Get it on Google Play
Download on the App Store

एक छोटासा अनोखा देश…. कंबोडिया

पृथ्वीतलावरील काही देश खूप अवाढव्य, काही मध्यम आकारमानाचे तर काही खूपच छोटेखानी. या तिसऱया प्रकारात मोडणारा एक चिमुकला देश म्हणजे कंबोडिया जो थायलँड, लाओस व व्हिएतनाम यांच्या बेचक्यात वसलेला आहे. एका बाजूला थायलँड दुसर्या बाजूला व्हिएतनाम, उत्तरेला छोटस लाओस आणि एका बाजूला समुद्र. देशाची लोकसंख्या जेमतेम दीड  कोटींच्या घरात आहे. कंबोडियाचे आधीचे नाव होते कांपूचिया. देश स्वतंत्र झाला व त्याचे बारसे झाले `कंबोडिया‘ नावाने. या देशाची राजकीय व व्यापारी राजधानी एकच, ती म्हणजे `नोम्ह पेन्ह‘ (फ्नॉम पेन्ह). येथे प्रेक्षणीय स्थळे कमी असली तरी जी आहेत ती अप्रतिम आहेत.

शेकडो वर्षांपूर्वी कंबोडियावर एका हिंदू राजाचे राज्य होते. अर्थात आज ते जराही खरे वाटत नाही इतक्या झपाट्याने देश बदलला आहे. साधारण सोळाशे वर्षांपूर्वी `जयवर्मन‘ नावाच्या अतिशय पराक्रमी हिंदू राजाचा अंमल या देशावर होता. जनतेची भरभराट करून त्यायोगे देश समृद्ध करणे हे त्याचे एकमेव ध्येय होते. (इतक्या उदात्त विचारांचे राज्यकर्ते असतात हे वाचून आश्चर्य वाटते नाही?)

आजूबाजूच्या देशांना कंबोडियाची भरभराट सहन होईना. चीन, व्हिएतनाम, थायलँड काही ना काही कुरापती काढत पण हा हिंदू राजा सर्वांना पुरून उरला. जयवर्मनने बरीच वर्षे या देशावर राज्य केले. त्याच्या मुलाचे नाव “सूर्यवर्मन“. राजा सूर्यवर्मनने 1113 ते ११५० पर्यंत राज्य केले. या काळात त्याने एक महाकाय, मजबूत बांधणीचं व सुंदर कोरीवकाम केलेलं विष्णु आणि शिवाचे मंदिर बांधले. हे भव्य मंदिर मेरु पर्वत सदृश्य बांधलेले आहे. मंदिरात शिरताना सर्वप्रथम श्री गणेशाची सुंदर मूर्ती आहे. हिंदू मंदिरात ज्या काही गोष्टी असतात त्या सर्व गोष्टी येथे आहेत.  परंतु  आता विष्णूच्या मूर्ती तसेच अनेक शिवलिंग भ्रष्ट अवस्थेत शिल्लक राहिली आहेत. बहुतेक सर्व ठिकाणी विष्णूचे शरीर तसेच ठेऊन मस्तक गौतम बुद्धाचे बसवियले आहे.  भिंतींवर रामायण कोरलेले आहे.


मंदिर पाहताना आपण अचंबित होऊन जातो. आजसुद्धा ही नगरी जगातील एक मोठी नागरी म्हणून गणली जाते. पंधरा मैल लांब आणि सात मैल रुंद, तीन हजार स्क्वेअर मीटरमध्ये विखुरलेलं हे देवळाचं अनोखं शहर पाहून आपण स्तिमित होऊन जातो. 

सूर्यवर्मनच्या मृत्यूनंतर वियेट्नाममधील चॅम नावाच्या टोळ्यानि या भागाचा कब्जा केला. परंतु सूर्यवर्मनचा मुलगा `यशोवर्मन‘ वडिलांसारखाच पराक्रमी होता. त्याने अंगकोर पुन्हा जिंकले.



