ट्रम्प चा विजय : नेहमीच्या राजकारण्यांच्या पेकाटात लाथ
मी स्वतः मिल्टन फ्रीडमन किंवा हायेक ह्यांच्या पठडीतील लिबरटेरिअन असल्याने ट्रम्प किंवा हिलरी दोघां पैकी कुणीही मला आवडत नाही. पण वास्तवांत दोघां पैकी एक कुणीतरी प्रेसिडेंट होणार असल्याने ट्रम्प निवडून यावा हीच अपेक्षा होती.
निवडणुकी आधी :
प्रचाराच्या रणधुमाळीत ट्रम्प म्हणजे साक्षात राक्षस आहे अश्या प्रकारची इमेज हिलरींच्या कंपूने केली होती. त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी सुद्धा ठरले होते. ट्रम्प समर्थकांचे बऱ्यापैकी सोशल बुलिन्ग सुद्धा केले जात होत होते. अनेक विद्यार्थी ज्यांना ट्रम्प आवडत होता ते स्पष्ट पाने बोलायला सुद्धा भीत होते.
ट्रम्प च्या कंपूने हिलरी ह्यांना खोटारडी, भ्रष्टाचारी, वृद्ध, थकलेली आणि नालायक अश्या पद्धतीने चित्रित करण्याचे ठरवले होते. ह्यांतील सर्व विशेषणे बहुतेक करून सर्वच लोकांना ठाऊक होती. ट्रम्प ह्यांनी हिलरी विरुद्ध नवीन असे काही आणले नाही तरी विकिलिक्स आणि FBI चे कोमी ह्यांनी वेळोवेळी केलेले खुलासे ह्यामुळे हिलरी ह्यांची प्रतिमा अनेक अनिश्चित वोटर्स मध्ये डागाळली गेली.
मीडिया:
अमेरिकन मीडिया मध्ये दोन गट आहेत. एक आहे फॉक्स चॅनल जो एकमेव उजवा चॅनेल आहे. दुसऱ्या बाजूने आहेत CNN, ABC, NBC इत्यादी हे सर्व डावे आहेत. पण मार्केट शेयर जर पहिला तर फॉक्स इतर सर्व चॅनल पेक्षा जास्त दर्शक खेचतो (combined).
पण डाव्या चॅनल्स ची लोकप्रियता तरुण मुलां मध्ये जास्त असल्याने इंटरनेटवर इत्यादी डावा प्रचारच जास्त दिसून येतो. म्हणून कुठल्याही विषयवार मीडियाचे मत मी थोडे मिनिट लावूनच घेते.
फॉक्स वर वैचारिक विविधता फार जास्त आहे. स्टोसेल, जज नेपोलितांनो, केनेडी इत्यादी मंडळी libertarian असून republican लोकांवर टीका करताना आढळून येतात. बिल ओरिएली (अमेरिकेतील सर्वाधिक पहिला जाणारा शो) हा फारच उजव्या बाजूचा पत्रकार आहे.
फॉक्स वरील सर्वच अँकर मंडळी पत्रकार नाहीत. बिल ओरिएली पत्रकार आहे पण द्वितीय नंबरची अँकर केली पेशाने वकील होती. जज नेपोलितांनो जज होते. केनेडी रेडिओ आणि रॉक शो ची होस्ट होती. हेनिटी, ब्रेट, इत्यादी मंडळी मात्र आधी पासून पत्रकार होती. ब्रेट हे अमेरिकेतील सर्वाधिक विश्वासू न्यूज अँकर मानले जातात. ओबामा हे जाणूनबुजून फॉक्स न्यूस बद्दल भेदभाव ठेवून आहेत असा एक खुलासा मध्ये झाला. त्यातील इमेल जे लीक झाले होते तिथे ओबामांच्या सहाय्यकांनी ब्रेट ह्यांना "lunatic" अश्या शब्दांत संबोधिले होते.
