Get it on Google Play
Download on the App Store

मातृभक्ती

त्या काळात सर आशुतोष मुखर्जी कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलपती तर होते शिवाय कलकत्त्याच्या उच्च न्यायालयात न्यायाधिशही होते. त्यांचा साधेपणा, हुशारी, रोखठोकपणा व आदर्श व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन इंग्रज सरकारने त्यांना इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले. त्यानुसार परदेशी जाण्याची सर्व तयारी त्यांनी केली पण शेवटच्या क्षणी त्यांच्या आईने काही कारणांमुळे त्यांना इंग्लंडला न जाण्यास सांगितले. आईची आज्ञा शिरसावंद्य मानून एवढ्या चांगल्या संधीकडे त्यांनी पाठ फिरवली व सरकारला कळविले की, माझ्या आईला मी परदेशी जावे, असे वाटत नाही. त्यामुळे मला माझा प्रवास नाईलाजाने रद्द करावा लागत आहे. त्यावेळचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन हे पत्र पाहून अतिशय संतापला व म्हणाला, एका सामान्य भारतीयाची सरकारचा आदेश डावलण्याची हिंमत कशी झाली ? त्याने सर आशुतोष मुखर्जी यांना बोलावले व म्हणाला, जा, आपल्या आईला जाऊन सांगा की भारताचा व्हाईसरॉय तुमच्या मुलाला परदेशी जाण्याची आज्ञा देत आहे. त्यावेळी व्हाईसरॉयची आज्ञा न मानणे म्हणजे स्वतःवर संकट ओढवून घेण्यासारखे होते, पण आईच्या आज्ञेपुढे त्यांना कर्झनच्या आज्ञेची किंमत शून्य होती. ते आपल्या निश्चयापासून जराही विचलीत झाले नाहीत व गंभीर चेहर्‍याने व धाडसाने म्हणाले, महाशय, मी माझ्या आईच्या आज्ञेचे उल्लंघन करु शकत नाही. जगात आईच्या आज्ञेशिवाय कोणाचीही आज्ञा श्रेष्ठ मानत नाही. आमची परंपरा व संस्कृती आईला देवता म्हणून मानते व अशा देवीची आज्ञा माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी मोडू शकत नाही. तेव्हा यासंबंधी कृपया आपण मला अधिक काहीही सांगू नका ! हा विषय माझ्या दृष्टीने संपला आहे. त्यांची मातृभक्ती पाहून कर्झन आश्चर्यचकित झाला व त्यांना प्रेमाने आलिंगन दिले.