मनःशांती
अनेक महापुरुषांनी सांगितलेले उपाय करुन थकलेला एक तरुण विवेकानंदांजवळ आला नि म्हणाला, '' स्वामीजी तासन् तास बंद खोलीत बसून मी ध्यानधारणा करतो, परंतु मनाला शांती लाभत नाही.'' त्यावर स्वामीजी म्हणाले, '' सर्वात प्रथम खोलीचा दरवाजा उघडा ठेव. आपल्या जवळपास राहणार्या दुःखी, रोगी व भुकेल्या माणसांचा शोध घे. त्यांना यथाशक्ती मदत कर.'' यावर त्या तरुणाने त्यांना, '' एखाद्या रोग्यासी सेवा करताना मीज आजारी पडलो तर ?'' असा प्रश्न विचारला. विवेकानंद म्हणाले, '' तुझ्या या शंकेमुळे मला असे वाटते की, प्रत्येक चांगल्या कार्यात तुला काहीतरी वाईट दिसते. म्हणूनच तुला शांती लाभत नाही. शुभकार्याला उशीर लावू नये तसेच त्यातील उणिवाही शोधू नयेत. हाच मनःशांती मिळविण्याचा जवळचा मार्ग आहे.''