कर्ण व शल्य
नवीन लिखाणाला सुरवात, जेथे थांबलो होतो तेथूनच करतो आहे. कर्ण-शल्य परस्पर संबंधाबद्दल काही गैरसमज आहे तो तपासून पाहूं. शल्य हा महारथी, मोठ्या मान्यवर घराण्याचा राजा व त्याचा एक वेगळाच लौकिक म्हणजे तो सारथ्यकर्मामध्ये अतिशय कुशल होता व त्याचा त्याला फार अभिमान होता. सारथ्य हे सूतांचे काम पण अनेक क्षत्रिय राजे त्यात तरबेज होते. नलराजा, ऋतुपर्ण, ही नावे पूर्वीच्या काळची पण खुद्द श्रीकृष्ण व अर्जुन हेहि प्रख्यात होते. दुर्योधन जेव्हा शल्याला युद्धापूर्वी भेटला व त्याला आपल्या पक्षाला वळवून घेतले तेव्हा शल्याने त्याला विचारले कीं तुझी काय अपेक्षा आहे. नवल म्हणजे दुर्योधनाने त्याला म्हटले कीं 'तूं माझा सेनापति हो!’ आपल्या पक्षात भीष्म, द्रोण, कर्ण असताना त्याना बाजूला सारून शल्याला तो सेनापति कसा करणार होता? कदाचित भीष्मद्रोण युद्धनिवृत्त तर राहणार नाहीत ना अशी त्याला शंका असावी. तसे झालेच तर सेनापतिपदाचा भार शल्यावर ठेवून कर्णाला अर्जुनाशी टक्कर देण्यासाठी मोकळे ठेवावे असा त्याचा विचार असेल! पांडवानी, धृष्टद्युम्नाला सेनापति केले आणि भीम-सात्यकी-अर्जुनाला मोकळे ठेवले होते. प्रत्यक्षात भीष्म व द्रोण यानी १५ दिवस सेनापतिपद सांभाळले. १६ व्या दिवशी शल्याने सेनापतिपदाचा आग्रह न धरता, उदार मनाने ‘कर्णाला सेनापति कर, तोच आपली ढासळती बाजू सावरू शकेल’ असा सल्ला दुर्योधनाला दिला. कर्णाने एक अवघड पेच दुर्योधनापुढे टाकला. ‘अर्जुनाचे सारथ्य खुद्द कृष्ण करतो आहे, तेवढ्या लायकीचा सारथी मला नसल्यामुले माझी बाजू लंगडी पडते तेव्हा कृष्णाच्या बरोबरीचा सारथी आपल्या पक्षात एकच आहे तो म्हणजे शल्य. त्याला तू गळ घाल!’ खरे तर शल्य हा स्वतः महारथी होता त्याला सारथ्य करावयास सांगण्याने एक महारथी प्रत्यक्ष युद्धातून बाजूला पडणार होता. कौरव पक्षाचे अनेक जण मारले गेल्यामुळे हे योग्य नव्हते. तरीहि कर्णावर विसंबून, दुर्योधनाने शल्याला विनंति केली! शल्याच्या वाट्याला सेनापतिपदाऐवजी सारथ्य आले! तरीहि ‘कर्णा, तूं मला कृष्णाच्या बरोबरीचा सारथ्यकुशल मानतोस हा माझा मोठाच सन्मान आहे’ असे म्हणून त्याने संमति दिली! मात्र मी क्षत्रिय राजा व कर्ण हा अखेर सूतपुत्रच तेव्हां सारथ्य करताना मी काहीहि बोललो तरी कर्णाने ते मुकाट्याने ऐकले पाहिजे एवढीच अट घातली व नाइलाजाने दुर्योधन-कर्णाने ती मानली! १६व्या युद्धदिवशी सारथ्याला सुरवात करताना शल्य-कर्णामध्ये बरीच अश्लाघ्य वादावादी झाली. ती प्रक्षिप्त आहे असेहि मानले जाते. उलट शल्याने कर्णाची उदार मनाने भरपूर स्तुति करून ‘दुर्योधनाचे मनोरथ तूंच पूर्ण करू शकतोस तर तें तूं कर’असे म्हटले. दोन दिवस उत्तम सारथ्य करून कर्णाला अपेक्षित असलेले कौशल्य दाखवले. दुसर्या दिवशी सायंकाळी अर्जुन-कर्ण आमनेसामने येऊन जोरदार युद्ध सुरू असताना. कर्णाच्या रथाचे चाक भूमीत रुतले. गैरसमज असा आहे कीं कर्णाने शल्याला म्हटले कीं ‘तूं खालीं उतरून खटपट करून ते सोडव.’ मात्र 'मी मूर्धाभिषिक्त राजा आहे तेव्हां मी हे करणार नाहीं, तूंच खालीं उतर.’ असे शल्याने त्याला झिडकारले. त्यामुळे कर्णाला धनुष्य टाकून खालीं उतरावे लागले. मात्र प्रत्यक्षात, कर्णाने शल्याला असे म्हटल्याचा व शल्याने नाकारल्याचा उल्लेख महाभारतात मुळीच नाही. हा एक गैरसमजच आहे. मात्र कर्ण शल्याला विनवण्याच्या वा नकार ऐकण्याच्या भानगडीत पडलाच नाही. चाक बाहेर काढण्याची खटपट कर्णाला स्वतःच खाली उतरून करावी लागली. कृष्णाने अर्जुनाला स्पष्टपणे म्हटले कीं 'प्रबळ शत्रु अडचणीत आलेला असताना त्याला सवलत देण्याचा अडाणीपणा करूं नको! शहाणे लोक असे करीत नाहीत.' अर्जुनाने ते ऐकले व जमेल तसा प्रतिकार अखेरपर्यंत करतच असलेल्या कर्णाचा वध केला.