द्रोणाचार्याचे वय
द्रोणाचार्याचा उल्लेख नेहेमी भीष्माचे जोडीने, भीष्म-द्रोण असा होत असल्यामुळे ते वयाने वरोबरीचे असावे असा चटकन समज होतो. मात्र तसे नव्हते. भीष्म हे कौरवपांडवांचे नात्याने आजोबा, पण प्रत्यक्षात पणजोबा शोभतील एवढे मोठे होते. कारण सत्यवतीने शंतनूशी विवाह केला तेव्हा देवव्रत, म्हणजे भीष्म, स्वतःच तरुण वयाचा होता. त्यामुळे कोरवपांडवांचा आजोबा, विचित्रवीर्य हा भीष्माचा, नात्याने भाऊ खरा,पण वयाने मुलगा शोभला असता. द्रोणाचार्य हे कौरवपांडवांचे गुरु. त्यांचा पुत्र अश्वत्थामा हा कोरवपांडवांच्याच वयाचा होता व त्यांच्याबरोबरच पित्यापाशी धनुर्वेद शिकला. तेव्हां द्रोणाचार्य हे कौरवपांडवांचे वडील शोभतील अशाच वयाचे होते. धृतराष्ट्र, विदुर, द्रोण, कृप (अश्वत्थाम्याचा मामा) व द्रुपद – हा तर द्रोणाचा सहाध्यायी - हे साधारण एकाच वयाचे म्हणतां येतील. त्यामुळे भीष्म या सर्वांच्या दोन पिढ्या आधीचा व म्हणून त्यांचेपेक्षा ४५-५० वर्षानी मोठा असला पाहिजे. भारतीय युद्धाचे वेळी दुर्योधन, दुःशासन, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, कृष्ण, अश्वत्थामा हे साधारण ५० ते ५५ वयाचे, कर्ण त्यांचेपेक्षा ७-८ वर्षांनी मोठा, द्रोण, द्रुपद कृप हे ७० ते ८० वयाचे तर भीष्म १२५ वर्षांचा असावा असा तर्क करतां येतो. भीष्म-द्रोण असा जोडीने उल्लेख नेहेमी होत असल्यामुळे ते समकालीन असल्याचा उगीचच गैरसमज होतो. पण ते खरे नाही!