नैतिकतेचा आदर्श
आयुर्वेदाचे प्रणेते महर्षी चरक औषधी वनस्पतींच्या शोधात आपल्या शिष्यासह रानावनांत, जंगलात च दर्या डोंगरावरुन हिंडत चालले होते. चालता चालता अचानक त्यांची दृष्टी समोर हिरव्यागार शेतात उगवलेल्या एका सुंदर फुलाकडे गेली. आजपर्यंत त्यांनी असे आगळेवेगळे अनुपमेय सुंदर फूल कधी पाहिलेच नव्हते. त्यांना फूल स्वतःजवळ हवेसे वाटू लागले. पण संस्कारामुळे मन तसे करण्यास धजावत नव्हते. मनात चलबिचल होत होती. त्यांची ही अवस्था शिष्याच्या लक्षात आली. शिष्य त्यामना विनम्रपणे म्हणाला, गुरुवर्य आपली आज्ञा झाली तर ते फूल मी आपल्या सेवेस अर्पण करु ?
महर्षी चरक म्हणाले, वत्सा ! त्या फुलाची मला निश्चितच गरज आहे. पण या शेताच्या मालकाच्या परवानगीशिवाय ते घेणे म्हणजे चोरी करणे ठरेल. महर्षीच्या या उच्च आदर्शवाद व नैतिकतेपुढे शिष्यांनी मान खाली घातली.
ते पुढे म्हणाले, शिष्यांनो, नैतिक जीवन व राजाज्ञा यात कोणतेच साम्य नाही. जर त्याने आपल्या प्रजाजनांची संपत्ती स्वच्छंदपणे व मनमानी करुन स्वतःकरता वापरली तर नैतिकतेचा आदर्श तो काय राहणार ? यानंतर महर्षी आपल्या शिष्यांसह तेथून तीन मैल अंतरावरील त्या शेतकर्याच्या घरी पायी गेले व त्याची परवानगी घेऊनच त्यांनी ते फूल तोडले.