Get it on Google Play
Download on the App Store

केनियात सुद्धा “हर हर अंबे” ………


हर हर अंबे” किंवा “हर हर महादेव” असे घोष खरतर भारतात होतात. परंतु “हरअंबे” किंवा “हरांबे” किंवा “हराम्बी” हे केनिया सारख्या दूर देशाचे घोषवाक्य कसं झाल, याची ही थक्क  करणारी कहाणी……

काही काही गोष्टींची समीकरणे ठरुनच गेलेली असतात. “सत्यमेव जयते”च्या नुसत्या उच्चारासरशी आपल्या डोळ्यापुढे सारनाथचा अशोक स्तंभ उभा रहातो. अशोक स्तंभ आणि त्या खाली कोरलेलं “सत्यमेव जयते” हे चिरंतन सत्य असलेल बोधवाक्य आपल्या सरकारी इमारतींवर बघायला मिळत आणि हे बोधवाक्य  लहानपणापासून  सर्वांना  मुखोद्गत असतं.

काही वर्षांपूर्वी कामानिमित्त मी केनियाची राजधानी नैरोबी येथे मी तळ ठोकून होतो. पहिल्या चार दिवसांत मी ऑफीसच्या कामाचा फडशा पाडला. तेंव्हा कुठे मला जरा उसंत मिळाली.  फावल्या वेळात हॉटेल वर राहून आराम करण्याची लागण न लागल्याने किंवा  या परक्या मुलखात चक्रमासारखी खरेदी करण्यापेक्षा मला नवीन मुलूख पादाक्रांत करायला जास्त मौजेचे वाटते. “अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी” म्हणतात ते काही खोटे नाही. कारण बरोब्बर पाचव्या दिवशी मी तेथील सेल्स टीम बरोबर नैरोबी शहराचा फेरफटका करण्यासाठी सज्ज झालो. जिराफ पार्क, सरित सेंटर, ऑर्फनेज होम झाल्यावर आम्ही असेंब्ली हॉलपाशी पोहोचलो. असेंब्ली हॉल म्हणजे केनियाचे लोकसभागृह. सभागृहच्या दारावर चितारलेलं उत्कृष्ट रंगसंगतीचे चित्र केनियाचे बोधचन्ह असाव असा मी कयास बांधला. त्या बोधचिन्हाखाली लिहिलं होत `हराम्बी’ (Harambee). जरा पुढे जातो तोच अजून दोन सरकारी इमारती दिसल्या. या इमारतींवर सुद्धा `हराम्बी’ (Harambee) हे बोधचन्ह झळकत होते.


Kenya Harambee

आमची सेल्स टीम (कॉस्मो पोलिटीअन) होती. म्हणजे असे की एक मॅनेजर आणि तीन प्रतिनिधी (Representative) मूळचे केनियाचे होते. त्यातील एक प्रतिनिधी दोन चार वेळेस भारतात येऊन गेला होता. त्यामुळे त्याला भारताविषयी थोडीफार माहिती आणि आपुलकी होती. एक जण पूर्व आफ्रिकेचा होता. त्याला तोडकी मोडकी अरेबिक भाषा येत असे आणि त्याचे आई किंवा वडील एक कोणीतरी अरेबिक होते. त्यामुळे तो स्वतःहाला कट्टर अरबी समजायचा. एका प्रतिनिधीचे सर्व नातेवाईक अमेरिका, इंग्लेंड किंवा यूरोप मध्ये स्थाइक झाले होते. पण हा काही जाऊ शकत नव्हता. तो स्वतःहाला पक्का अंग्रेझ समजायचा. ओघाओघाने केनियन प्रतिनिधींना स्वाहीलीबद्दल, बाकीच्या दोघांपैकी एकाला अरेबिक आणि दुसा-याला इंग्लीश भाषेबद्दल नको तेव्हढा अभिमान होता.

आमच्याबरोबरचा (केनियन) प्रतिनिधी मला म्हणाला “सर, हराम्बीचा अर्थ माहीत आहे का??” मी “माहीत नाही”‘ या अर्थी मान हलवली. आश्चर्यचकित होत तो मला म्हणाला “सर, हा शब्द भारतीय शब्दावरून घेतला आहे”. आता चकित आणि फजीत होण्याची पाळी माझी होती. माझ्या चेह-यावरची आश्चर्याची मोहोर निरखीत तो प्रतिनिधी म्हणाला “खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे अंदाजे १९२० ते १९३० च्या दरम्यान केनियात रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू होते. या कामासाठी बिटिशांनी  भारतीय मजदूर इथे आणून कामाला जुंपले. त्या काळी रेल्वे लाईन टाकणं हे अत्यंत जिकीरीचं काम होतं. भरभक्कम लोखंडी रूळ आणि लाकडी स्लिपर्स उचलण्यासाठी यंत्रसामुग्री नव्हती. अशावेळी पूर्ण ताकदीने रुळ वगैरे उचलताना स्फुरण चढण्यासाठी हे भारतीय मजूर ”हर हर अंबे” चा सामूहिक गजर करीत. त्यांच्या बरोबर केनियन मजूर पण तोच गजर करीत. बघता बघता केनियापासून युगांडापर्यंत रेल्वेलाईन टाकण्याचं काम पूर्णत्वास गेलं. (आज ही रेल्वे लाईन आस्तित्वात नाही).

