अहमद अब्दाली
१७४७ मध्ये नादिर शहाला त्याच्याच लोकांनी झोपेत मारून टाकले. त्याच्या मागे त्याचा १४ वर्षांचा नातू शाह रुख मिर्झा याला कोहिनूर मिळाला. शाह रुख मिर्झा याच्या समर्थकांमध्ये एक होता अहमद अब्दाली, ज्याच्यावर खूष होऊन शाह रुख मिर्झाने कोहिनूर हिरा त्याच्याकडे सोपवला. अहमद अब्दाली कोहिनूर हिरा घेऊन अफगाणिस्तानला गेला. त्याच्यानंतर त्याचे २३ नातू सत्तेसाठी लढू लागले. सर्वात मोठा नातू जमान शाह आणि त्याचा भाऊ शाह शुजा हे दोघे कोहिनूर हिरा घेऊन लाहोरला पळून आले आणि त्यांनी तिथे शीख राजा महाराज रणजीत सिंह यांच्याकडून मदत मागितली.