कोल्हा आणि नाग
एक कोल्हा एकदा त्याला राहण्यासाठी एक बीळ खणीत होता. खणत असताना तो बराच खोल गेला तर तेथे एक म्हातारा नाग त्याला दिसला. त्याला पाहाताच कोल्ह्याला फार भीती वाटली. तो नम्रपणे नागास म्हणाला, 'आजोबा, आपली मी झोपमोड केली याबद्दल मी आपली क्षमा मागतो. पण आपण इथं जे रात्रंदिवस बसून राहता त्यात आपल्याला काय सुख मिळतं ?' नाग त्यावर म्हणाला, ' बाबा, माझं नशीबच तसं त्याला काय करणार ?' कोल्हा म्हणाला, 'पण इथे खूप धन असूनही तुम्हाला चैन करताना मी पाहात नाही, किंवा आपण एक पैसासुद्धा कोणाला देत नाही. तर या धनाचा उपयोग काय?' नाग म्हणाला, 'ते मला समजत नाही. पण मला त्याचं रक्षण करायला देवानं सांगितलं आहे. नशिबात असेल ते भोगल्यावाचून सुटका नाही.' कोल्हा म्हणाला, 'तर मग मी धनवान नाही हे देवाचे माझ्यावर मोठे उपकारच आहेत. कारण तुमच्या इतका दुःखी प्राणी सगळ्या जगात कोणी नसेल !'