

पंचभूतें स्थिर झालीं । जीवशिवा एक चाली ॥३॥

एका जनार्दनीं मंगळ झाला । अवघा भेटला श्रीविठ्ठल ॥४॥

२१०७

तुमचे पायीं ठेवितां भाळ । पावलों सकळ अंतरीचें ॥१॥

आतां पुरली वासना । आठवितां तुमचे गुणा ॥२॥

जन्माचें सार्थक । पाहतां तुमचें श्रीमुख ॥३॥

शरण एका जनार्दनीं । धन्य नाम तुमचें वदनीं ॥४॥

२१०८

मार्ग सोपा पंढरीचा । सांपडला साचा उत्तम ॥१॥

नाहीं पुसायाचें काम । वाचें नाम मुखीं गाऊं ॥२॥

नाहीं कोठें आडकाठी । साधनकपाटीं पंचाग्र ॥३॥

नलगे योगयाग तप । वाचे जप विठ्ठल ॥४॥

त्रिअक्षराचें काम । एका निष्काम जनार्दनीं ॥५॥

२१०९

आलिंगोनी देवभक्त । सरते एकरुपी होत ॥१॥

तें हें पहा पंढरपूर । देव भक्त तीर्थ माहेर ॥२॥

आलियासी दान । नामामृताचि पान ॥३॥

जैसा ज्याचा हेत । पुरवित रुक्मिणीकांत ॥४॥

एका जनार्दनीं शरण । दाखवा पंढरी पावन ॥५॥

२११०

येथोनी आनंदु रे । कृपासागर तो गोविंदु रे ॥१॥

महाराजाचें राउळी । वाजे ब्रह्मानंद टाळी ॥२॥

आनंदले भक्तजन । म्हणे धन्य रघुनंदन ॥३॥

लक्ष्मी चतुर्भुज झाली । प्रसाद घेउनी बाहेर आली ॥४॥

एका जनार्दनीं नाम । पाहतां निवे आत्माराम ॥५॥

२१११

भक्तीच्या पोटा मुक्ति पैं आली । भक्तीनें मुक्तीतें वाढविलें ॥१॥

भक्ति ते माता भक्ति ते दुहिता । जाणोनि तत्त्वतां भजन करी ॥२॥

भक्ती सोडोनि मुक्ति वांछिती वेडी । गुळ सोडोनी कैसी जे गोडी ॥३॥

संतोषोनी भक्ति ज्यासी दे मुक्ति । तोचि लाभे येर व्यर्थ कां शिणती ॥४॥

एका जनार्दनीं एक भाव खरा । भक्ति मुक्ति दाटुनी आलिया घरा ॥५॥

२११२

भक्ति असो मुक्ति घाला रे बाहेरी । बहुतां चाळविलें चाळायाची थोरी ॥१॥

भक्ति ते राहो मुक्ति ते जावो । मुक्तिमाजीं भावो नाहीं नाहीं ॥२॥

मुक्ति चाळा लाउनी सेखीं वोसंडी । नेणें ऐसें किती केले पाषांडी ॥३॥

मुक्तिचेनी योगें नामदेव शुक । त्यांचाहीं विकल्प मानिताती लोक ॥४॥

नाम संकीर्तन भक्ति मुक्तीसी धाक । संवादें दोघेही राहो माझी भाक ॥५॥

उपजोनियां पोटी भक्ति ते ग्रासी । मातृहत्यारीं मुक्ति कवण पोसी ॥६॥

एका जनार्दनीं सेवितां चरणरज । मुक्ति सेवा करी सांडुनिया लाज ॥७॥

२११३

भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजीं ॥१॥

प्रेम सुख देई सुख देई । प्रेमेंविण नाहीं समाधान ॥२॥

रांगवेनें जेवीं शृंगारु केला । प्रेमेविण जाला ज्ञानी तैसा ॥३॥

एका जनार्दनीं प्रेम अति गोड । अनुभवीं सुरवाड जाणतील ॥४॥

२११४

तुझिया चरणीं अनुपम्य सुख । हें तो अलोलिक रमा जाणे ॥१॥

जाणती ते भक्त प्रेमळ सज्जन । अभाविक दुर्जन तयां न कळे ॥२॥

भक्तियुक्त ज्ञान तेथें घडे भजन । वायां मग शीण जाणीवेचा ॥३॥

एका जनार्दनीं वाउगे ते बोल । भक्तीविण फोल नावडती ॥४॥

२११५

नवल दावियेलें सोंग । अवघा एकक पांडुरंग ॥१॥

हें तों आलें अनुभवा । विठ्ठल देवा पाहतांची ॥२॥

मन पवनांची धारणा । तुटली वासना विषयाची ॥३॥