१९६३ मध्ये केनियाला स्वातंत्र्य मिळाले. माननीय श्री. जोमो केनियाटा स्वतंत्र केनियाचे पहिले पंतप्रधान झाले. रेल्वे लाईन टाकण्याचे काम लहान वयात सदोदित पाहिल्याने पंतप्रधान श्री. जोमो केनियाटा यांच्या मनात “हर हर अंबे” या शब्दाने घर केले होते. त्याचा अर्थ त्या लहान वयात त्यांनी असा लावला की “कोणतेही काम सर्वांनी एकत्र येऊन केले तर लवकर यशस्वी होइल” आणि “हराम्बी” हा शब्द अलगदपणे स्वाहिलीत प्रचलित झाला. खूप विचारांती श्री. जॉमो केनियाटानी `हराम्बी’ असे केनियाचे बोधवाक्य म्हणून निस्चित केले. थोडक्यात “हराम्बी” ही गूढरम्य, सुखद कल्पना केनियावासिंनी भारताकडून अजाणतेपणाने आयात केली आहे !! आपल्या भारतीय संस्कृतीचं पदलालित्य सा-या जगाला व्यापून उरले आहे. आपल्या जीवनाचा परिघ आपण विस्तारू शकलो तर आपल्या लक्षात येईल, की ब-याच आफ्रिकन आणि आशियाई देशांत भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला आहे.


images


आता मॅनेजर पुढे सांगू लागला (वरील) चित्रात दाखविल्याप्रमाणे “दोन सिंह, दोन भाले आणि पारंपरिक पठडीतली ढाल हे आमचे बोधचिन्ह आहे. तीन रंगी ढालीतील काळा रंग हा आफ्रिकन लोकांसाठी, हिरवा रंग सृष्टीच्या सृजनचा आणि लाल रंग केनियन लोकांनीं स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढयाचा तर पांढरा रंग एकजूट आणि शांतता दर्शवितो. सिंह आणि ढालीच्याखाली माउंट केनियाचा पर्वत चितारला आहे. या पर्वतावर चहा कॉफी, मका आणि नानाविध नैसर्गिक साधन संपत्ती रेखाटली आहे. या बोधचिन्हबाबत तसेच अन्य महत्वाच्या गोष्टींबाबत केनियाचे रहिवासी संपूर्णपणे जागरूक आहेत.

भारतीय मूल्ये, प्राचीन संस्कृती आणि परंपरा सर्वतोदूर पसरत असताना आपली अशोकचक्र, अशोक स्तंभ आणि तत्सम गोष्टींबद्दलची  अनभिज्ञता पाहून “सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्याघरी मी पाहुणी” या विंदांच्या काव्याची आठवण झाल्याखेरीज राहात नाही.

परंतु इतर प्रतिनिधींना आमचे संभाषण मान्य नव्हते. दोन केनियन म्हणाले कि हे सर्व खोटे आहे “हारांबी” हा शब्द पूर्णपणे केनियनच आहे. भारतीय शब्दाशी त्याचा काहीही संबंध नाही. आता माझ्या मॅनेजरची पाळी होती. तो म्हणाला “अरे हे इतर भारतीय शब्द बघा. “चहा” किंवा “च्याय”ला आपण “च्याय”च म्हणतो. पिकल म्हणजे भारतीय भाषेत आचार  त्याला आपण म्हणतो “अचारी”,  भारतीय भाषेत “गवर्नमेंट” ला “सरकार” म्हणतात  आपण “सेरिकली” म्हणतो, पैसा या भारतीय शब्दाला “पेसा”, नाण्याला ” सराफू”, पेन्सीलीला “कलामु” अणि नगरसेवकला ” दिवाणि” म्हणतो. बर-याच शब्दांमध्ये समानता आहेच आणि आपण ती भारतीयांकडून घेतली आहे असे मान्य करायला काहीच हरकत नाही. बरेच भारतीय शब्द  सरळ सरळ या भाषेत सामावून गेले आहेत.

