कसं गावं?
जो तो पिकवितो
असत्याचे मळे;
भासवून डोळे
सत्यप्रिय.
अनीति, अन्याय
रक्तामध्ये ज्याच्या;
हातांमध्ये त्याच्या
विश्वचेंडू.
असत्याच्या हाती
अनीतिचा हात;
काजळली वात
समतेची.
असत्येश्वराचे
वाढले पुजारी;
सत्याचे कैवारी
दुर्मिळले.
कसं गावं गीत
अमर सत्याचं;
वारं असत्याचं
वाहताहे.
सत्याचा खराटा
द्या हो गाडगेबाबा;
असत्याचं गाव
झाडावया...!
कवी- मिलिंद देविदास हिवराळे (मु. पो. ता. बार्शिटाकळी, जि. अकोला)
मो.- ९४२३६०१३२० (email- milindhiwarale@yahoo.com)