खरतर कंबोडियाची राजधानी होती नोम्ह पेन्ह. पण शेजाऱयांकडून सततच्या होणाऱया त्रासामुळे यशोवर्मनने `अंगकोर‘ येथे राजधानी हलवली. अंगकोरचा संस्कृत अर्थ आहे नगरी. जगभरातून लाखो पर्यटक अंगकोरला भेट देतात. सर्वांना हे ठिकाण खात्रीने आवडण्यासारखे आहे. या भागाची खैसियत म्हणजे येथे हजाराहून अधिक मंदिरे आहेत.  राजाच्या नंतरच्या पिढीने `हरीहरालय‘ नावाचे दुसरे सुंदर शहर वसवले. हरी म्हणजे विष्णु व हर म्हणजे शिव यांचे जेथे वास्तव्य आहे  ते संगमस्थान म्हणजे हरीहरालय. शहराच्या नावातच सौंदर्य व माधुर्य दडले आहे. हरी आणि हरमध्ये एका वेलांटीचा फरक सोडल्यास, त्यात नांदणारे निरामय ईशतत्व खरे तर एकच आहे. पण आपण हरी व हराला वेगळे केले व समाजकलह वाढला. आजही हे शहर कंबोडियात आहे. त्याचे नवीन नाव “रोलुओस” (म्हणजे छोटे शहर) आहे. अंगकोरला कंबोडिया मध्ये अनन्य साधारण महत्व आहे. म्हणूनच या अतिउत्तम कलाकृतीला देशाच्या जनतेने राष्ट्र ध्वजावर स्थान दिले आहे.

साधारण सहाशे ते सातशे वर्षे हिंदूंनी कंबोडियावर राज्य केले. कालांतराने थाई लोकांकडे, तेथून पुढे फ्रेंच लोकांकडे राज्यकारभार गेला. सरतेशेवटी सत्ता भूमिपुत्रांच्या हाती आली. मात्र मधल्या कालावधीत सर्व हिंदू प्रजा बौद्ध झाली होती.  सरतेशेवटी १९५३ साली क्म्बोडिया देश स्वतंत्र झाला. परंतु फारच थोडी वर्षे लोकांना त्याचा आनंद लुटता आला.

१९६८ साली ख्मेर रौगे (ख्मेर रूज) नावाची पार्टी अस्तित्वात आली आणि १९७५ सालापासून पॉल पोट नावाच्या क्रूर कर्म्याच्या राजवटीस सुरवात झाली. या नराधमने कंबोडियाच्या ८० लाख लोकसंख्येपैकी जवळ जवळ २५ ते ३० लाख लोकांना हाल हाल करून मारुन टाकले. हा क्रूरकर्मा फार शिकलेला नव्हता पण प्रजेचा छळ करण्याचे तंत्र त्याला चांगलेच अवगत होते. देशातील सुशिक्षित वर्ग, नोकरदार व सर्व शिक्षकांसाठी तो कर्दनकाळ ठरला. सत्ता हातात येताच बर्याचशा शाळा बंद करून त्याने तेथे छळछावण्या उभारल्या. याची साक्ष देणारी एक शाळा आजही आपल्याला नोम्ह पेन्हला पाहावयास मिळते. तिन मजली ऊंच आणि साधारण चाळीस वर्ग असलेल्या या शाळेचे रूपांतर पोलपोटने छळवर्गात केले. पोलपोटने सुशिक्षितांना टार्गेट केले. त्यांना कैदी बनवून एकेका खोलीत अनेक जणांना डांबून ठेवले. या कैद्यांना खाणे–पिणे नाही, कोणी उठाव केला तर लोखंडी पलंगाला बांधून त्याला फटके मारले जात. बऱयाचदा कैद्यांना उलटे टांगले जाई, खाली पाण्याच्या बादलीत श्वास गुदमरून कैदी अर्धमेला होईस्तोवर त्याचे डोके बुडवून ठेवत. सुशिक्षितांचे असे शारीरिक व मानसिक खच्चीकरण करून, माणसाच्या जिवंत राहण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीवर पोलपोटने आघात केला. हे सारे पाहून आपण उद्विग्न होऊन जातो.

कंबोडियात “किल्लिंग फील्ड“‘ (Killing Fields) नावाचे स्थान आहे. पॉल पोटने ज्या लोकांना मारले अशा लाखो माणसांचे सापळे येथे सापडले आहेत आणि ते या ठिकाणी जातन करून ठेवले आहेत. पाच वर्षांच्या उत्खानानंतर वीस हजार ठिकाणी स्त्रिया, पुरूष आणि मुले यांचे  हे सांगडे सापडले. अखेरीस साठाव्या वर्षी पॉल पोट जंगलात पळून गेला व जंगलातच कधीतरी मरण पावला.

killing fields

पॉलपोटच्या काळ्या पर्वातून कंबोडिया सावरला आणि प्रगतीच्या लाटेवर स्वार झाला. आज कंबोडिया जगातला सर्वात तरुण देश आहे. येथील जास्तीत जास्त प्रजा तरुण आहे. कारण येथील बरेचसे वरिष्ठ प्रजाजन किलिंग फिल्डमध्ये हुतात्मा झाले आहेत.

कांबोडियामध्ये प्रेक्षणीय स्थळे जरी मोजकीच असली तरी जी आहेत ती अप्रतिम आहेत. सरकार आणि जनता दोघानी उत्तम प्रकारे ही सर्व स्थळे जतन केली आहेत.