मधमाशी व साधी माशी
एका मधमाशीने एक साधी माशी आपल्या पोळ्याजवळ आनंदाने उडत असताना पाहून तिला रागाने विचारले, 'तू इथे काय करतेस ? हवेतल्या राण्यांच्या संगतीत आगंतुकासारखे शिरणे तुझ्यासारखीला योग्य आहे काय ?' यावर साधी माशी म्हणाली, 'खरोखरच तुला राग यायला मोठे कारण घडले यात संशय नाही, तुझ्यासारख्या भांडखोर प्राण्याशी संबंध ठेवणारे वेडे असले पाहिजेत, असं मला खात्रीनं वाटतं.' रागानं संतापलेल्या मधमाशीने विचारले, 'असं का ? हे मला सांग बरं ! आमचे कायदे उत्तम असून आमचे राज्य जगात सर्वोत्कृष्ट धोरणावर चाललेलं आहे. आम्ही अत्यंत सुवासिक फुलांवर आमची उपजीविका करून मध तयार करण्याचं काम करतो, तो मध अमृतासारखा गोड असतो. त्याउलट तू नेहमी कुजलेल्या पदार्थांवर आपली उपजीविका करतेस.' माशी म्हणाली, 'आम्हाला जसं राहाता येतं तसं आम्ही राहतो, मला वाटतं की गरिबी हा काही दोष नाही, पण राग हा खात्रीने दोष आहे. तुम्ही तयार केलेला मध गोड असतो हे मला मान्य आहे, पण तुमचं अंतःकरण मात्र द्वेषानं पूर्ण कडवटलेले आहे, कारण, शत्रूवर सूड उगविण्याच्या भरात तुम्ही तुमचा स्वतःचाही नाश करून घेता व रागात तुम्ही इतका अविचारीपणा करता की शत्रूपेक्षा तुम्ही आपलं स्वतःचंच अधिक नुकसान करून घेता. बुद्धी कमी असलेली एक वेळ परवडेल, पण तिचा आपल्याला जास्त शहाणपणाने उपयोग करता आला पाहिजे, हे लक्षात ठेवाल तर बरं होईल.'
तात्पर्य
- उत्तम गुणाचा वाईट उपयोग करणारे लोक आहेत.