इस्राएलमध्ये अनुभवलेली मराठी अस्मिता……..
काही वर्षांपूर्वी `इंडियन इंडस्ट्रिअल डेलिगेशन’ या उद्योगविश्वाशी निगडित आणि भारत सरकार पुरस्कृत कार्यक्रमासाठी औषध कंपनीचा प्रतिनिधी म्हणून मला इस्त्राइलला जायची संधी प्राप्त झाली.
इस्राइल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांच्या वर्षानुवर्षे चाललेल्या रक्तरंजित यादवीच्या पार्श्वभूमीवर मी अन्य सहका-यांसोबत इस्राइलला जायच्या तयारीला लागलो. व्हिसा मिळवण्यापासूनच या दोन देशातील संघर्षमय धगीचा प्रत्यय आम्हाला येऊ लागला. म्हणजे असं, की तुमच्या पासपोर्टवर इस्राइलचा व्हिसा असेल, तर कोणत्याही गल्फ देशाचा व्हिसा तुम्हाला सहजासहजी मिळत नाही. (किंवा अजिबात मिळत नाही असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल) म्हणून आम्हा सर्वांना इस्राइलसाठी वेगळा पासपोर्ट घ्यावा लागला. भारत सरकार, `इंडियन एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल’ आणि इस्राइल इंडस्ट्रीज अशा सर्वांकडून”ना हरकतीचे” पत्र मिळवल्यानंतरच आम्हाला व्हिसा मिळाला. मुंबई विमानतळावर प्रत्येकाची कसून चौकशी झाल्यावर आम्हाला तेल अविवचा बोर्डिंगपास मिळाला. मुंबईचीच पुनरावृत्ती किंवा त्याहूनही जास्त स्तरावरची चौकशी तेल अविवच्या विमानतळावर झाली. कशासाठी आलात, कुठे जाणार, काय करता, किती दिवसांचा मुक्काम या “क”च्या बाराखडीतून तावून सुलाखून आम्ही विमानतळाबाहेर पडलो. मात्र, तेल अविव शहराच्या सुखद आणि प्रसन्न दर्शनाने त्या प्रश्नोतरांच्या मनस्तापाचा आम्हाला विसर पडला. स्वच्छता, आदब आणि टापटीप या मौल्यवान दागिन्यांनी नटलेल्या या नगरीच्या मी तात्काळ प्रेमात पडलो. तसंही ह्या देशाप्रती मला खास ममत्व आहे. उद्योगी आणि धडाकेबाज ज्यू लोकांची जिगर सर्व जगाने वाखाणलेली आहे.
Can you believe its a BUILDING !!
आमच्यासाठी राखून ठेवलेल्या हॉटेलात शिरताच पुरुष स्वागतकाने ( Male Receptionist) आमचे स्वागत केले आणि आमचे पासपोर्ट त्याच्या ताब्यात घेतले. माझा पासपोर्ट चाळून तो बाजूला ठेवला आणि मला जरा वेळ थांबायला सांगितलं. ह्या प्रकारानं मी चक्रावलो आणि अस्वस्थ झालो. सर्वांचे पासपोर्ट पाहून त्याना रूम्स दिल्यानंतर अगदी अखेरीस त्याने माझ्या नावाचा पुकारा केला. तसा थोड्या घुश्श्यातच मी स्वागतकापाशी गेलो. माझ्याशी हस्तांदोलन करीत, अत्यंत दिलखुलासपणे हस-या मुद्रेनं तो म्हणाला, “गोखलेसाहेब, मुद्दामच तुमचा पासपोर्ट मी शेवटी घेतला. कारण मला तुमच्याशी मराठीत बोलायचं होतं. माझं नाव अब्राहम मोझेस.” त्याच सफाईदार मराठी ऐकून माझा राग कुठल्याकुठे पसार झाला आणि त्याची जागा आश्चर्यानं आणि आनंदानं घेतली. पावसाळी दिवसात माथ्यावरील आभाळाचे रंग झरझर पालटत जावेत तसे माझ्या चेह-यावरचे बदलते आविर्भाव पाहून तो परत दिलखुलास हसला आणि म्हणाला, “पार्ले टिळक, पार्ले कॉलेज, टिळक मंदिर हे तुम्हा पार्लेकरांचे “वीक पॉइण्ट” आहेत ना? मी सांताक्रूझचा असल्यानं मला पार्ल्याची खडानखडा माहिती आहे”. एव्हाना मला चक्कर यायचीच काय ती बाकी होती. माझ्या हाती ताज्या फळांच्या ज्यूसचा ग्लास देत तो म्हणाला, “दोस्ता, आपण पुन्हा जरूर भेटूया”. संध्याकाळी मी सहेतुक खाली चक्कर मारली. पण बहुधा त्याची शिफ्ट संपल्याने आता तिथे दुसराच माणूस बसलेला दिसला. तो अब्राहम मोझेस न भेटल्यानं माझा चांगलाच विरस झाला. तो सांताक्रूझला राहत होता आणि मी पार्ल्याला म्हणजे आम्ही दोघे एकाच मुलाखातले हे कळल्यावर हास्यलहरींनी रुंदावत गेलेला त्याचा चेहरा आणि त्याचे मराठीतील संभाषण परत परत मनाशी घोळवत रात्री कधी तरी मी निद्राधीन झालो.
