सुईच्या अग्रावर राहील एवढी भूमि
पांडवानी अज्ञातवास संपल्यावर आपल्या राज्याची मागणी केली ती दुर्योधनाने धुडकावून लावली. मग दूतांची देवघेव, आरोप प्रत्यारोप होऊन तोडगा निघेना तेव्हा खुद्द कृष्ण पांडवांतर्फे कौरव दरबारात आला व त्याने पांडवांतर्फे राज्याची मागणी केली. अनेकांनी समजावूनहि दुर्योधनाने कृष्णाने केलेले सर्व आरोप नाकारून पांडवानी अज्ञातवास पुरा केलेला नसल्यामुळे राज्य मागण्यापूर्वी त्यानी अटीप्रमाणे पुन्हा बारा वर्षे वनवास भोगावा असे म्हटले. युधिष्ठिराने युद्ध टाळण्यासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून कृष्णाबरोबर कमीतकमी पांच गावे तरी द्यावी असा निरोप पाठवला होता. ती मागणीहि दुर्योधनाने नाकारली व त्यावेळी त्याने ‘मी जिवंत आहे तोवर सुईच्या अग्रावर राहील एवढीहि भूमि देणार नाही’ असे म्हटले. हे त्याने प्रथमच स्पष्टपणे म्हटले अशी समजूत असते. मात्र तसे नाही! धृतराष्ट्रातर्फे संजयाला चर्चेच्या पहिल्याच फेरीत पांडवांकडे त्यांच्या मागणीला उत्तर देण्यासाठी पाठवले गेले होते. त्याने धृतराष्ट्राचा शहाजोग निरोप युधिष्ठिराला दिला कीं ‘सामोपचाराने दुर्योधनाने राज्य दिले तर घ्या पण नाही दिले तरी युद्ध करूं नका कारण युद्धामुळे कुलक्षय होईल व त्याला तुम्ही जबाबदार व्हाल!’तो पांडवांकडील एकूण युद्धतयारी पाहून आल्यावर धृतराष्ट्राने त्याचेजवळ सर्व माहिती बारकाईने विचारून घेतली. पांडवानी व त्यांच्या सर्व साथीदारानी संजयातर्फे जोरदार प्रत्युत्तर धाडले होते कीं मुकाट्याने अर्धे राज्य द्या नाहीतर घोर परिणामाना सज्ज व्हा. धृतराष्ट्राची घाबरगुंडी उडून त्याने दुर्योधनाला पुन्हापुन्हा समजावले कीं आपल्याकडील भीष्मद्रोणादि कोणीहि प्रमुख वीर युद्धोत्सुक नाही. तेव्हां शम करणेच बरे. तेव्हां दुर्योधनाने पित्याला दोन गोष्टी स्पष्ट केल्या. एक म्हणजे ‘माझा खरा भरवसा मी स्वतः, दुःशासन व कर्ण या तिघांवरच आहे.’ व दुसरे, ‘काही झाले तरी सुईच्या अग्रावर राहील एवढी भूमिही मी जिवंत असेपर्यंत मी पांडवाना देणार नाही.’ तेव्हा दुर्योधनाची भूमिका प्रथमपासूनच स्पष्ट व ठाम होती आणि कृष्णशिष्टाईचे वेळी त्याने तिचा पुनरुच्चार केला इतकेच. पांडवानी पांच गावांवर समाधान मानण्याचा उपयोग कधीच होणार नव्हता व शिष्टाई विफलच व्हायची होती.