मांजर व उंदीर
एका घरात फार उंदीर झाले होते. तेथे एक मांजर आले. त्याने बरेच उंदीर खाऊन टाकल्यावर बाकीच्या उंदरांनी एकत्र होऊन निश्चय केला की, वरून खाली कोणीही उतरू नये. त्या दिवसापासून मांजराच्या हाती एकही उंदीर लागला नाही. मग ते उपाशी राहू लागले असता त्याने एका खुंटीला आपले पाय अडकवून व डोके खाली करून मेल्याचे सोंग घेतले. ते पाहून एका म्हातारा उंदीर म्हणाला, 'अरे तू खुशाल टांगून घे किंवा अजून वाटेल ते ढोंग कर, तुझं पोट फाडून त्यात पेंढा गवत भरलेल्या स्थितीत जरी तुला पाहिलं तरी आता आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही.'
तात्पर्य
- घातकी, कपटी व ठक यांचे बोलणे व करणे खरे समजून लोक फसतात, पण ज्यांना त्यांचे खरे रूप कळले आहे असे लोक सहसा फसत नाहीत.