अमेरिकेतील ९६% पत्रकार लिबरल्स आहेत. जॉन स्टीवर्ट हे १ क्रमांकाचे डावे अँकर (daily शो) आहेत (पण trp मध्ये बिल ओरेली च्या जवळपास सुद्धा येत नाहीत). स्टीवर्ट हे बहुतेक वेळा डावी बाजू घेत असले तरी कुठल्याही राजकारण्यांच्या ते खिशांत आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल. ओबामा ह्यांची खिल्ली सुद्धा त्यांनी उडवली आहे .
अमेरिकेतील द्वितीय क्रमांकाचे पत्रकार म्हणजे स्तंभ लेखक, अर्थशात्राचे नोबेल विजेते, आपल्या भगवती ह्यांचे विद्यार्थी श्री पॉल क्रुगमन. मी डाव्या विचारसरणीची नसले तरी डाव्या विचारवंतांशी सहानभूती ठेवते. पण क्रुगमन म्हणजे अमेरिकन मणी शंकर एयर ! ह्यांचे नोबेल विजेते काम होते ते prodigy ह्या दर्जाचे होते. जवळ जवळ सर्वच लोकांनी ह्यांची तोंड भरून स्तुती केली होती. पण लगान करणाऱ्या गोवारीकरानी "व्हाट्स युअर राशी" सारखा भिकार दर्जाचा चित्रपट काढावा तसे काही तरी ह्या माणसाचे झाले आहे. खूप वर्षा आधी "इंटरनेट म्हणजे श्रीमंतांचे थेर आहे, ते काही वर्षांत बंद पडेल" असे भाकीत वर्तवले होते. ह्या शिवाय २००२ मॉर्टगेज बबल येणार असे भाकीत जे वर्तवत होते त्यांची जाहीर खिल्ली ह्यांनी उडवली होती. थोडक्यांत मागील १० वर्षांत सर्वच विषयावरील ह्यांची भाकिते १००% चुकीची ठरली आहेत.
डाव्या मीडिया कडे एक शस्त्र आहे जे उजव्या फॉक्स कडे नाही. ते म्हणजे विनोदी लोक. अमेरिकी अनेक कॉमेडी शो आहेत. हे जवळ जवळ १००% डावे आहेत. जॉन ऑलिव्हर, एमी अॅडम्स पासून ट्रेव्हर पर्यंत जवळ जवळ १००% लोक सतत उजव्या लोकांची खिल्ली उडवत असतात. ह्यांचे व्हिडीओ कितीही चुकीचे असले तर सतत वायरल होत असतात.
लिबेरटेरिअन लोक कमी असले तरी (४% मते) फॉक्स त्यांना भरपूर वेळ देतो. स्टसेल शो अतिशय प्रसिद्ध असून जॉन स्टोस्सेल उसाचं दर्जाचे लिबरटेरिअन मानले जातात. स्टोसेल आधी पूर्ण डावे होते आणि ABC मध्ये कामाला होते. हळू हळू त्यांचे मत बदलले आणि ABC नि त्यांना हाकलले. संपूर्ण अमेरिकन मीडियात बॅलन्सड आणि शांत पणे चालणारा शो म्हणून मी स्टोसेल ला निवडेन.
राजकीय विषय :
अमेरिकेत राजकारण त्यामाने फार पारदर्शी आहे. आपल्या इकडच्या प्रमाणे आम्ही सर्वासाठी आहोत असा आव आणण्याची कुठलीही गरज अमेरिकेत नाही. मिल्टन फ्रीडमन ह्यांनी एकदा सांगितल्या प्रमाणे. अमेरिकेत ५१% मतांना टारगेट करून जिंकावे लागत नाही. आपण ३% लोकांना टार्गेट करावे ज्यांच्या साठी १ कुठला तरी मुद्धा महत्वाचा आहे आणि इतर मुद्यावर आपण काय भूमिका घेता ह्यांच्याशी त्यांना देणे घेणे नाही. नंतर दुसरा एखादा मुद्दा घेऊन आणखीन ३% लोक मिळवावे अन आणि अश्या पद्धतीने ५१% मते मिळविण्याचा प्रयन्त करावा. ह्यामुळे सर्वच राजकारणी लोकांना टोकाची आणि स्पष्ट भूमिका घ्यावी लागते. (भारतांत चारित्र्य हा एक मुद्दा सोडला तर काँग्रेस आणि भाजपा मध्ये फरक काय आहे हे समाजाने मुश्किल होते).
