Android app on Google Play

 

इस्लाम धर्म !!

इस्लामचा मूलाधार कुराणमधील मतं, आणि सर्सामान्य लोकांचा समाज यांत खूप तफावत आहे. स्त्रीचं दुय्यम स्थान हे सरावच धर्मात समान आहे. तसं जर नसतं तर बालविवाह, सतीप्रथा, केशवपन,विधवा विवाहाला अमान्यता, स्त्री शिक्षणाला बंधन यासाठी समाज सुधारकांना आपल आयुष्य वेचावं लागलं नसतं. त्याच प्रमाणे इस्लाम धर्माचा आधार घेऊन मुस्लीम स्त्रीला जबानी तलाक, द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू नसणे, पोटगीतून पुरुषांची सुटका, बुरखा सक्ती, शिक्षणाला नकार असा स्त्रियांवर अन्याय झाला नसता. खर तर मूळ धर्म कोण समजून घेतय ?

स्त्रीचा विचार एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून कुराणमध्ये केला आहे. कुराण म्हणजे आपल्या सद्सदविवेक बुद्धीला स्मरून आपल्या आत्म्याचा आतील आवाज ओळखून वागण्याचा सल्ला देणारा ज्ञान प्रकाशाचा रस्ता आहे. "खुद" आणि "खुदा" आत्मा आणि परमात्मा अद्वैत आहे. स्वतःतील परमेश्वरी अंशाचा शोध म्हणजे कुराण.सहवेदना, माणुसकी, कृतज्ञता म्हणजे नमाज, रोज, जकात. अभावग्रस्तांचे दुःख समजून घेण्यासाठी उपवास म्हणजे रोज आहे. सृष्टीकर्त्याने जे दिले आहे ; त्या सर्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, अहंकारमुक्त राहणे म्हणजे नमाज, प्रथांना आहे. आपण समाजाचं देणं लागतो, आपल्यातील काही हिस्सा अभावग्रस्तांना देणं म्हणजे " जकात ". ते सुद्धा देण्याचा अहंकार न बाळगता घेणाऱ्याला संकोच वाटू न देता, गजवज न करता दिलेलं दान म्हणजे " जकात " या सगळ्याचं पालन न करणारा म्हणजे " काफिर " मग तो मुसलमानही असू शकतो. " काफिर " म्हणजे हिंदू नव्हे.

इस्लामचे प्रेषित महंमद पैगंबरांनी मानवाला सही जीवन जगण्याचा रस्ता दाखवला आहे. " तलाक " हि कोणत्या स्थितीत, का, केव्हा, कसा द्या याबद्दल मशवरा दिलेला आहे. बहुविवाहाबद्दलाही charcha आहे. एवढ्याशा कारणावरून तलाक देणे जसे मान्य नाही तसेच ऐय्याशीसाठी बहु विवाह काबुल नाहीत. प्रत्येक मुस्लिमाने " कुराण " आपापल्या मातृभाषेत समजून तरी घ्यावा म्हणजे बरेच गैरसमज तरी टळतील. इतरांनी सांगणे आणि स्वतःहून समजून घेणे यांत खूप अंतर आहे.

दारिद्र्य, अज्ञान यांत पिचणारा, संख्येनं अल्प असणारा मुस्लीम वर्ग मेंढरासारखा राजकारणी, धर्म्कारणी लोकांचा पुन्हा-पुन्हा शिकार होत आहे. शिक्षणापासून दूर राहणारा समाज प्रगतीपासून, मुख्य प्रवाहापासून दूर राहतो आहे. खेदाची गोष्ट आहे कि धर्माच्या मक्तेदारांना आणि राजकीय नेत्यांना या समाजाला असचं राहू देण्यात स्वारस्य आहे.
मागासवर्गीयांना बाबासाहेबांसारखे नेते लाभले पण मुस्लिमांच्या प्रश्नांची खरोखर तळमळ असणारा कुणीही नेता लाभला नाही. स्वातंत्र्य प्राप्तीला अर्ध शतक लोटल्यानंतर मुस्लिमांना आपल्याला आरक्षण हवे हि जग आली. अगोदरच अल्पसंख्याक समाज त्यातही आता मुस्लीम ओ.बी.सी. संघटना, मुल्ला-मुल्लाणी संघटना अशा वेगवेगळ्या संघटना आणि त्यांचे नेते मिळून या समाजाचा खिमा करत आहेत. मुस्लिमांच्या प्रश्नाचं भांडवल करून काही स्वार्थी, संकुचित मनोवृत्तीची तथाकथित नेते मंडळी स्वतःच्या तुंबड्या भरत आहेत. याउलट सर्वांनी एकत्रितपणे येऊन मुस्लीम समाज जीवनाच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्या प्रश्नांच्या निर्गतीसाठी प्रयत्न करायला हवेत.

शिक्षण, दारिद्र्य, बेरोजगारी, अज्ञान, स्त्री विषयक प्रश्न, वैज्ञानिक दृष्टीकोन असे कितीतरी प्रश्न आहेत ज्यासाठी एकोप्याची गरज आहे पण उलटच होत आहे. शिक्षणाच्या प्रवाहात खूप कमी लोक आहेत. शैक्षणिक प्रगतीशिवाय अन्य कोणतीही प्रगती होऊ शकत नाही. आर्थिक सुबत्ता म्हणजे प्रगती नव्हे. ती केवळ सूज आहे. खरी सुदृढता किंवा बाळसं नव्हे.

लेखं- जितेंद्र माने (प्रबोधन टीम) (मुंबई)
संदर्भ- आशा आपराद .(भोगले जे दुःख त्याला... या आत्मचरित्रातून साभार.)