निरुद्योगी माशी
एकदा एक मधमाशी आपल्या मनाशीच विचार करू लागली की, 'मी सारखं कामाला जुंपलेलं असावं असं का? ही फुलपाखरं पहा ! किती आनंदात वेळ घालवतात. मीसुद्धा त्यांच्यासारखं का होऊ नये ?' त्या दिवसापासून तिने काम करायचं सोडले. इतर मधमाशांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण तो फुकट गेला. असे होता होता पावसाळा आला व पाऊस पडू लागला तेव्हा ती मधमाशी पोळ्याजवळ आली, पण त्याची सर्व दारे बंद झाली होती. शेवटी भुकेने व थंडीने ती मरण पावली.
तात्पर्य
- स्वतःच्या पोटाकरता कसलातरी उद्योग करणे योग्य.