कबुतरे, घार आणि ससाणा
एका खुराड्यात काही कबुतरे होती. त्यांच्या डोक्यावर एक घार फिरत आहे असे पाहून ती घाबरली आणि जवळच एक ससाणा बसला होता त्याला घारीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी विनंती केली. ती विनंती ऐकून ससाणा त्यांच्या खुराड्यात जाऊन बसला, परंतु घारीकडून एका वर्षात मारली गेली नसती इतकी कबुतरे त्याने एका दिवसात मारून खाल्ली, हे पहाताच कबुतरांना मोठा पश्चात्ताप झाला.
तात्पर्य
- एका शत्रूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दुसर्या भयंकर शत्रूस घरात घेणे म्हणजे स्वतःचा नाश करून घेणे होय.