ह्यामुळे गे लोक फक्त ५% असले तरी राजकीय पटलावर ५% हा आकडा फार मोठा एकदा आहे. NRA आणि बंदूक प्रेमी (माझ्या प्रमाणे) सुमारे ८% असले तरी हि एक प्रचंड वोट बॅंक आहे. शेतकरी मंडळी सुमारे २% आहे. कट्टर ख्रिस्ती, ऑइल लॉबी, सिंगल माता, इत्यादी इत्यादी अनेक १-२% वाले वोट बॅंक आहेत जे आकड्यांनी कमी असले तरी राजकीय पटलावर खूप वेळ खातात.
ह्यातील काही गट कुणाला मत देणार हे १००% स्पष्ट असते. NRA रिपब्लिकन लोकांना सपोर्ट करते तर सरकारी मदतीवर जगणारे (सिंगल मदर) इत्यादी डेमोक्रेट्स ना सपोर्ट करतात.
ह्या निवडणुकीतील काही प्रमुख विषय पाहू. लिबरटेरिअन दृष्टिकोनातून मी माझे वैयक्तिक मत सुद्धा व्यक्त केले आहे.
१. ओबामाकेर
ओबामांच्या नवीन कायद्याप्रमाणे (जो १० हजार पानाचा होता) प्रत्येक अमेरिकन
माणसाला इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे. ज्याला परवडत नसेल तो माणूस सरकारी
मान्यताप्राप्त इन्शुरन्स सरकारी पैशाने घेऊ शकेल. ह्याशिवाय इतर अनेक जाचक
अटी सामान्य लोक, इन्शुरन्स कंपनी आणि धंद्यावर टाकल्या गेल्या आहेत.
ट्रम्प : हा कायदा संपूर्ण पणे रद्दबातल करू.
हिलरी : आणखीन वाढवू.
कायदा पूर्णपणे फेल ठरला आहे हे जवळ जवळ सर्वच लोक मान्य करतात. उजव्यांच्या मते कायदा मुळातंच चुकीचा आहे. डाव्यांच्या मते आणखीन खर्च करून कायदा आणखीन वाढवायला पाहिजे.
लोकांना कुठलीही वस्तू विकत घेण्यास जबरदस्ती करणे हे मला मान्य नाही. अमेरिकेतील आरोग्यव्यवस्था इन्शुरन्स बेस्ड होण्यास सरकारी गोंधळ कारणीभूत आहे. इन्शुरन्स जबरदस्तीने घ्यायला लावणे म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखे आहे. आरोग्य व्यवस्था स्वस्त व्हायला पाहिजे तर सरकारी हस्तक्षेप कमी व्हायला पाहिजे. माझ्या मते खालील तीन गोष्टी अमेरिकेतील आरोग्यव्यवस्था स्वस्त करू शकतात
१. अमेरिकेत दर वर्षी किती लोक डॉक्टर होऊ शकतात ह्यावर सरकारी नियंत्रण आहे. हे नियंत्रण काढून टाकले पाहिजे आणि अभियांत्रिकी प्रमाणे विदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घेणे सोपे बनवले पाहिजे.
२. FDA च्या जाचक अटी एक तर काढून टाकल्या पाहिजेत किंवा शिथिल तरी केल्या पाहिजेत. बिल गेट्स आणि माझ्या आरोग्य विषयक गरजा वेगळ्या आहेत. दोघांनाही एकाच प्रकारची सेवा द्यावी असे बंधन हॉस्पिटल वर टाकले तर मला जास्त पैसे मोजावे लागतात. डॉक्टर मंडीळीना अवास्तव कोर्ट केसेस पासून थोडे तरी संरक्षण मिळणे आवश्यक आहे.
