गांधीजींचे दशावतार 3
सर्वधर्मसमन्वय ते करीत होते, परंतु हिंदुधर्मातच आधी किती छकले. अस्पृश्यतेचा केवढा कलंक ! कोटयवधी लोक माणुसकीला दुरावलेले. महात्माजींनी आश्रमात हरिजन कुटुंब घेतले. परंतु १९३२ मध्ये हे कोटयवधी हिंदू समाजापासून कायमचे दुरावत होते. तेव्हा येरवडयास उपवास सुरू केला. आणि मग २१ दिवसांचा उपवास पुन्हा केला. देशभर दौरा काढला. हृदयमंदिरे मोकळी केली. अस्पृश्य हा शब्दही त्यांना सहन होईना. हरिजन हा सुंदर शब्द रूढ केला. ही देवाची माणसे. हजारो वर्षे सेवा करीत आलेली. किती त्यांच्यात साधुसंत झाले. अरे त्यांना जवळ घेऊन स्वत: पवित्र व्हा. मानवता शिका. असे जणू त्यांनी सुचवले. हिंदुस्थानभर या प्रश्नाला चालना दिली. पाकिस्तान आपल्या अस्पृश्यतेसारख्या पापातूनच जन्मले. ज्यांना ज्यांना दूर लोटले ते परधर्मात गेले. हे पाप कोठवर करणार? हिंदू धर्म म्हणजे का शिवाशीवी ?कोठे ते अद्वैत? सर्वांच्या ठिकाणी प्रभूला पहायला शिकायची थोर शिकवण? महात्माजींनी हिंदू धर्माला उजाळा दिला. त्यांचा हा तिसरा अवतार.
मानवाला मानव म्हणून जगता आले पाहिजे. त्याचा सर्व शक्तींचा विकास हवा. अस्पृश्यांना दडपून ठेवले. स्त्रियांनाही. त्यांना आम्ही अबला म्हणत आलो. गांधीजींनी स्त्रीशक्ती जागी केली. त्यांनी स्वातंत्र्यासाठी मार्गच असा शोधून काढला, जेथे सर्वांना येता येईल. संसारात अपार कष्ट सहन करणा-या स्त्रिया, सासू-सासरे, नणंद, पती यांच्याकडून होणारी मारहाण, मानहानी, सहन करणा-या स्त्रिया बिटि-शांच्या दंडुक्यासमोरही उभ्या राहिल्या. त्या दारूच्या दुकानांवर, परदेशी मालावर निरोधने करू लागल्या. बेकायदा मीठ तयार करू लागल्या. शेतक-यांच्या मायाबहिणींपासून तो पांढरपेशा स्त्रियांपर्यंत सा-या तुरुंगात जाऊ लागल्या. नवीन तेज स्त्रियांत संचरले. काँग्रेसचे काम करायचे असेल तर घर सोडून जा असे पतीने बजावताच ज्या निघून गेल्या, अशा भगिनींची नावे मला माहीत आहेत. भारतीय युध्दांत स्त्रियांची थोर कामगिरी! महर्षि अण्णासाहेब कर्वे पोलिसांच्या समोरून निर्भयपणे स्त्रिया जात आहेत असे पाहून म्हणाले, 'माझ्या डोळयांचे पारणे फिटले !' कारण ' सा विद्या या विमुक्तये ' ज्ञान मुक्त करणारे हवे. स्त्रियांच्या आत्म्याचे ग्रहण सुटावे म्हणून अण्णासाहेब कर्वे स्त्री शिक्षणस वाहून घेत झाले. महात्माजींनी स्त्रियांच्या आत्म्याला हाक मारली. आणि ब्रिटिशांच्या गुलामगिरीविरुध्द लढणा-या स्त्रिया घरातही मुक्त होऊ लागल्या. विजयालक्ष्मी अमेरिकेत म्हणाल्या, ' महात्माजींनी आमचा आत्मा मुक्त केला. स्त्रियांवर त्यांचे थोर उपकार! 'महात्माजींचे हे चौथे अवतारकार्य !
राष्ट्र, समाज यांना नवीन वळण देणे म्हणजे नीवन शिक्षणच हवे, महात्माजींनी राष्ट्राचा अन्तर्बाह्य कायापालट होईल अशी मुलोद्योग शिक्षणपध्दती भारताला, जगाला दिली. तोपर्यंतचे शैक्षणिक प्रयोग लक्षात घेऊन ही तयार करण्यात आली आहे. मानसशास्त्र व सामाजिक गरजा यांचा येथे समन्वय आहे. मुलांमध्ये अपार शक्ती असते. ती शाळांतून मारली जाते किंवा घोकंपट्टीच्या कामी येते. मुलांचे हात, डोळे, बुध्दी सर्व काहीतरी धडपड करायला, निर्मायला उत्सुक असतात. त्यांना काम द्या, काम करता करता गाणे शिकवा, गोष्ट सांगा. त्या कामासंबंधीचे गाणे, तत्संबंधीची गोष्ट. अशारीतीने उद्योगांशी ज्ञानाचा, माहितीचा मेळ घाला. त्या उद्योगांतूनच ज्ञान द्या. श्रमाची महतीही मुलांना कळेल. ती पोषाखी होणार नाहीत. त्यांच्या बुध्दीला चालना मिळेल. निर्माणशक्तीस वाव मिळाल्यामुळे ती संशोधक होतील. कल्पक होतील आणि या गरीब राष्ट्रांत सक्तीचे शिक्षण करायचे असेल तर शिक्षणच अर्थोत्पादक व्हायला हवे. मुले अनेक उपयुक्त व सुंदर वस्तू निर्माण करीत आहेत. त्यातून शाळेलाही आर्थिक मदत मिळत आहे, मुलांनाही थोडी मजुरी मिळत आहे.