कुत्रा आणि हंसी
एका तलावाकाठी एक हंसी आपल्या पिलांसह राहात असे. त्या तलावाची मालकी माझ्याकडे आहे अशा समजुतीने ती इतर प्राण्यांना तिकडे फिरकू देत नसे. 'हा तलाव माझा आहे अन् जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ह्या तलावाचं पाणी दुसर्या कोणत्याही प्राण्याला मी पिऊ देणार नाही.' असे ती म्हणे. बदक, कोंबड्या, डुकरे व मांजरे त्या तलावाकडे गेली तर ती त्यांना हाकलून देत असे.
एकदा एक मोठा शिकारी कुत्रा रानात फिरून दमला असता, तेथे पाणी पिण्यास आला. त्याला पाहताच हंसी मोठ्या रागाने त्याच्यावर तुटून पडली व आपल्या चोचीने त्याला टोचू लागली. ह्या वागणूकीचा कुत्र्याला फार राग आला व तिला चांगले शासन करावे असे त्याला वटले, पण क्षणभर विचार करून त्याने आपला राग आवरला व तो तिला म्हणाला, 'तुझ्यासारख्या मूर्खाचा धिक्कार असो. ज्याच्याजवळ लढाई करण्याचं सामर्थ्य नाही किंवा शस्त्रेही नाहीत, त्याच्या अंगी निदान थोडीशी सभ्यता तरी असावी.' इतके बोलून त्या हंसीकडे लक्ष न देता तो भरपूर पाणी प्याला व आल्या वाटेने चालता झाला.
तात्पर्य
- प्रत्येकाच्या अधिकाराला मर्यादा असते, हे लक्षात ठेवून ज्याने त्याने आपला अधिकार गाजवावा.