सरकारी कायद्याने कुठल्याही सेवेवर जर एक quality floor ठेवला तर त्याच प्रमाणे त्याच्या किमती वर सुद्धा एक "floor" येईल हे बेसिक अर्थशास्त्र आहे.
२. फ्री कॉलेज शिक्षण
ट्रम्प : फेडरल सरकारने उच्च शिक्षणापासून दूर राहावे.
हिलरी : ट्युशन फ्री (सरकार मुलांना ट्युशन फी देईल)
ह्या बाबतीत मी ट्रम्प बरोबर १००% सहमत आहे. मुळांतच सध्या कॉलेज फी जी वाढली आहे त्याला फेडरल सरकार कारणीभूत आहे. डाव्या विचारसरणीने विनाकारण उच्च शिक्षणात गोंधळ घातला आहे त्यामुळे फी भरमसाठ वाढली आहेच पण पढत मूर्खांची गर्दी सुद्धा वाढली आहे.
सध्या सरकारी नियमा प्रमाणे कुठल्याही बँकेला विद्यार्थ्यांना
उच्चशिक्षणासाठी लोन देणे बंधनकारक आहे. ह्या लोन मधून दिवाळखोरी जाहीर
करून सुद्धा आपण मुक्त होऊ शकत नाही. ह्यामुळे फक्त हा पैसा लाटण्यासाठी
अनेक कॉलेजस ची स्पर्धा लागली आहे. जी मुले कॉलेज शिक्षणासाठी लायक नाहीत
ती सुद्धा भूलथापांना बळी पडून फालतू आणि महागडे शिक्षण घेतात आणि नंतर
पुन्हा सरकारच्या नावाने बोंब करतात. (लोन माफ करावे इत्यादी).
http://www.learnliberty.org/videos/why-is-higher-education-so-expensive/
सरकारने ह्यांतून माघार घेतल्यास किमान मुले फायदा नसलेले शिक्षण घेणार नाहीत.
३. बंदुका
ट्रम्प : १००% इन फेवर
हिलरी : १००% विरुद्ध
मी स्वतः सर्व नागरीकानी नेहमी सशस्त्र असावे आणि गरज पडेल तेंव्हा आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी शस्त्रे बिनधास्त वापरावी ह्या विचाराची आहे. समाज निशस्त्र झाला कि सरकारी पोलीस आणि दंडेली दाखवणार्या गुंडांचा गुलाम बनतो असे माझे मत आहे.
सरकारी गुप्त "संशयास्पद अतिरेकी" लिस्ट वर असलेल्या लोकांना शस्त्रे विकत घ्यायला मिळू नयेत असे ट्रम्प ह्याचे म्हणणे आहे. मला ते मान्य नाही.
४. LGBTQ
ट्रम्प : कदाचित ह्या विषयावरील सर्वांत मवाळ धोरण असलेला रिपब्लिकन
हिलरी : स्वतःला ह्या लोकांची तारणहार मानते
माझ्या मताने येत्या २० वर्षांत LGBTQ हि वोटबँक नाहीशी होणार. बहुतेक लोक आणि अगदी कट्टर ख्रिस्ती लोकांचा सुद्धा ह्या लोका बद्दलचा दृष्टिकोन बदलत आहे. सुप्रीम कोर्टचा गे लग्नाबद्दलचा निकाल हास्यास्पद असला तरी तो बदलावा अशी भूमिका ट्रम्प ह्यांनी सुदैवाने घेतलेली नाही.
निर्णय हास्यास्पद आहे कारण त्याचा निकाल आणि तर्क ह्याचा काहीही संबंध नाही. लग्न ह्या प्रकारापासून सरकारने दूर राहून सर्व प्रकारच्या लग्नांना मान्यता द्यावी असे माझे मत आहे. (बहुपत्नी, बहूपती इत्यादी सर्व काही).
