आफ्रिकेतील साम्राज्यवाद
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत आफ्रिकेचा अंतर्गत भाग पाश्चिमात्यांना फारसा माहित नव्हता. आफ्रिका खंडामध्ये घनदाट जंगले, विस्तीर्ण सरोवरे, बारामाही वाहणाऱ्या विशाल नद्या, मोठी वाळवंटे मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे आफ्रिकेच्या अंतर्गत भागाचा शोध घेण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही. म्हणून १८व्या शतकापर्यंत आफ्रिका खंड अज्ञात खंड म्हणून ओळखले जात असे.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर मात्र युरोपातील धाडसी प्रवासी मंगोपार्क, कॅप्टन स्पेक, सर सॅम्युअल बेकर, डेव्हिड लिव्हिंस्टन, स्टॅन्ले यांनी भगीरथ प्रयत्न केले व आफ्रिकेतील नाईल, नायजर, कांगो, झांबेझी इत्यादी नद्यांची खोरे प्रकाशात आणली. त्यानंतर अमेरिकन पत्रकार स्टॅन्लेने लिहिलेल्या प्रवासवर्णनाने युरोपियन लोकांच्या मनात आफ्रिकेविषयी आकर्षण निर्माण झाले. युरोपमध्ये आफ्रिकेत वसाहती स्थापन करण्यास अनुकूल लोकमत तयार झाले. पुढील काळात आफ्रिकेतील उत्तमोत्तम प्रदेश आपल्या ताब्यात घेण्यासाठी युरोपीय राष्ट्रांमध्ये स्पर्धा सुरू झाली. यातून आफ्रिकेत साम्राज्यवादाचा उगम झाला.