रचना
सूर्यमालेतील प्रमुख वस्तू म्हणजे सूर्य होय. सूर्याचे वस्तुमान सूर्यमालेतील एकंदर ज्ञात वस्तुमानाच्या सुमारे ९९.८६% इतके आहे. इतक्या प्रचंड वस्तुमानामुळेच सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती इतर वस्तूंना त्याच्या भोवती फिरावयास लावते.उरलेल्या वस्तुमानाच्या ९०% पेक्षा अधिक वस्तुमान हे गुरू व शनी या ग्रहांमध्ये आहे.
सूर्याभोवती फिरणार्या जवळजवळ सगळ्या मोठ्या वस्तू एकाच पातळीत सूर्याभोवती फिरतात. ग्रहांची परिभ्रमणाची पातळी ही पृथ्वीच्या भ्रमणाच्या पातळीच्या जवळपास आहे तर धूमकेतू व कायपरचा पट्टा यांची परिभ्रमणाची पातळी ही पृथ्वीच्या भ्रमणाच्या पातळीशी काही अंशांचे कोन करते.
सूर्याच्या भोवती फिरणारे ग्रह व इतर अनेक वस्तू या सूर्याभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. याला काही अपवाद आहेत, उदा. हॅले धूमकेतू.
सूर्याच्या भोवती फिरणार्या वस्तू या केप्लरच्या सिद्धान्ताप्रमाणेच फिरतात. प्रत्येक वस्तू ही एका लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते त्या कक्षेच्या एका केंद्रस्थानी सूर्य असतो. सूर्याच्या जितक्या जवळ ती वस्तू येईल, त्याप्रमाणात तिचा फिरण्याचा वेग वाढतो. ग्रहांच्या कक्षा या जवळ जवळ वर्तुळाकार आहेत (म्हणजे दोन्ही केंद्रस्थाने खूप जवळ आहेत), तर धूमकेतू व कायपरचा पट्ट्यातील काही वस्तूंच्या कक्षा या फारच लंबवर्तुळाकार आहेत.
सूर्यमालेत असणारी खूप लांब अंतरे दाखविण्यासाठी अनेक जण ग्रहांच्या कक्षा या सारख्या अंतरावर दाखवितात. पण प्रत्यक्षात मात्र ग्रह सूर्यापासून जितका दूर तितकीच आधीच्या ग्रहापेक्षा त्याची कक्षा लांब अंतरावर आढळते. उदा. शुक्र हा बुधापासून ०.३३ AU अंतरावर आहे, तर शनी हा गुरूपासून ४.३ AU इतका दूर आहे. तसेच नेपच्यूनची कक्षा ही युरेनसपेक्षा १०.५ AU इतक्या अंतरावर आहे. अनेक जणांनी या अंतरांमधील संबंध शोधण्याचे प्रयत्न केले आहेत, पण अजूनतरी याबद्दल समाधानकारक स्पष्टीकरण उपलब्ध नाही.