५. पर्यावरण
ट्रम्प : लोकहित जास्त महत्वाचे
हिलरी : पर्यावरण जास्त महत्वाचे
पर्यावरण हा अमेरिकन जनतेतील एक महत्वाचा राजकीय विषय आहे. वर पाहता सर्वानाच पर्यावरण हित पाहिजे असले तरी राजकीय वर्तुळांत पर्यावरण हिताचा अर्थ फार वेगळा आहे. पर्यावरणाचे रक्षण फक्त सरकार करू शकते असे एकदा सर्वानी मान्य केले कि वाट्टेल ते नियम काढून सरकार खाजगी मालमत्तेवर ताबा मिळवू शकते किंवा मोनोपॉली निर्माण करू शकते. ह्याचे परिणाम अतिशय दूरगामी आहेत. दोन्ही पार्टीना पर्यावरणा पेक्षा हपापाचा माल गपापा करण्यात जास्त रस आहे.
उदा नॉर्थ कॅरोलिना मध्ये जगांतील सर्वांत मोठा डुक्कर उद्योग आहे. तिथे माणसा पेक्षा डुक्करे जास्त आहेत. सर्व डुक्कर एकाच कंपनीच्या मालकीचे आहेत. एकदा मोठा पूर आला आणि ह्या डुक्करांची सर्व विष्ठा राज्यभर पसरली. प्रदूषण हे कारण सांगून राज्याने ह्यापुढे डुक्कर फार्मिंग वर राज्यांत बंदी घोषित केली. अर्थांत जी कंपनी आधीपासून तिथे होती तिने ह्याचे प्रचंड समर्थन केले. थोडक्यांत काय तर पर्यावरणाच्या नावाखाली एका कंपनीने स्वतःचा प्रचंड फायदा करून घेतला.
ह्याच प्रमाणे टेस्ला कंपनीच्या प्रत्येक गाडीवर सरकार सुमारे $८००० खर्च करते. एलोन मस्क आपल्या गाड्या खपाव्या ह्या साठी ऑइल कंपन्यांवरील कर वाढवण्यासाठी सतत लॉबिंग करत असतो. ऑइल कंपन्या बहुतांशी टेक्सस आणि अलास्का ह्या रिपब्लिकन राज्यांत असल्याने त्यांना देण्याची कुठलीही संधी democrats सोडत नाहीत.
थोडक्यांत काय तर ह्या धुळवडींत सत्य काय हे समजणे माझ्यासाठी तरी अशक्य गोष्ट आहे. वैज्ञानिकांवर सुद्धा इथे विश्वास ठेवणे अशक्य आहे कारण बहुतेकांना फंडिंग सरकार कडून मिळत असल्याने सरकी बाजू उचलून धरली नाही तर त्यांच्या पेकाटात लाथ बसेल. ह्या शिवाय विरुद्ध पुरावे देणाऱ्याचे शिरकाण करण्याचे काम सुद्धा सरकारी अधिकारी इमान इतबारे करतात.
कॅलिफोर्निया मधील हा कायदा पहा : http://www.washingtontimes.com/news/2016/jun/2/calif-bill-prosecutes-cli...
अगदी चर्च ने ज्या प्रमाणे नियम केले आहे त्या पद्धतीचा आहे. Climate change विरुद्ध बोलणे हा कायद्याने गुन्हा ठरविण्याचा हा प्रयत्न आहे.
