साम्राज्यवादाची विविध रूपे
युरोपीय राष्ट्रांनी साम्राज्यवादी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपापल्या गरजेनुसार आशिया आणि आफ्रिका खंडावर वेगवेगळ्या प्रकारे आपले वर्चस्व प्रस्थापित केेले. राजकीय गुलामगिरी लादणे, एखाद्या देशाला संरक्षण देउ करणे, व्यापारी करार परक्या देशांच्या गळी उतरवणे, स्वत:ची व्यापारी मक्तेदारी निर्माण करणे आणि जेथे शक्य असेल तेथे फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करणे यांचा समावेश होता.
साम्राज्यविस्तार केलेल्या प्रदेशांत ख्रिस्ती धर्माचा प्रसार करून साम्राज्यवादी राष्ट्रांनी आशिया आणि आफ्रिका खंडावर आपली संस्कृती लादण्याचा प्रयत्न केला. औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात आर्थिक साम्राज्यवादाचे स्वरुप अधिक व्यापक बनले. कच्चा मालासाठी वसाहती काबीज करणे आणि त्याच प्रदेशात पक्क्या मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठा उपलब्ध करणे, लष्करीदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे आपल्या ताब्यात घेणे, आपल्या ताब्यातील वसाहतींची आर्थिक लूट करणे आणि स्वत:च्या देशाची अर्थव्यवस्था संपन्न करणे, त्यासाठी त्यांनी वसाहतींवर वेगवेगळे निर्बंध लादले आणि आपल्या देशासाठी अनेक सवलती मिळविल्या.