Android app on Google Play

 

साम्राज्यवादाचे परिणाम

 

इतरांच्या प्रदेशावर वर्चस्व निर्माण करण्याची आधुनिक काळातील साम्राज्यलालसा जगाच्या इतिहासावर दूरगामी परिणाम करणारी ठरली. या साम्राज्यवादाचे जगावर इष्ट आणि अनिष्ट असे दोन्ही प्रकारचे परिणाम घडून आले.


साम्राज्यवादाचे इष्ट परिणाम


भौतिक सुधारणा

युरोपियांनी वसाहतींवर आपला अंमल राखण्यासाठी काही सुधारणा केल्या. सैन्याच्या जलद हालचालींसाठी व अंतर्गत दळणवळासाठी रस्ते, रेल्वे, पोस्ट, तारयंत्रे, विमाने, कालवे इ. सोयी उपलब्ध केल्या. या भौतिक सुधारणांचा जसा पाश्चाच्यांना फायदा झाला तसा तेथील जनतेला झाला. तसेच लोक एकमेकांच्या जवळ येऊन त्यांच्यात वैचारिक देवाण-घेणाव सुरू झाली.


शिक्षणाचा प्रसार

साम्राज्यवादी राष्ट्रांनी आपल्या व्यापाराच्या भरभराटीसाठी व धर्मप्रसारासाठी काही ठिकाणी मानवतावादी दृष्टीने शिक्षणाला चालना दिली. पाश्चात्य राष्ट्रातील शिक्षणाचे वारे वसाहतीतही वाहू लागले. वसाहतीतील कारभार पाहण्यासाठी आपल्या देशातून लोकांना आणण्यापेक्षा स्थानिक लोकांनाच शिक्षण देऊन कारकून बनविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यातूनच वसाहतींत शिक्षणाचा प्रसार होत गेला.


वैचारिक परिवर्तन

जगाच्या कानाकोपऱ्यातील विचार साम्राज्यवादामुळे एकमेकांना समजू लागले. वसाहतीतील लोक युरोपियांच्या संपर्कात आल्यानंतर पाश्चात्यांच्या नवीन विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. पाश्चात्य राष्ट्रांनीच नव्या कल्पना, शास्त्र, विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य, कायदा, राज्यपद्धती यांची ओळख वसाहतीतील लोकांना करून दिली. त्यांच्यामुळेच स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रवाद, समाजवाद, साम्यवाद, लोकशाही या प्रगत विचारांची ओळख वसाहतवाल्यांना झाली. त्यामुळे समाजसुधारक, धर्मसुधारक, विचारवंत यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा नाहीसे करून पुरोगामी विचार रुजविण्याचा प्रयत्न केला.


नवनेतृत्वाचा उदय

युरोपियन राष्ट्रांनी आफ्रिका, आशिया खंडावर आपले प्रभुत्व निर्माण केले होते. वसाहतीमधील राजसत्ता, सरंजांमदार यांचा त्यानी बिमोड केला आणि एकछत्री अंमल निर्माण केला. पाश्चात्य शिक्षणाने जागृत झालेल्या मध्यमवर्गाने पाश्चात्यांचा साम्राज्यवादास विरोध सुरू केला. अशाप्रकारे मध्यमवर्गामधून पुढे आलेल्या लोकांनी नेतृत्व करून स्वातंत्र्यलढे यशस्वी केले.


साम्राज्यवादाचे अनिष्ट परिणाम

गुलामांचा व्यापार

साम्राज्यवादाचा सर्वात मोठा अनिष्ट परिणाम म्हणजे आफ्रिका खंडात गुलामांचा व्यापार मोठ्या प्रमाणात फोफावणे होय. साम्राज्यवादी राष्ट्र वसाहतीतील लोकांना अमानुष वागणुक देत होते. त्यांनी स्वस्त दरात मजूर मिळावेत म्हणून गुलामांचा व्यापार सुरू केला. त्यामुळे वसाहतीतील लोकांचा जीवन हलाखीचे व कष्टाचे झाले.


नीतीमूल्यांचा ऱ्हास

आपले राज्य टिकावे याकरिता राज्यकर्तांनी फोडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबिले. त्यांनी वसाहतीतील वेगवेगळ्या जमातीत भाडणे लावून त्यांच्यात द्वेष भावना निर्माण केली. द्वेष, हिंसा, स्वार्थीपणा, भोगविलासी वृत्ती यामुळे सुखी जीवन जगणाऱ्या वसाहतीत नीतीमूल्यांची पायमल्ली होत राहिली. त्यामुळे वसाहतीतील वातावरण द्वेषाचे झाले.


आर्थिक पिळवणूक

आपल्या कारखानदारीकरीता कच्चा माल मिळवणे व पक्क्या मालाची बाजारपेठ मिळवणे यासाठी युरोपीय राष्ट्रांत स्पर्धा सुरू झाली. त्यांनी मागास प्रदेशावर ताबा मिळवून वसाहतींची आर्थिक पिळवणूक केली. त्यामुळे एकेकाळी समृद्ध असलेली ही राष्ट्रे दरिद्री बनली.


मागासलेली राष्ट्रे पारतंत्र्यात

आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी साम्राज्यवादी राष्ट्रांनी मागासलेल्या प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित केले. तेथील लोकांवर आपल्या मर्जीप्रमाणे राज्यकारभार केला. साम्राज्यवादाने जगातील अनेक राष्ट्रे पारतंत्र्यात जखडली गेली. साम्राज्यवादी राष्ट्रांच्या प्रभावाखाली दडपलेल्या राष्ट्रांना मुक्ती मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.

शस्त्रास्त्र स्पर्धा
युरोपीय राष्ट्रातील साम्राज्यस्पर्धेमुळे जागतिक राजकारणातील तणाव वाढत गेले. प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राच्या धोरणाविषयी साशंक बनले. प्रत्येक राष्ट्र आत्मरक्षणासाठी लष्कर तयार करू लागले. शस्त्रास्त्र निर्मितीत स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक साम्राज्यवादी राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राकडे संशयाने पाहू लागले. इतरांवर राज्य करण्याची आसुरी वृत्ती साम्राज्यवादाने उदयास आली. छोट्या-मोठ्या संघर्षाचे मोठे रूप निर्माण होवू लागले. त्यामुळे साम्राज्यवादातूनच पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडून इ.स. १९१४ साली पहिल्या महायुद्धाचा भडका उडाला.