६. सिटिझन्स युनाइटेड
ट्रम्प: इन फेवर
हिलरी : विरुद्ध
अमेरिकेतील काही ठळक प्रमुख सुप्रीम कोर्ट निवाड्यातील हा एक निवड. "हिलरी: द फिल्म" नावाचा एक चित्रपट २०१० मध्ये सिटिझन्स युनायटेड ह्या विनानफा संस्थेने जाहिरात म्हणून प्रदर्शित केला. त्यानंतर जी धुळवड उडाली त्यातून सुप्रीम कोर्टने एक फार महत्वाचा निकाल दिला.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या खाली (हक्क १) सरकारला कुठल्याही नागरिकाला किंवा संस्थेला राजकीय विषयावर मत प्रदर्शित करण्यापासून रोखले जाऊ शकत नाही. हा त्यांचा हक्क आहे. ह्याचे परिणाम दूरगामी आहेत. ह्याचा अर्थ विकिलिक्स सारखी संघटना स्वतःच्या पोटचा पैसे खर्च करून कुणाच्याही विरोधांत जाहिराती काढू शकते.
हिलरी च्या मते हयामुळे पैसा असलेल्या संघटना प्रचंड पैसे खर्च करून जनमत आपल्या बाजूने वळवू शकतात.
माझ्या मते लोकांना आपल्या आवडीच्या मुद्यासाठी कितीही पैसा खर्च करून प्रचार करण्याची १००% मुभा असली पाहिजे.
७. Equal Work Equal Pay
ट्रम्प : विरुद्ध
हिलरी : बाजूने
हा एक मूर्खपणाचा राजकीय मुद्दा आहे. विविध अभ्यासातून म्हणे असे दिसून येते कि महिलांना पुरुष पेक्षा कमी पगार मिळतो. म्हणजे एक प्रकारच्या व्यवसायांत पुरुषाला $१ मिळत असेल तर महिलांना साधारणतः $०.७ मिळतात.
उजव्या लोकांना ह्यातील अर्थशास्त्र जास्त चांगले कळते. बहुतेक वेळा महिला आणि पुरुषाचे चॉईस वेगळे असतात. महिलांना जॉब security हवी असते तर पुरुषांना जास्त रिस्क घेऊन जास्त पैसा. जवळ जवळ सर्व अभ्यासांत कधीही ना लग्न केलेले पुरुष आणि कधीही लग्न न केलेल्या समवयस्क महिला ह्यांत पगार सारखा असतो असे दिसून आले आहे. पण लग्न झाल्या नंतर महिला करियर पेक्षा घराकडे थोडे जास्त लक्ष देतात आणि घराच्या जबाबदाऱ्या कमी असल्याने पुरुष जास्त ओव्हरटाईम इत्यादी करून जास्त पैसे कमावतात. मुद्दाम महिला म्हणून कोणी त्यांना कमी पैसे देत नाही.
वैद्यकीय पेशांत बहुतेक महिला स्त्री रोगतज्ञ् किंवा शिशुतज्ञ् होतात पण पुरुष बहुतेक वेळा हृदयविकार तज्ञ् होतात. दोनी व्यवसाय सारखे वाटले तरी पगारांत प्रचंड फरक असतो.
ह्या उलट सरकाने महिलांना पुरुषा इतकाच पगार देण्याची सक्ती केली तर धंधे बहुतेक वेळा पुरुषांना जास्त प्राधान्य देतील आणि महिलांना नोकर मिळवणे जास्त कठीण होईल.
https://www.youtube.com/watch?v=hsIpQ7YguGE
8. Criminal Justice Reforms
ट्रम्प : आणखीन लोकांना जेल मध्ये डांबले पाहिजे
हिलरी : बदल पाहिजे
इथे मात्र मी १००% हिलरींच्या बाजूने आहे. बर्नी ह्यांचा प्लॅन जास्त चांगला होता.
अमेरिकेत war on drugs नावाचे जे थोतांड चालवले आहे त्यातून शेकडो कोटी डॉलर्स खर्च होतातातच पण निष्पन्न मात्र काहीही होत नाही. शेकडो परिवार ह्याने उध्वस्त केले आहेत. civil forfeitures नावाचा जो भयानक कायदा आहे तो तर सरकारी लूट आहे. खरे तर इथे अमेरिकेन जनतेला सशस्त्र उठाव करण्याची गरज आहे.
