चायनीज काली मंदिर, चायना टाउन - कोलकता
नवरात्र उत्सवात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. यावेळी लोक देवीच्या मंदिरांत जाऊन देवीचे दर्शन तर घेतातच, पण अनेक प्रकारचे उपास - तापास आणि व्रत पाळून देविमातेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न देखील करतात. देवीच्या या नऊ रूपांपैकी एक रूप कालीमाता हिच्या पूजेच्या संदर्भात मात्र कोलकता शहराची ओळख वेगळीच आहे. कोलकत्यात कालीमातेचे एक नव्हे तर अनेक मंदिरे बनलेली आहेत. यापैकी सर्वांत प्रसिद्ध मंदिरे म्हणजे दक्षिणेश्वरी काली, कालीघाट आणि स्वयंभवा मंदिर ही होत. इथे नवरात्र उत्सवाच्या वेळी दुर्गापूजेचे आयोजन केले जाते जे अतिशय विशेष, अद्भुत असे असते. या सर्वांपेक्षा वेगळे असलेले आणि आकर्षणाचा एक केंद्रबिंदू असलेले एक मंदिर म्हणजे कोलकत्याच्या चायना टाउन इथले कालीमातेचे मंदिर.
एकीकडे जिथे नवरात्र उत्सवाच्या दिवसात लोक उपवास करताना अगदी पाणी किंवा मीठ यांचाही त्याग करताना दिसतात, तिथे या मंदिरात चीनी लोक देवीमातेला नूडल्स, चॉप्सी, राईस (भात) आणि शाकाहारी भाज्यांचा नैवैद्य अर्पण करतात. या मंदिराला लोक चायनीज काली मंदिर म्हणून ओळखतात. प्रत्यक्षात कोलकता शहरातील चायना टाउन हा भाग, ज्याला तांगरा या नावानेही ओळखले जाते, या भागात देशातील सर्वात जास्त चीनी लोक राहतात. इथे राहणाऱ्या चीनी लोकांपैकी काही लोक बौद्ध धर्माचे उपासक आहेत, तर काही ख्रिश्चन धर्माला मानणारे आहेत, परंतु तरीही ते हिंदू धर्मियांप्रमाणे भक्तिभावाने या मंदिरात येतात आणि देवीच्या पूजा - अर्चेत सहभागी होतात. म्हणजे इथले हे चायनीज काली मंदिर नुसतीच स्वतःची वेगळी ओळख ठेवते असे नाही तर ते दोन देश आणि दोन धर्मांना एकत्र आणण्याचे काम देखील करते. हे मंदिर म्हणजे सर्वधर्म समभावाचे एक अनोखे उदाहरण आहे.
मंदिर आहे ६३ वर्षं जुने
तांगरा येथील या मंदिराबाबत असे म्हटले जाते की हे मंदिर ६३ वर्षे जुने आहे. सुरुवातीला एका पिंपळाच्या झाडाखाली शेंदूर लावलेल्या दोन छोट्या मूर्ती होत्या. एकदा एक चीनी मुलगा आणि त्याचे आई - वडील आजारपणाने हैराण होऊन इथे आले आणि पूजा केली, तेव्हापासून इथे पूजा करण्याची परंपरा सुरु झाली. देविमातेच्या त्या मूर्ती अजूनही या मंदिरात आहेत. इथे येणाऱ्या चीनी भक्तांमुळे या मंदिराला हे नाव प्राप्त झाले आहे. या परिसरात राहणाऱ्या जवळपास २००० पेक्षा जास्त परिवारातील लोक रोज या मंदिरासमोरून जाताना अनवाणी पायांनी उभे राहून हात जोडून मातेला प्रणाम करून मगच पुढे जातात. नवरात्र उत्सवाच्या वेळी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यातही इथले चीनी लोक पुढाकार घेतात.
हिंदू आणि चीनी दोन्ही पद्धतीने होते पूजा
या मंदिरात दोन धर्मांच्या लोकांमध्ये सहृदयतेचे अनोखे दर्शन घडते. इथे नवरात्र उस्तवा व्यतिरिक्त दिवाळीच्या दिवसातही विशेष आरतीचे आयोजन केले जाते ज्यात चीनी लोक भाग घेतात. इथे पूजेसाठी हिंदू धर्मातील मंत्रोच्चार आणि आरती होते, त्याचप्रमाणे चीनी लोक देखील त्यांच्या धार्मिक परंपरेला अनुसरून मेणबत्त्या, मोठ्या लांब उदबत्त्या आणि वाईट आत्म्यांना दूर पळवून लावण्यासाठी विशेष रूपाने बनवण्यात आलेले कागद जळतात.
नूडल्स आणि चॉप्सी चा नैवैद्य दाखवला जातो
हिंदू आणि चीन्मी संस्कृतीच्या मिलापाचे प्रतिक असलेले हे मंदिर देश - विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा एक केंद्रबिंदू देखील आहे. ज्या देशातील लोक देवीच्या मंदिरात प्रसाद किंवा नैवेद्य म्हणून फळे किंवा तत्सम पदार्थ चढवतात, तिथे या मंदिरात येणारे भक्त मात्र चीनी पदार्थ म्हणजे नूडल्स, चॉप्सी, राइस आणि वेजिटेबल (भाज्या) यांचा नैवेद्य दाखवतात.