Android app on Google Play

 

गोष्ट फार जुनी आहे !!

एक माणूस तीर्थयात्रेला निघाला होता. एकटाच होता. पायाखाली वाट तुडवत , मजल दरमजल करत त्याला एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पोचायचे होते. वेगवेगळे संकल्प मनाशी घेऊन, असंख्य विचारांचे ओझे घेऊन, संसाराच्या आठवणीत रमत गमत तो चालला होता.
एखादा माणूस कितीही खराखुरा भाविक असला, तरी मोह नावाची गोष्ट त्याला सोडत नाही. किंवा देवावर थोडासा अविश्वास असेल कदाचित... म्हणून त्याच्या मनात
अनेक शंका येत होत्या. अशीच एक शंका त्याच्या मनात आली कि, त्या ठिकाणी गेल्यावर आपली चप्पल चोरीला गेली तर काय करायचे ..?? कारण त्या क्षेत्राच्या ठिकाणी त्याला दहा दिवस उत्सवासाठी राहायचं होतं. मग त्याला वाटलं , आपण तिथे नकोच न्यायला चप्पल.. त्या तीर्थाच्या अलीकडे एक मैलभर अंतरावर त्याने ती चप्पल एका मोठ्या दगडाखाली लपवली. आणि तो अनवाणी चालू लागला. पुन्हा शंका आली मनात, चप्पल ठेवली खरी.. पण परत आल्यावर दगड कसा सापडणार?? मग त्याने पटकन येऊन त्या दगडावर जवळ असलेला शेंदूर फासला आणि तो निघाला.
तो तीर्थाच्या ठिकाणी पोचला. दर्शन घेतले. उत्सवात सहभागी झाला. सगळे पूजाविधी यथासांग पार पडले. दहा दिवस आनंदमय वातावरणात सगळे पार पाडून तो परतीच्या प्रवासाला निघाला. मैलभर चालून आल्यावर त्याला चपलेची आठवण आली. आणि तो चप्पल ठेवलेला दगड शोधू लागला. पण त्याला तो दगड सापडेचना. त्याला नवीकोरी चप्पल गमावल्याचे दुःख झाले.
आणि अचानक त्याला एका ठिकाणी गर्दी दिसली. तो तिथे जाऊन पाहू लागला, तर एका देवाभोवती अनेक लोक उभे राहून दर्शन घेत होते. त्यानेही दर्शन घेतले आणि माझी चप्पल सापडू दे, म्हणून प्रार्थना केली. संध्याकाळ झाली, गर्दी कमी झाली. तो तिथेच थांबला.आणि त्या देवाखाली त्याला चप्पल सापडली. मग सगळा गोंधळ त्याच्या लक्षात आला. मनाशीच हसला आणि रात्र झाली म्हणून त्याच देवाला डोके टेकवून झोपला. सकाळ झाली, लोक पुन्हा दर्शनाला आले. पाहतात तर काय, हा मनुष्य देवाला टेकून झोपलेला.. लोकांना राग आला. त्यांनी त्याला मारायला सुरुवात केली. तो ओरडता ओरडता तो दगड आहे, असे म्हणाला, तेव्हा तर लोकांचा प्रक्षोभ झाला. बेदम मार देवून त्यांनी त्याचा जीव घेतला.
गोष्ट संपली नाही. त्या ठिकाणी अनेक लोक येऊ लागले. दक्षिणा घेणारे तयार झाले. वर्गण्या. देणग्या जमा करून मंदिर तयार झाले. नवसाला पावू लागला देव. लोकांची रीघ लागत राहिली. अशातच कुणाला तरी मेलेला माणूस देवाचा अंश असल्याचा साक्षात्कार झाला. झालं... त्याचंही मंदिर तयार झालं.. भक्तांचा ओघ वाढत राहिला. जागृत देवस्थान म्हणून नावलौकिक वाढू लागला. यात्रा उत्सव भरू लागले आणि माणसाच्या उद्धारासाठी आणखी एक ठिकाण नावारूपाला आलं .
श्रद्धा असुद्या रे बाबांनो.... पण सत्य पडताळून पाहत जा. बुद्धीच्या कसोटीवर जे उतरेल तेच स्वीकारा. आणि आणखी एक महत्वाचं... कुठेही दर्शनाला, फिरायला गेलात, तर चप्पल हरवली तरी चालेल, पण कुठेही काढून ठेवू नका. कारण हरवलेली चप्पल मिळेल, पण माणूस हरवत राहिला, तर खूप कठीण होत जातं शोधायला...
लेखं - रवि मेमाणे(पुणे)