सर्वाधिक महत्वाचे मुद्धे
१. सुप्रीम कोर्ट च्या जज ची नेमणूक
माझ्या मते अमेरिकन सभ्यतेचा हा सगळ्यांत कच्चा दुवा आहे. सुप्रीम कोर्टचा जज हे आजीवन पद आहे. एकदा इथे नेमणूक झाली कि माणूस मारे पर्यंत राहू शकतो. ह्या शिवाय कोर्टाने wade, केलो इत्यादी केस मध्ये "हम कहे सो कायदा" अशी भूमिका घेतल्याने त्यांना प्रचंड ताकद आली आहे.
ट्रम्प ने एक गोष्ट चांगली केली ती म्हणजे "originalist interpretation" चा जज आपण नेमू असे त्याने आधीच घोषित केले आहे. हिलरीने ह्याउलट सिटिझन्स युनाइटेड आणि गन rights कॅन्सल करेल अश्या जज ची नेमणूक करण्याचे संकेत दिले होते.
माझ्या सारख्या libertarian माणसा साठी सुप्रीम कोर्ट फार महत्वाचे आहे कारण libertarian लोक इथे बहुतेक वेळा जिंकतात. ओबामाच्या अनेक निर्णयांना बेकायदेशीर ठरवण्यात Libertarian Cato इन्स्टिटयूट ने फार महत्वाची भूमिका बजावली. ह्या शिवाय ACLU, FEE, EFF, Koch Institute इत्यादींनी सर्वच सरकारच्या नाकांत वेळोवेळी दम आणला होता.
Libertarian लोक फक्त ५% असले तरी बहुतेक सरकारी पॉलिसीवर त्यांचा फार मोठा प्रभाव असतो. मारिजुआना सध्या बहुतेक राज्यांत कायदेशीर झाली आहे पण हि भूमिका Libertarian संघटनांनी ५० वर्षे आधीच घेतली होती. स्कूल voucher, चार्टर स्कुल्स, इत्यादी अनेक विषयावर त्यांची भूमिका जिंकत आली असे असे वाटते.
२. ट्रेड
दोन्ही उमेदवारांची भूमिका ह्या विषयावर मतिमंदत्वाची होती. अर्थानं दोन्ही व्यक्ती हे जाणून आहेत आणि कदाचित मुद्दामहून फक्त वोट मिळविण्यासाठी हि भूमिका घेत आहेत.
चीन विरुद्ध ट्रम्प ह्यांची जी बडबड चालली आहे त्याच प्रकारची बडबड ८० मध्ये जपान विरुद्ध चालली होती. जपानी TV, VCR, Cars अमेरिकेत स्वस्तांत उपलब्ध होत असल्याने जपानी लोक अमेरिकन नोकर्या चोरत आहेत असा आरोप होत होता. त्याचा खरपूस समाचार मिल्टन फ्रिडमन ह्यांनी खाली घेतला आहे. हेच मुद्दे चीन आणि ट्रम्प ला सुद्धा लागू होतात. (हेच मुद्दे भारत आणि चीन ह्याच्या व्यापाराला सुद्धा लागू होतांत).
https://www.youtube.com/watch?v=c9STBcacDIM
पुढे काय :
ट्रम्प प्रेसिडेंट झाले असले तरी प्रेसिडेंट म्हणजे काही सम्राट नसतो. ओबामा ह्यांनी सम्राटा प्रमाणे वागायचा खूप प्रयत्न केला पण त्याला यश आला नाही. हि फार छान गोष्ट आहे. सध्या तरी रिपब्लिकन काँग्रेस आणि ट्रम्प ह्यांच्यात फक्त ओबामाकेर, guns आणि जज नेमणूक ह्यांत सहमती होण्याची शक्यता आहे.
Immigration, deficit, wall इत्यादी विषयावर ट्रम्प आणि काँग्रेस ह्यांचे एकमत होणार नाही आणि त्यावर ट्रम्प विशेष काही करू शकतील असे वाटत नाही.
हा लेख लिहिण्यासाठी अनेक लोकांची मदत झाली.