Android app on Google Play

 

६) जलजीवांचे आक्रमण

 

पावसाच्या थेंबापासून तयार होणार्‍या त्या स्त्रीचा चेहेरा तयार झालयानंतर मानेपासूनचा खालचा भाग हळूहळू तयार होत होता. मग त्या स्त्रीची पूर्ण आकृती तयार झाली.

एक अद्भुत सुंदर स्त्री. यापेक्षा सुंदर स्त्री या भूतालावर असूच शकत नाही, असे वाटण्याइतकी सुंदर आकृती तेथे तयार होत होती.

तीचे डोळे अजूनपर्यंत बंद होते. ती पाठमोरी होती. तीने डोळे उघडले आणि अमेयकडे बघितले.

तीच् ती! त्या दिवशी भेटलेली.

अमेय उठून उभा राहीला आणि त्या अद्भुत दृश्याकडे पाहू लागला. डोळ्याची पापणी न लवता तो समोर बघत होता.

त्याला आठवले :

"
मागच्या वेळेस ती स्त्री त्याला जेव्हा प्रथम भेटली होती तेव्हा ते दोघे एकमेकांच्या बाहुपाशात असताना काही वेळ त्याला कसा गेला ते कळलेच नाही, जवळपास एखाद्या संमोहनासारख्या अवस्थेत तो होता आणि त्या अवस्थेतून बाहेर आल्यानंतर नंतर पाण्याने पूर्ण ओला झालेला होता आणि ती मात्र तेथे नव्हती"

अ‍ॅनाचा कॉल आल्याने वा़जणारा मोबाईल उत्तर न मिळाल्याने थोड्यावेळाने वाजणे बंद झाला.

एव्हाना ते तळ्यातले वर डोके काढणारे बुडबुडे जास्त वेळा वर खाली व्हायला लागले, ते आता पूर्ण वर आले आणि पाण्यात पूर्ण उभे राहीले होते आणि आता तळ्यातल्या अंधारात उभे होते सात पाणी-सदृश्य मानव!

चमकणारे डोळे असणार्‍या पाणीयुक्त मानवाकृती. ते सात पाणी-मानव होते किंवा जलजीवा. ते सातही जलजीवा एकमेकांकडे पाहून हसत होते. मग ते त्या स्त्रीकडे पाहून ओळखीचे हसले.

एक जलजीवा म्हणाला: "मागच्या वेळेस आपण चुकलो आता चुकणार नाही."

दुसरा जलजीवा म्हणाला: "इथपर्यंत येणे काही साधी गोष्ट नाही. किती वर्षे निघून गेलीत, तेव्हा आपण येथेपर्यंत आणि या साध्यापर्यंत पोचलो आहोत. पण आपल्यासाठी काळ, वेळ गौण आहे. काळ-वेळाच्या सीमारेषेंचे बंधन आपण कधीच तोडले आहे.

आता लवकरच आपल्याला विविध ठीकाणी सावजांच्या शोधात जायचे आहे. आपण निवडलेले ते अनेक सावज."

तिसरा जलजीवा म्हणाला: "आता वेळ आली आहे. सगळ्या दुनियेला आता कळेल लवकरच. आम्ही कोण आहोत ते!"

ते जलजीवा एकमेकांशी बोलू लागले. नमातुआ जोराजोरात किलकिल करू लागला. तेथे मग पाच सहा नामातुआ पक्षी आले. त्या जलजीवांनी त्या पक्ष्यांवर हल्ला चढवला. तळ्यातले पाणी स्वयंस्फूर्तीने तळ्यातून वर जावून त्या पक्ष्यांच्या अवती भवती घोंगावू लागले.

त्त्या पक्ष्यांच्या नाकातोंडात घुसू लागले. ते पक्षी जीवाच्या आकांताने ओरडू लागले आणि तेथून पळून गेले.

एक जंगल. मध्यवर्ती ठिकाणातले तळे. संध्याकाळ. पाऊस पडतोय. अंधारलेल्या त्या तळ्यात उद्भवलेले सात जलजीवा आणि एक स्त्री जलजीवा.

त्यांच्या मधोमध सापडलेला अमेय.


मागच्या वेळेस तो आला होता तेव्हा फक्त तीच तेथे होती. ते तळयातले सातजण तो प्रथमच पाहात होता.

ती स्त्री-जलजीवा त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देत होती. अमेय ला हे दृश्य पाहून भोवळ आली. भोवळ येता येता त्याने एक नांव त्या सगळ्या जलजीवांच्या तोंडून पुसटसे ऐकले. ते नांव त्याने या आधी नक्की ऐकले होते असे त्याला वाटत होते.. पण काही समजण्याच्या आतच तो कोसळला.

पण अंगात त्राण होते. तो उठून पळायला लागला. ते तळ्यातले पाणी जलजीवांच्या रुपाने आपोआप वर उडाले आणि अमेयच्या मागे मागे येवू लागले.

ते पाणी अमेयच्या शरीराला वेढा घालू लागले. तो जीवाच्या आकांताने पळू लागला. पाणी पायापासून त्याच्या शरीराला वेढा घालत घालत कमरेपर्यंत येत होते.