Get it on Google Play
Download on the App Store

शुक्र ग्रह

सूर्यमालेमध्ये शुक्र हा सूर्यापासून बुधानंतर, आणि पृथ्वीअगोदर येणारा क्रमाने दुसरा ग्रह आहे. जरी सर्व ग्रहांच्या भ्रमणकक्षा लंबगोलाकार असल्यातरी शुक्राची भ्रमणकक्षा जवळजवळ वर्तुळाकार आहे. याचा व्यास १२,१०४ कि. मी. एवढा आहे. शुक्र देखील अंतर्वर्ती ग्रह आहे. यामुळेच शुक्रदेखील आपल्याला आकाशात फक्त सकाळी किंवा संध्याकाळीच दिसतो. या ग्रहावर वातावरण अतिशय दाट असल्यामुळे सूर्याचा शुक्रावर पडलेला प्रकाश मोठ्याप्रमाणात परावर्तित होतो. म्हणून शुक्र आपल्याला इतर ग्रहांपेक्षा अधिक तेजस्वी दिसतो.


शुक्र पृथ्वीहून जास्त सूर्याजवळ असल्यामुळे आकाशात नेहमी सूर्याच्या दिशेकडे दिसतो. त्यामुळेच तो पहाटे किंवा संध्याकाळी क्षितिजावर दिसू शकतो. जर तो जास्त प्रखर बनला तर दिवसाही दिसू शकतो. शुक्र हा सूर्य व चंद्रापाठोपाठ पृथ्वीवरून तेजस्वी दिसणाऱ्या चांदण्यांत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची तेजस्विता -४,६ आहे. तो अंत्यर्वर्ती ग्रह असल्याने तो सूर्यापासून कधीच दूर दिसत नाही. तो जास्तीत जास्त तो ४७.८ अंशापर्यंत दूर जाऊ शकतो. त्याची तेजस्विता ही सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी सर्वांत जास्त असते त्यामुळेच त्याला पहाटेचा तारा किंवा सायंतारा असेही म्हणतात.

शुक्र हा ग्रह घन पृष्ठभाग असणारा ग्रह आहे. म्हणजे त्याचा पृष्ठभाग हा पृथ्वीप्रमाणे खडकाळ आहे. आकार व वस्तुमानाच्या बाबतीत तो पृथ्वीशी कमालीचा मिळताजुळता आहे इतका की कित्येकदा त्याला पृथ्वीचा जुळा ग्रह असेही म्हणतात. शुक्राचा व्यास पृथ्वीच्या व्यासापेक्षा फ़क्त ६६० कि.मी.ने कमी आहे तर त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या ८१.५% इतके आहे. मात्र त्याचे वातावरण मात्र अत्यंत दाट कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीपेक्षा अत्यंत वेगळे आहे.