घुबड आणि बुलबुल
एका जुन्या पडक्या मशिदीत एक घुबड बरीच वर्षे राहात होते. त्या मशिदीच्या मोडक्या खांबावर व पडक्या भिंतीवर काही मोडक्या तोडक्या आकृति व काही अक्षराचे भाग शिल्लक राहिले होते. मशिदीत कुराणातील वाक्ये लिहिलेली असतात एवढे त्या घुबडाला माहीत होते. तेव्हा मशिदीतील त्या आकृति म्हणजे कुराणातील वाक्येच असली पाहिजेत असे समजून तो एखाद्या मौलवीसारखा अर्धे डोळे मिटून बसू लागला. काही दिवसांनी तर आपण खरंच मौलवी झालो असे त्याला वाटले. एके दिवशी एक बुलबुल सहज भिंतीवर बसला व त्याने गायला सुरुवात केली. त्यामुळे मौलवी समजणार्या घुबडास त्रास झाला व ते म्हणाले, 'मूर्ख भाटा, चालता हो इथून. जगाचं कोडं सोडविण्याच्या विचारात मी मग्न असता तू मध्येच कटकट करतोस, याचं तुला काहीच कसं वाटत नाही ?' त्यावर बुलबुल म्हणाला, 'मौलवीमिया गाण्यासारख्या ललित कलेची घुबडाला आवड नसावी हे साहजिकच आहे, पण खर्या अभिरुचिच्या माणसाचं मन गायनने प्रसन्नच होईल !'
तात्पर्य
- व्यक्ती तितक्या प्रकृति !