पुनश्च सुदान ……..
“स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी” हे गाणं एका निवांत क्षणी ऐकत असताना माझ्या मनात आलं की आपल्या कल्पनाशक्तीची धाव पोहोचणार नाही इतक्या लांबवरून अवचित, विरही आणि व्याकूळ स्वर आपल्या कानी येतात. त्यामुळे काही काळापुरतं आपलं भावविश्व दोलायमान होऊन जातं. असे अनोखे क्षण मी कैकदा अनुभवले आहेत.
असाच एकदा सुदानला परत जाण्याचा योग आला.
सुदानची राजधानी खार्टुम. खार्टुममधले काम संपवून, वाळवंटातला त्रासदायक प्रवास करत मी दुस-या शहरात पोहोचलो. या छोट्याशा शहरात फेरफटका मारूनही मुद्दाम बघण्यासारखे किंवा विकत घेण्यासारखं काही मिळालं नाही. केंव्हाही वाळूची वादळे झेलणा-या या भागांना शहर का म्हणत असावेत हे माझ्यासाठी मोठं गूढच होतं. दोन मजल्यांपेक्षा मोठे घर नाही. सर्व घरे माती आणि दगडांनी बांधलेली. एकही घर रंगवलेले नाही. भिंती फक्त ओल्या वाळूने लिंपलेल्या. क्वचितच झाडे दिसत होती. बाकी सगळीकडे फक्त उन्हाचा रखरखाट. काही वेळातच तप्त वारे वाहू लागल्याचं मला जाणवलं. बघता बघता हे गरम वारे जोरात वाहू लागले. त्याबरोबरच वाळूचे अतिशय बारीक कण चेह-यावर आणि अंगावर येऊन आपटू लागले. आधीच अती उष्ण हवा, गरम वारे आणि त्यातच तापलेल्या वाळूचा मारा. मला खरच सहन होईना. लोकांची परतीची लगबग उडाली. तेथेच राहणा-या लोकांनी लगेचच फडक्याने तोंडे झाकून घेतली. बाकीच्या लोकांनी पण आजूबाजूला आडोसा शोधला. काही क्षणातच रस्ता निर्मनुष्य झाला आणि अचानक माझ्या लक्षात आले की दूरवरून वाळूचे वादळ येत आहे. ५ ते ७ फूटी उंच वाळूची भिंत माझ्या दिशेने सरकत होती. वाळूचे वादळ घोंघावत येणे म्हणजे काय हे मी अनुभवत होतो.
पटकन मी मग एका बाजुच्या दुकानात शिरलो. मला पाहून दुकानदार पुढे आला. मी पाण्याची बाटली विकत घेतली आणि वादळ थांबण्याची वाट बघत तेथेच थांबलो. जरा वेळाने तो दुकानदार म्हणाला, `तुम्ही भारतीय आहात का?’ मी `हो’ म्हणताच तो म्हणाला, `तुम्ही हिंदू आहात का?’ यावरही मी हुंकार भरला. तशी त्याने मला त्याच्या घराच्या आतल्या भागात येण्यास सांगितले. दुकानापाठीच त्याचं घर होतं. “आगे दुकान और पिछे मकान” म्हणतात त्याप्रमाणे. घरासमोर आणि दुकानामागे एक छोटस मोकळं अंगण होतं. सुदानमधील इतर घरांपेक्षा हे घर खूप वेगळं असाव; एकमजली आणि आपल्याकडच्या गावातील घरांची आठवण करून देणार. घरात विशेष वावर दिसत नव्हता. दुकानाच्या मालकाने मला घराच्या आतल्या अंगास नेले. तेथील दृश्य पाहिले आणि माझ्या आश्चर्याला, आनंदाला पारावार उरला नाही. रंग उडालेलं, चिरा पडलेलं, तरीही मंजी-यांनी डोलणारं तुळशीवृंदावन होतं. माझे हात आपसूक जोडले गेले. माझ्या चेहा-यावरचे भाव वाचल्यागत तो बोलू लागला, “या घराचा मालक हिंदू होता. बरीच वर्षे इकडे घालवल्यावर काही आपत्तीपोटी त्यानं मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. त्याचा मी एकनिष्ठ नोकर असल्यानं दुकान आणि घर सारं माझ्याकडे सोपवून तो निघून गेला. जाताना बाकी गोष्टी तो घेऊन गेला. मात्र ही कृष्णाची मूर्ती आणि तुळशीवृंदावन इथेच राहिलं. मी कट्टर मुसलमान आहे. आमच्यात मूर्तीपूजा नाही. तुळशीला एक झाड मानून नेमानं पाणी मात्र घालतो. आपण हिंदू आहात. मी असे समजतो की हा कृष्ण म्हणजे तुमचा `अल्ला’ आहे. मला आठवतंय, की या घराची मूळ गृहिणी रोज मनोभावे कृष्णाची पूजा अर्चा करी आणि तुळशीला पाणी पण घाली. आज ब-याच वर्षांनी या घरात एक हिंदू आला आहे. मी तुम्हाला पाणी आणि फुलं आणून देतो. तुम्ही तुमच्या देवाची पूजा करा. कारण त्यामुळे माझ्या सहृदय मालकाच्या आत्म्याला शांती लाभेल. तो जेथे असेल तेथून मला दुआ देईल. मी मूर्तीपूजक नसलो तरी भावनाप्रधान आहे. कृतघ्न नाही. ज्यांनी मला हे घर, दुकान सारं काही देऊ केलं, त्याच्याप्रती असलेल्या कृतज्ञबुद्धीने ही मूर्ती मी ठेवून दिली आहे इतकंच! तुळशीची मी पूजा करीत नाही पण नेमाने पाणी मात्र घालतो”
मी ऐकतोय, पाहतोय ते स्वप्न की सत्य, हे मला समजेना. बूट-मोजे काढून, हात-पाय धुऊन मी तुळशीला पाणी घातले. त्याच्याकडून अज़ून थोडे पाणी मागून घेतले. श्रीकृष्णाची मूर्ती अगदीच धूळकट झाली होती. त्याने दिलेल्या पाण्याने श्रीकृष्णाच्या मूर्तीला स्वच्छ स्नान घातले. आता ती मूर्ती सूंदर दिसू लागली होती. तो दुकानदार माझ्याकडे एकटक पहात होता. मी केलेली प्रत्येक कृती त्याने पहिली आणि तो म्हणाला की त्याच्या मालकाची पत्नी सुद्धा अशीच पूजा करीत असे. एव्हढे सांगून तो पटकन आत गेला आणि एक डबा घेऊन आला. मी तो डबा उघडून बघताच मला आश्चर्याचा धक्का बसला कारण त्या डब्यात काही उदबत्या, हळद आणि कुंकू होते. तितक्यात त्याने एक काडेपेटी पण आणून दिली. भारावल्यागत मी श्रीकृष्णाच्या मूर्तीपुढे उभा राहिलो आणि त्या हस-या मूर्तीकडे पाहताना हृदयातून झंकार उमटले “कृष्ण मनोहर दिसतसे उभा, चैतन्याचा गाभा प्रकटला” आणि मनात अंतर्नाद उमटले “कृष्णं वन्दे जगद्गुरूम्।“
आम्ही दोघे दुकानात परत आलो. थोडा वेळ गप्पा मारल्या. तो भरभरून बोलत होता. बहुतेक सर्व आठवणी हिंदू मालकाबद्दल होत्या. एव्हाना दुकाना बाहेरचे (आणि माझ्या आतले सुद्धा) वादळ शमले होते. परत एकदा श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन मी हॉटेलच्या दिशेने चालू लागलो.