Get it on Google Play
Download on the App Store

महापुरुष

आधुनिक संत म्हणून ज्यांना संबोधण्यात येते ते आचार्य विनोबा भावे यांच्या संदर्भातील एक गोष्ट अशी की, आपले म्हणणे दुसर्‍यांना न दुखवता मोठ्या खुबीने आचरणाने पटवून देण्यात त्यांचा हातखंडा होता. एके दिवशी असाच एक माणूस त्यांच्याकडे आला व पश्चात्तापदग्ध होऊन म्हणाला, महाराज दारु काही मला सोडायलाच तयार नाही. मला माहिती आहे की ती सवय वाईट आहे. मला ती सवय सोडायची आहे पण काय करु ? आचार्य शांतपणे म्हणाले, असं कर, तू उद्या मला याचवेळी येऊन भेट व बाहेरुनच हाक मार. मी मग येऊन सांगेन काय ते ! दुसर्‍या दिवशी तो माणूस ठरल्याप्रमाणे आला पण त्याला कळेना की बाहेरुनच का हाक मारायची ? पण आचार्यांची आज्ञा म्हणून अधिक विचार न करता त्याने बाहेरुनच हाक मारुन स्वतः आल्याचे सांगितले. तोच आतून आचार्यांचा आवाज आला, होय रे, मी बाहेर येऊ पाहतोय, पण हा खांबच मला सोडायला तयार नाही. तो माणूस चक्रावून गेला. ही काय भानगड आहे ? आचार्य माझी गंमत तर करत नाहीत ? असा विचार करुन त्यांनी आत कुतूहलाने डोकावून पाहिले. तो त्याला हसूच आवरेना. घरातील खांबाला विनोबाजी घट्ट पकडून बसले होते व तो खांब मला सोडत नाही म्हणून तक्रार करत होते. तो माणूस हात जोडून म्हणाला, विनोबाजी आपणच खांबावर चढून त्याला धरले आहे व तो खांब सोडत नाही, हे कसे ? हे ऐकूण स्मितहास्य करत खाली उतरले व त्याला समजावणीच्या स्वरात म्हणाले, ज्याप्रमाणे मी या खांबाला धरुन ठेवले होते तसेच तू ही दारुला पकडून ठेवले आहेस. दारुने तुला नाही पकडले. जेव्हा तू दारु सोडायचे ठरवशील तेव्हा आपोआप दारु पिच्छा सोडेल. हे ऐकून त्या माणसाचे डोळे उघडले व त्यांनी विनोबाजींच्या पायावर डोके ठेवून दारु सोडण्याचा निश्चय केला.