Android app on Google Play

 

कालगती !!

काळ तर मोठा कठीण आला असं प्रत्येकच काळात का म्हटलं जात असेल काळाचा महीमा काही वेगळा हे खरंच या काळावर किती प्रकारे बोलतो आपण आणि किती वेळा काळ आला होता पण वेळ आली नव्हती काळाचं गणित. काळाच्या पडद्याआड जाणं काळवेळ नसणं अशाप्रकारचे भाषेतले वाक्प्रचार या काळाचं महत्व अधोरेखित करताना दिसतात हा काळ मानवी जीवनावर खूप प्रभाव टाकतो नाही.

तसं पाहायला गेलं तर निसर्ग, सृष्टी अजून तीच आहे.... पृथ्वी तीच आहे... चंद्र, सूर्य आकाश तेच आहेत... मानवी जीवन, त्याच्यातील ताण-तणाव, संघर्ष पुराणकालापासून तेच आहेत.... तरीदेखील आपल्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर आपण काळ बदलला असंच का बोलत असतो....काळ खरंच बदलतोय का..... बदलते ती भवतालची आपणच निर्माण केलेली परिस्थिती... ती देखील बारकाईने पाहीलं तर काही विशेष बदललेली नसते... ठळक बदल जाणवतात ते फक्त अर्थकारण आणि वैज्ञानिक प्रगतीत.... बाकी आपल्या जगण्यात विशेष काही फरक पडत नाही.... तरी आपण आमच्या काळी असं होतं.... किंवा आमच्या काळी तसं नव्हतं.... हल्लीचा काळ..इ.इ. प्रकारची पालुपदं आळवतच असतो.

एक आहे की काळ आपल्या शरीरावर नक्कीच परीणाम करतो.... अगदी ठळकपणे... आपल्या बाह्य, दृश्य शरीरावर काळाचे ठसे रोजच्या रोज उमटतात... कालचे आपण आज दिसत नसतो...... त्वचा, चेहरा, केस, इंद्रीये यांच्यावर काळ आपली कारागिरी रोजच करत असतो..... रोज आपल्या शरीरावर तो वेगळं शिल्प घडवत असतो म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही..... पण माणसाच्या अंतर्मनावर काळ खरंच काही परिणाम करतो का....काळाप्रमाणे माणसाचा स्वभाव, आवडीनिवडी बदलतात का... किंबहुना आपण तसं बदलण्याचा प्रयत्न करतो का.... भवतालच्या बदलत्या परिस्थितीशी वर्तमान समांतर राहतो का हे महत्वाचं आहे... आमच्यावेळी असं नव्हतं..... तसं नव्हतं म्हणत आपण नकळतपणे जुनेपुराणे होत जातो... पुन्हा तीच जनरेशन गँप जिवंत ठेवत जातो आणि आपणच म्हणतो काळ बदलला.

माणसांच्या वागण्याची कधी कधी खूप गंमत वाटते मला.... सर्वसाधारणपणे बहुतेक माणसाचे विचार, त्याचे समज-गैरसमज, ब-या-वाईटाच्या त्याच्या कल्पना या त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे सर्वसाधारणपणे पंचविशीपर्यंत घडून पक्क्या झालेल्या असतात. तोपर्यंतचा काळ हा त्याला त्याचा काळ वाटत असतो..... पण त्यानंतर त्याची काळाशी नाळ तुटायला सुरुवात होते.... मग तो शरीराने वर्तमानकाळात असतो बहुधा परंतु मनाने एकतर भुतकाळात रमायला सुरूवात होते किंवा भविष्यकाळात तरी... शाळा कॉलेज सोडून ब-यापैकी थोडा काळ उलटला, लग्न वगैरे झालं की तो आमच्यावेळी असं नव्हतं.... किंवा असं होतं... या पालुपदाला हळू हळू सुरुवात करू लागतो..याची सुरुवात बहुधा शाळा या विषयापासून होते....आमची शाळा, आमचे शिक्षक.... आता तशा शाळा राहिल्या नाहीत...तसे शिक्षक नाहीत इथपासून ते फणसाची भाजी आई काय बनवायची..... ती चव आता नाही..... (मग बायकोने अगदी जीव ओतून केलेले पदार्थ खाऊनच आपल्या शरीराची शेंग होती तिचा आता भोपळा झालाय हेही विसरलं जातं.....) ती माया नाही... ते प्रेम नाही.. आमच्यावेळचं संगीत नाही... तशी नाटकं नाहीत... सिनेमे नाहीत..नेते नाहीत.. मुलांना शिस्त नाही...

आमच्या वेळी आईबाबांनी नुसतं डोळे मोठे करून पाहिले तरी आम्ही समजून जात असू असा हा आमच्यावेळचा पाढा जो सुरू होतो तो आयुष्याच्या अंतापर्यंत सुरूच राहतो..... मग तो हेही विसरून जातो की आपले आजोबा शेंडी ठेवत होते पण बाबा नव्हते ठेवत आणि आपण मानेपर्यंत केस वाढवून कल्ले ठेवत होतो अमिताभसारखे जे आपल्या बाबांना तेव्हा नव्हतं आवडत तरी हट्टाने आपण ते तसेच ठेवले होते....आणि आता डोक्यावर चंद्र उमटून बाजूला कुंपण राहीलं तरी कल्ले मात्र ते तसेच ठेवलेत...... बरं हे फक्त पुरुषांचंच नाही....यात स्त्रियाही आल्याच.... बायका देखील हल्लीच्या मुलींच्या कपड्यांना काही ताळतंत्रच नाही असं पालुपद सतत घोळवत असताना आपल्या आजीची नऊवारी आईने नाकारली होती आणि पंजाबी ड्रेस तसंच बँकलेस, मोठ्या गळ्यांचे ब्लाऊज घालून आपण आईच्या दोन पावलं पुढं आलो होतो हे सोयीस्कर विसरतात.....

पाणी वाहतं असतं तोपर्यंत ते स्वच्छ निरामय राहतं.....पण ते अडकलं तर त्यात कचरा, घाण साचत राहणारच...... तसंच आपल्या पंचविशीच्या काळातच मनाने अडकून न राहता आताचा जो काळ आहे तो पण आपलाच आहे असं मानून त्यानुसार जगत राहिलो तर प्रत्येक काळ हा आपलाच असतो... त्यामुळे मला स्वतःला तरी असं वाटतं की आमच्या काळी असं म्हणून भुतकाळात न जगता वर्तमानकाळातील वास्तव परिस्थिती अंतर्बाह्यरित्या स्विकारली आणि भविष्याची उमेद कायम ठेवली तर आपल्याला पुढील पिढीला दुषणं ठेवावीशी वाटणार नाहीत...आणि आपणही त्यांच्या बरोबर अधिक निरागसतेने हे जीवन जगत राहू !!

लेखं - अलका असेरकर(मुंबई)