दुस-या दिवशी तेथील उद्योगपतींशी वार्तालाप आणि “भारतीय औषध व्यवसाय” या विषयावर माझं `प्रेझेंटेशन’ होतं. काम आटोपून मी निघणार तोच एका व्यक्तीने माझी चक्क वाट अडवली आणि शुद्ध मराठीत ते म्हणाले, “अभिनंदन. तुमचं प्रेझेंटेशन मला खूप आवडलं”. मग स्वतःचा परिचय करून देत ते म्हणाले, “माझं नाव रूबेन आयझॅक. मी खरं तर अलिबागचा, पण गेल्या दहा वर्षांपासून इथेच स्थायिक झालोय”. त्यांना त्यांचे भारतातील वास्तव्याचे दिवस आठवले असावेत, म्हणूनच बहुधा काही एक न बोलता भारावल्यागत एकटक ते माझ्याकडे पाहात राहिले. त्यांनी मला जेवणाचं आमंत्रण दिलं. पण पुढचे दोन दिवस माझ्यापाशी जराही मोकळा वेळ नसल्याने, तीन दिवसानंतर भेटण्याचा वायदा मी केला.
पुढचे तीन दिवस मी स्वतःला कामामध्ये जुंपवून घेतलं आणि कामाचा निचरा केला. कारण जगप्रसिद्ध `मृतसमुद्र’ आणि “जेरुसलेम” पाहण्यासाठी आम्हाला निवांत वेळ हवा होता. ठरल्याप्रमाणे कामातून फुरसत मिळताच आम्ही `मृतसमुद्रा’च्या सफरीवर निघालो. क्षारयुक्त दाट पाण्याची आंघोळ, अंगभर वाळूचे लेपन, पाण्यावर बसण्याचा, पाण्यावरून चालण्याचा धाडसी (असफल) प्रयोग करून पाहिला आणि त्या थरारांची प्रचंड गंमत अनुभवली.
अखेरीस थकूनभागून पोटपूजेसाठी जवळच्या `फास्ट फूड सेंटर’चा आसरा घेतला. काउंटरवरच्या मुलींनी आम्हाला न्याहाळून आपापसात नेत्रपल्लवी केली आणि एकमेकींशी काहीतरी कुजबुजल्या. एका मुलीनं धिटाईने विचारले की `आपण भारतीय का?’ मी `हो’ म्हणताच तिचे डोळे एकदम चमकले. ती हिंदीत म्हणाली “मी मूळची भारतीय असून महाराष्ट्राच्या कोकण भागातली आहे”. तिच्या बोलण्याचा सारांश असा, की तिचं नाव अँजली असून काही वर्षांपूर्वी ती या “प्रॉमिस्ड लँड” मध्ये येऊन दाखल झाली. तिचं महाराष्ट्रावर, भारतावर अपार प्रेम आहे हे जाणवलंच आणि त्या क्षणी भारताबद्दल बोलताना `सुंदर माझा देश’ या उदात्त भावनेनं तिचा चेहरा लख्ख उजळून निघाला होता. ती मला म्हणाली, “इथे आल्यावर मी हिब्रू भाषा शिकले आणि मला लगेच नोकरीही मिळाली. आता आम्ही कायमचे इथेच स्थायिक झालो”. मग तिने तिच्या मैत्रिणींची ओळख करून दिली. ह्या दुस-या मुलीनी जे प्रश्न विचारले, त्यावरून तिला मुंबई, कोची, दिल्ली, ताजमहाल आणि वाराणशीबद्दल विशेष उत्सुकता असल्याचं जाणवत होतं. भारतात फिरायला येणार्या कित्येक इस्राइली लोकांना वाराणशीला जायचं असतं. पण का जायचं असतं? याचं उत्तर ते देत नाहीत पण वाराणशीला जातात हे मात्र नक्की. सात वर्षांपूर्वी अँजलीनं भारताला “अलविदा” केलं होतं, म्हणूनच गतस्मृतीत हरवलेली ती मला भारताबद्दल भरभरून बरंच काही विचारत होती. मीही तिच्या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिली आणि जड अंतःकरणाने तिचा निरोप घेतला.