एका जनार्दनीं परिपुर्ण । एका एकपण देखतां ॥४॥

२११६

सोळा सहस्त्र गोपी भोगुनी बह्माचारी । ऐशी अगाध कीर्ति तुमची श्रीहरी ॥१॥

दीन आम्ही रंक वंदितों चरणा । सांभाळीं दीनांलागीं मानसमोहना ॥२॥

एका जनार्दनीं धन्य धन्य लाघव । एकरुपें असोनी दिसों नेदी कैसें वैभव ॥३॥

२११७

अकळ अनुपम्य तुझी लीला । न कळे अकळा सर्वासी ॥१॥

वेदशास्त्रां न कळे पार । षडनिर्विकार दर्शनें ॥२॥

जों जों धरुं जावा संग । तों तों विरंग उपाधी ॥३॥

शरण एका जनार्दनीं । रंकाहुनी मी रंक ॥४॥

२११८

ऐक्य तें जालिया मीतूंपण नाहीं । गौरव हा कांहीं नाहीं नामीं ॥१॥

नाहीं चतुर्दल तुर्याही उन्मनीं । स्वयंभ ती खाणी उभी उसे ॥२॥

चित्त जडलिया तेथें काय उणें । लज्जित साधनें होतीं देखा ॥३॥

एका जनार्दनीं नाहीं मीतूंपण । व्यापक तें जाण सर्वांठायीं ॥४॥

२११९

खंडन मुंडन दंडन करुनी घ्यती रुप । तें आम्हां सोपें झालें वर्णितां चिद्रुप ॥१॥

तो देखिला वो देखिला वो । पहाता पहाणें विसरुन गेलें ठक पडलें सकळां वो ॥२॥

नेति नेति शब्द भुलल्या वेडावल्या श्रुति । आगमनिगमां न कळे चोज चिंत्तीं ॥३॥

एका जनार्दनीं सकळ ब्रह्मा शोभा । अनुपम्य उभा कर्दळीचा गाभा ॥४॥

२१२०

कळा ते कुसरी नव्हे हें शाब्दिक । अणुरेणु एक भरुनी उरला ॥१॥

तोचि डोळाभरी पहा श्रीहरीं । परेपरता दुरी ठसावला ॥२॥

एका जनार्दनीं शब्दवेगळा असे । तो उभा दिसें कीर्तनरंगीं ॥३॥

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा

Shivam
Chapters
आत्मस्थिति - अभंग १९०१ ते १९२० आत्मस्थिति - अभंग १९२१ ते १९४० आत्मस्थिति - अभंग १९४१ ते १९६० आत्मस्थिति - अभंग १९६१ ते १९८० आत्मस्थिति - अभंग १९८१ ते २००० आत्मस्थिति - अभंग २००१ ते २०२० आत्मस्थिति - अभंग २०२१ ते २०४० आत्मस्थिति - अभंग २०४१ ते २०६० आत्मस्थिति - अभंग २०६१ ते २०८० आत्मस्थिति - अभंग २०८१ ते २१०० आत्मस्थिति - अभंग २१०१ ते २१२० आत्मस्थिति - अभंग २१२१ ते २१३२ विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१५० विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१५१ ते २१९९ भक्तवत्सलता - अभंग २२०० ते २२२० भक्तवत्सलता - अभंग २२२१ ते २२४० भक्तवत्सलता - अभंग २२४१ ते २२६४ श्रीकृष्ण - उद्धव प्रश्न - अभंग २२६५ ते २२७५ अद्वैत - अभंग २२७६ ते २३०० अद्वैत - अभंग २३०१ ते २३२० अद्वैत - अभंग २३२१ ते २३४० अद्वैत - अभंग २३४१ ते २३६० अद्वैत - अभंग २३६१ ते २३८० अद्वैत - अभंग २३८१ ते २४०० अद्वैत - अभंग २४०१ ते २४२० अद्वैत - अभंग २४२१ ते २४४० अद्वैत - अभंग २४४१ ते २४६० अद्वैत - अभंग २४६१ ते २४८० अद्वैत - अभंग २४८१ ते २५०० अद्वैत - अभंग २५०१ ते २५२० अद्वैत - अभंग २५२१ ते २५४० अद्वैत - अभंग २५४१ ते २५६६ स्थूल देह - अभंग २५६७ सुक्ष्म देह - अभंग २५६८ कारण देह - अभंग २५६९ महाकारण देह - अभंग २५७० नवविधा भक्ति - अभंग २५७१ ते २५७२ सार - अभंग २५७३