कुमारांकडून अपेक्षा 12
अशा माणिकमोत्यांसारख्या लोककथा मिळतील. दोनचार लोककथा छापून कृतार्थतेचे नगारे नका वाजवू. सोळा वर्षांच्या ज्ञानदेवांनी दहा हजार अमृतासमान ओव्यालिहिल्या. नाथांनी किती लिहिले. तुकारामांचे पाच हजार अभंग, पन्नास हजार ओळी. दासोपंतांनी किती लिहिले त्याला अंत ना पार. मोरोपंतांची पाऊण लाख कविता. कोठे हे अतिभारती लेखक-कोठे आपुला मरतुकडा वाग्विलास. थोडेसे लिहितो नि नाचतो. काय ते पदोपदी प्रकाशन समारंभ नि उदो उदो. युगप्रवर्तक ग्रंथ असेल तर प्रकाशन समारंभाला अर्थ. लेखकाला आपले कौतुक व्हावे असे वाटते. प्रत्येकाला आपले लिहिणे आवडते. आपआपके तानमें चिडियां भी मस्तान है. परंतु उठल्याबसल्या प्रकाशन समारंभानी सारे गांभीर्य जाते. तुमच्यासमोर ते ज्ञानवैराग्याचे धगधगीत सूर्य राजवाडे आहेत. गावोगाव हिंडून त्यांनी पत्रे गोळा केली. त्यांनी महान कार्य केले. तुम्ही गोष्टी, गाणी, ओव्या, दंतकथा सारे गोळा करा. बृहन्महाराष्ट्रात जवळ जवळ दोनशे तालुके. एकेका तालुक्यात चार चार कुमार सुट्टी हिंडोत. वर्ष-दोन वर्षात करा सारे गोळा नि कोणाकडून नीट संपादन करावा. कुमार साहित्य मंडळाचे ते अमर कार्य होईल.
तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक गावची हकीगत गोळा केलीत तर साडेतेरा हजार गावांचा ज्ञानकोष होईल. किती सुंदर हकिगती असतात. सिंहगडच्या पायथ्याजवळील खानापूरला मी गेलो. तेथे काँग्रेसप्रेमी श्री थोपटे आहेत. तेथील सेवापरायण डॉ. मोडक म्हणाले, 'शिवाजी महाराजांनी यांची पाठ थोपटली म्हणून हे आडनाव पडले.' माझे डोळे थोपटयांच्या चरणाकडे एकदम वळले. इंग्रजांनी जिल्ह्याजिल्ह्यांची माहितीपूर्ण गॅझेटे लिहिली. तुम्हाआम्हाला हे सारे करायचे आहे. आपली आपल्याला ओळख नाही.
मुलांनी आपल्या आयुष्यातील मार्मिक आठवणी, प्रसंग लिहून काढावे. त्यांच्या निवडीचे सुंदर पुस्तक होईल. मुले कधी कधी मार्मिक बोलतात. श्री सोपानदेव चौधरी म्हणाले, ' माझा लहान मुलगा एकदा म्हणाला, 'गारा म्हणजे पावसाचे बी' किती सहृदय बाल-कल्पना.' तुम्ही कान डोळे उघडे ठेवा. सर्वत्र ज्ञान आहे, काव्य नि वाङमय आहे. मित्रांनो, स्वतंत्र प्रतिभेचे नि प्रज्ञेचे होऊन महनीय निर्मिती करू लागेपर्यंत सामुदायिक सहकार्याने अशी कितीतरी कामे तुम्हाला करता येतील. इच्छा हवी, उत्कटता हवी, तळमळ हवी. माझ्या मराठी भाषेचा मला फकीर होऊ दे, ही निष्ठा हवी.
जुने वाङमय गोळा करा. सुंदर अनुवाद करून पाट बांधून आणा. नवीन भव्य निर्मिती करा. साहित्याचे तुम्ही थोर उपासक आणि साहित्याच्या द्वारा जीवनाचे उपासक व्हा. कोणत्याही विषयाचे सम्यक् ज्ञान, इतर अनेक विषयांची चालचलाऊ माहिती असलेले असे व्हा. आजच्या जीवनात वावरायचे आहे, बोलायचे आहे, लिहायचे आहे, हे विसरु नका.
आणि आज देशात स्वातंत्र्याची हवा आहे. आपण स्वराज्याची घटना बनवू पहात आहोत. भारतीय भवितव्य निश्चित करून तदर्थ आपण आत्मसमर्पणाची भाषा बोलत आहोत. अशा वेळेस तुम्ही आम्ही जमलो आहोत. तुमच्याभोवती प्रक्षुब्ध वातावरण आहे. अपार वेदनांतून, बलिदानांतून, दिव्यांतून, राष्ट्र नुकतेच गेले. पुन्हाही कसोटी घेतली जाणार का ? मित्रांनो, तेजस्वी कुमारांनो, ज्या राष्ट्रात जन्मलेत, वाढलेत, त्या राष्ट्राच्या जीवनापासून दूर नका राहू. दुर्देव की, महाराष्ट्रातील लेखक राष्ट्रीय आंदोलनाशी तितके एकरूप नसतात. आणि ज्याच्याशी आपण एकरूप होत नाही ते रंगवता तरी कसे येणार ? राष्ट्राच्या इतिहासात ४२ च्या आंदोलनात किती अमर प्रसंग आहेत !