रात्री उशिरा हॉटेलवर परतलो; तोपर्यंत तीन वेळा रुबेन महाशयांनी फोन करून माझ्यासाठी निरोप ठेवले होते. दुस-या दिवशी सकाळी त्यांच्या फोननं मला जाग आली आणि आठ वाजता एकत्र ब्रेकफास्ट घ्यायचं आम्ही नक्की केलं. जिगरी दोस्त फार वर्षांनी भेटल्यावर जो आनंद होतो तो आनंद (मला भेटल्यावर) त्यांना झाला असावा; कारण पुढे सरसावून त्यांनी मला मिठी मारली. बोलण्याच्या ओघात ते म्हणाले `शेकडो वर्षांपूर्वी अन्य धर्मियांकडून होणा-या छळवणुकीला कंटाळून ब-याच ज्यू बांधवांनी समुद्रमार्गे पलायन केलं आणि स्वतःचा जीव वाचवला. नक्की कुठे जायचं कुणालाच ठाऊक नव्हतं. काही गोव्यात पोहोचले, काही गलबतं कोचीच्या किना-याला लागली, काही बांगलादेशात पांगले, तर काही कोकण किनारपट्टीवर उतरले. हे ज्यू बघता-बघता `कोकणवासी’ होऊन गेले. रूबेन म्हणाले जसं संजाणच्या किनारपट्टीवर गुजरातच्या राजांनी पारशी लोकांचं स्वागत केलं, तसंच आमचं स्वागत आणि स्वीकार कोकणकिनारपट्टींने केला. अशा प्रकारे माझे पूर्वज कोकणात स्थिरावले. १५ ऑगस्ट १९४७ साली भारत-पाकिस्तान स्वतंत्र झाले तसेच १४ मे १९४८ रोजी इस्राइल राष्ट्र अस्तित्वात आलं. निराधार आणि परागंदा झालेल्या ज्यूंना स्वतःचं हक्काचं घर मिळालं.
सद्गदित आवाजात रुबेन पुढे म्हणाले, “इतर देशांतून इस्राइलमध्ये परतलेले ज्यू त्या त्या देशांना विसरून गेले. मात्र भारतातून परतलेले ज्यू भारतभूमीला, भारतीय लोकांना, त्यांच्या आदरातिथ्याला, प्रेमळ वागणुकीला आणि संस्कृतीला विसरू शकले नाहीत. कारण भारतात आमचा धार्मिक छळ कधीच झाला नाही किंवा आम्हाला सापत्न वागणूक दिली गेली नाही. पण इतर देशांतून आलेल्या ज्यूंचे अनुभव मात्र विदारक होते. तेथे त्यांना अमानुष वागणूक मिळाल्याने ते नंतर त्या देशांना विसरूनही गेले. पण आम्ही मात्र भारताला विसरू शकत नाही कारण भारत ही आमची जन्मभूमी तर इस्राइल ही कर्मभूमी आहे. म्हणूनच एखादा मौल्यवान दागिना मखमली पेटीत जपून ठेवावा, तशा भारताशी निगडीत स्मृती आम्ही मनाच्या मखरात जपून ठेवलेल्या आहेत”. त्यांचं हे बोलणं ऐकून मी `महाराष्ट्रातल्या इस्राइल’ मध्ये आहे की `इस्राइलमधल्या महाराष्ट्रात’ आहे हेच मला समजेनासं झालं. रुबेन म्हणाले, “तुमची कुटुंब व्यवस्था, परस्परातील सलोख्याचे संबंध, जिव्हाळा, मसालेदार चमचमीत पदार्थ, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत तर पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत असलेली विविधतेतील एकता भुरळ पाडणारी आहे”. मग जरा वेळ स्तब्ध होऊन ते म्हणाले “पूर्वी भारतातून आलेल्या ज्यूंना त्यांच्या वर्णामुळे शहरापासून लांबवर जागा देण्यात आल्या. बीनगो-या वर्णामुळे त्यांची काहीशी मानहानी होई. नोक-या सहजी मिळेनात. मग आम्ही सर्व एकत्र आलो आणि आम्ही तेल अविवला बैठा सत्याग्रह केला. मग सरकारी धोरण बदलले आणि आम्हाला हळूहळू चांगले दिवस आले. आता आमच्या मुलांना काहीच अडचणी नाहीत, पण आमच्या नंतरच्या पिढीला भारतीय संस्कृतीची ओळख राहील की नाही याची मात्र रुखरुख वाटते . अर्थात भारतीय संस्कृती तसेच मराठी भाषा इथे टिकावी आणि रुजावी म्हणून आम्ही झटत आहोतच.”
“इवलेसे रोप लावियेले दारी त्याचा वेलु गेला गगनावेरी ” या उक्तिप्रमाणे माझ्या मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा वेल लांबवरच्या इस्राएल देशात फोफावलेला पाहून माझा उर आनंदाने भरून आला आणि त्याच आनंदात मी परतीच्या प्रवासाला लागलो.