Get it on Google Play
Download on the App Store

कुमारांकडून अपेक्षा 1

मित्रांनो,
कुमार-साहित्य-संमेलनाच्या ह्या चौथ्या अधिवेशनाला अध्यक्ष म्हणून तुम्ही मला बोलावलेत ह्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. खरोखरच मला जागेचा भार वाटतो आहे. जवळजवळ एक वर्षापासून या चळवळीचे संचालक श्री. वीरेन्द्र अढिया यांनी मला तगादा लावला होता. मी नेहमी नाही म्हणत असे आणि ते त्या नकारात होकार समजत. त्यांच्या श्रध्देचा शेवटी विजय झाला आहे. मी सर्व ठिकाणी गेली दोन वर्षे नकार देत आलो आहे आणि आज येथेही अगतिक होऊन, एकप्रकारे कैदी होऊन आलो आहे. बनावच असा रचला गेला की, मी त्यात अडकलो. एक हजार रुपयांच्या रुपेरी पाशाने नव्हे. त्यात मी कधी पकडला जात नसतो. दुस-याच गोष्टीमुळे. नागपूरला जायचे वावडे होते आणि येथे यायची आवड होती असे नाही. मी सर्वांनाच प्रांजलपणे सांगे की, तुम्हाला देण्यासारखे माझ्याजवळ काही आहे असे वाटत नाही. ज्या ज्या ठिकाणी मी नकार दिला त्यांनी रागावू नये.

मराठी भाषेवर माझे अपार प्रेम आहे. बाळपणापासून मी तिचा भक्त आहे. मराठी वाङमयावर मी पोसलेला आहे. मराठीवर प्रेम करण्यात मी कोणाला हार जाणार नाही. येथे अध्यक्ष व्हायला दुसरी कोणतीच माझी पात्रता नाही. प्रेमाच्या बळावर मी येथे बसलो आहे. ज्याप्रमाणे मराठी भाषेवर माझे अपार प्रेम आहे, त्याप्रमाणेच मुलांवर, तरुणांवर, विद्यार्थ्यांवर माझा जीव आहे. मी त्यांना काही विशेष दिले आहे किंवा देऊ शकेन असे नाही. परंतु त्यांच्यात रहावे, मिसळावे असे मला वाटत असे. त्यांच्यात राहून मीच नेहमी नवतरुण रहात असतो.

मराठीवरील प्रेमामुळे आणि तुमच्यांवरील लोभामुळे तुमच्या-समोर मी उभा आहे. दुसरे भांडवल माझ्याजवळ नाही. मित्रांनो, आतापर्यंत तुमची तीन अधिवेशने झाली. अधिकारी व्यक्तींनी तुम्हाला मार्गदर्शन केले. आनंद मासिकाचे नवीन दृष्टीचे नि सहृदय राष्ट्रीय वृत्तीचे संपादक श्री. गोपीनाथ तळवलकर हे तर तुमचे अखंड वाटाडये. प्रतिथयश टीकाकार प्राध्यापक क्षीरसागर यांचेही मार्गदर्शन तुम्हाला होत असते. नुकतेच लोकमान्याचे प्रख्यात संपादक आणि वादविवेचनमालेचे प्राण श्री. पां.वा.गाडगीळ - जे नवविचारांचा पावा नेहमी वाजवितात-त्यांनी नागपूरहून तुम्हा सर्वांना मार्गदर्शन केले आहे. इतरही लेखकांचे, विचारवंतांचे, थोरामोठयांचे तुम्हाला सहाय्य होत असेल, झाले असेल. आणि तुम्हीही हस्तलिखिते, अभ्यासमंडळे चालवून बळ वाढवीत आहात. परंतु आज मी तुम्हाला काय देऊ, काय सांगू? कोणता संदेश, कोणता उपदेश? कोणता सल्ला, कोणता मार्ग? कोणता अनुभव, कोणते विवेचन?

मी गोंधळून गेलो आहे. मी थोडेफार लिहिले असले तरी मी हाडाचा साहित्यिक नाही. साहित्य कसे असावे याची फारशी चिकित्सा मी माझ्या मनात कधीही केली नाही. अमूक एकच लिहायचे असाही ठरविलेला बाणा नाही. साहित्यतंत्राचा मी कधीही अभ्यास केला नाही. मी तुमच्यासारखा विद्यार्थी होतो, तेव्हा माझ्या मनात साहित्यसेवेचे अनेक विचार येत. परंतु मला पुष्कळसे तुरुंगातच लिहायला मिळाले.

उमाळा

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
चार गोष्टी 2 सर्वांना नम्र प्रार्थना 1 सर्वांना नम्र प्रार्थना 2 जीवनाची आशा 1 जीवनाची आशा 2 जीवनाची आशा 3 या राष्ट्राचे कसे व्हायचे? 1 या राष्ट्राचे कसे व्हायचे? 2 या राष्ट्राचे कसे व्हायचे? 3 संयम नि सहानुभूती 1 संयम नि सहानुभूती 2 संयम नि सहानुभूती 3 संयम नि सहानुभूती 4 गांधीजींचे दशावतार 1 गांधीजींचे दशावतार 2 गांधीजींचे दशावतार 3 गांधीजींचे दशावतार 4 गांधीजींचे दशावतार 5 गांधीजींचे दशावतार 6 कुमारांकडून अपेक्षा 1 कुमारांकडून अपेक्षा 2 कुमारांकडून अपेक्षा 3 कुमारांकडून अपेक्षा 4 कुमारांकडून अपेक्षा 5 कुमारांकडून अपेक्षा 6 कुमारांकडून अपेक्षा 7 कुमारांकडून अपेक्षा 8 कुमारांकडून अपेक्षा 9 कुमारांकडून अपेक्षा 10 कुमारांकडून अपेक्षा 11 कुमारांकडून अपेक्षा 12 कुमारांकडून अपेक्षा 13 कुमारांकडून अपेक्षा 14 कुमारांकडून अपेक्षा 15