हे ऐकताच स्वतःला अरबी आणि अँग्रेझ समजणारे प्रतिनिधी पुढे सरसावले. स्वतःला अरबी म्हणवून घेणारा सांगू लागला; “स्वाहिली” हा शब्द अरबी शब्द साहिल म्हणजे “सीमा” किंवा “समुद्रकिनारा” या शब्दावरून वरुन आला आहे. तसेच येथे दुसारी भाषा बोलली जाते तीच नाव “किस्वाहिली” आहे. अरबी भाषेत याचा शब्दशः अर्थ “कोस्टल भाषा” किंवा “किना-यावरील भाषा” असा होतो. अरबी आणि पर्शियन लोक अनेक शतके आफ्रिकेच्या सतत संपर्कात होते आणि आहेत. “रोटी बेटी” व्यवहार अजूनही होतात आणि त्याबरोबर स्वाहिली भाषाही समृद्ध झालेली आहे”. तो पुढे सांगू लागला “स्वाहिली मध्ये संख्या मोजताना  किंवा गणना करत असताना संख्या एक (मोजा), दोन (म्बिली), तीन (टाटू), चार (न्ने), पाच (तानो), आठ (नाणे) आणि दहा (कुमि) हे अंक मूळ आफ्रिकन “बन्टु” भाषेत आहेत. पण सहा (सीता), सात (सबा) आणि नऊ (तिसा) अरबी भाषेतून घेतलेले आहेत !!

हे ऐकल्यावर स्वतःला अँग्रेझ समजणारा चावताळुन उठला आणि म्हणाला आज केनियाची लोक संख्या साधारणपणे पाच कोटी आहे. त्यातले किती लोक भारतीय किंवा अरेबिक किंवा पोर्तुगीज भाषा बोलू शकतात? बहुतेक सर्व जण इंग्लीशच बोलतात. इंग्रज लोकांचे आगमन झाले आणि केनियाची भरभराट झाली. त्यांच्या वसाहती झाल्या. सायकली (बैईसकेली), बस (बसी), पेन्सिल (पेनसेली) आणि मशीन (मशीने), आणि स्कूल (स्कूले) असे अनेक शब्द स्वहिली भाषेत जाऊन बसले. `स्वाहिली’ ही केनियाची राष्ट्र भाषा आहे. पण लिपी इंग्लिश आहे.

हा वाद आता नको त्या दिशेने जात होता असे लक्षात आल्यावर मी हस्तक्षेप करून सर्वांना शांत केले आणि सांगितले की   देशोदेशीचे लोक एकमेकांशी संपर्कात आल्यामुळे अनेक भाषांचा विकास घडत गेला आणि ही प्रक्रिया आज सर्व जगभरात सुरू आहे. अस म्हणतात की केनिया आणि टांझानिया येथे बोलली जाणारी “स्वाहिली” भाषा या बाबतीत अग्रगण्य आहे. म्हणून तुम्हा सर्वांना खरतर अभिमान वाटला पाहिजे. अरब आणि पर्शियन लोक फार मोठ्या प्रमाणात येत असत. त्यामुळे ह्या दोन्ही भाषांचा प्रभाव केनिया, टांझानिया तसेच इतर आफ्रिकन देशांच्या भाषेवर झाला; विशेषतः स्वाहिलीवर. तसेच इंग्रज लोकांनी काही वर्षे राज्य केले. त्यामुळे ती भाषा इथे टिकली. नाहीतरी आज इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा म्हणूनच ओळखली जाते आणि तुम्ही सर्वजण स्वाहिली आणि ईंग्लिश उत्तम प्रकारे बोलू-लिहु शकता. तुम्हाला या गोष्टीचा खूप फायदा आहे.

ध्यानी मनी नसताना एका हराम्बी या शब्दावरुन आमच्या टीम मध्ये जुंपली होती. पण या वादावादीमुळे माझ्या ज्ञानात चांगलीच भर पडली. सर्वांना शांत करीत मी रात्री बाहेर जेवायला जाण्याचे घोषित केले. सर्वांनी मिळून कारनिवोर (Carnivore) या हॉटेल मध्ये जाण्याचे ठरवले. कारनिवोर मध्ये जाईस्तोवर कारनिवोर म्हणजे “मांस खाणारे” एव्हढेच माहीत होते. कारनिवोर (Carnivore) म्हणजे खरी  काय चीज़ आहे ह्याची मला जरा सुद्धा कल्पना नव्हती.

पुढील भागात लवकरच घेऊन येत आहे कारनिवोर रूपी आफ्रिकेची खाद्य संस्कृती.