या राष्ट्राचे कसे व्हायचे? 3
ज्यांच्यावर उद्याची भिस्त तो विद्यार्थी व तरुणवर्ग त्यांच्यात तरी सत्यनिष्ठा आहे का ? तर कळले की मुंबईच्या अमेरिकन लायब्ररीतून अनेक ग्रंथ नाहीसे होतात. तेथील फळयावर, वार्ता फलकावर' अमूक ग्रंथ नाहीसे झाले आहेत, कृपा करुन आणून द्या.' अशी पत्रके असतात ! काय त्या चालकास वाटत असेल ? जगाला आम्ही नीतिपाठ शिकवू पाहातो; परंतु आमची तर ही दशा ! इतर देशांतून आमच्या विद्यार्थ्यांनी अशीच अपकीर्ती मिळवल्याचे ऐकले होते. पुस्तकांची पाने फाडणे, चित्रे फाडणे याचे आम्हांस काही वाटत नाही. सार्वजनिक वस्तूचे पावित्र्य ही चीजच आम्हाला कळेनाशी झाली आहे. सारा तरुणवर्ग असाच आहे, असे मी कसे म्हणू ? परंतु सत्याची चाड कमी, ही गोष्ट खरी.
ज्या देशाला लोकशाही मार्गाने जावयाचे आहे त्याला सदगुणांची जोपासना करण्यावाचून गत्यंतर नाही. तुम्ही दुर्गुणी व्हाल तर तुमच्या-तून कोणी हडेलहप्पी हुकुमशहाच उद्या निर्माण होईल. स्वातंत्र्यास तुम्ही नालायक ठराल. जेथे संयमी, विवेकी, सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक असतील, श्रमणारे, दुस-याची कदर करणारे लोक असतील तेथे लोकशाही वाढेल. तेथे व्यक्तिस्वातंत्र्य नीट नांदू शकेल. परंतु जेथे दुस-याचा विचारच नाही तेथे फटके मारणाराच कोणीतरी उद्या उभा राहणार ! तुमची जी लायकी तसे सरकार तुम्हाला मिळते.
मी म्हणजे भारत, मी म्हणजे मानवजात. माझा शब्द, माझा आचार, माझा विचार असा नसो की जेणेकरून भारताची मान खाली होईल, मानवजातीच्या मूल्यांची हानी होईल. मी भारताचा एवढेच नव्हे तर मानवजातीचा घटक आहे. ही दहा हजार वर्षांची मानवजातीची परंपरा, तिचा मीही प्रतिनिधी आहे. ही विशाल कल्पना पदोपदी मनात आणून वागू तर आचार बदलेल, विचार बदलेल. जीवन अंतर्बाह्य स्वच्छ नि सुंदर होईल. नवभारताला या दृष्टीची जरुरी आहे. तुम्ही शहरात असा वा खेडयात असा, कारखान्यात असा की, कचेरीत जाणारे असा, आपल्याकडून सत्याची पायमल्ली होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. सार्वजनिक पैसा, त्याचा नीट हिशेब देता आला पाहिजे. रामकृष्ण परमहंस म्हणत, ' व्यवहार व परमार्थ, दोन्ही ठिकाणी चोखपणा हवा.' ज्या राष्ट्राचा सार्वजनिक व्यवहार चोख असेल त्याला आशा आहे. सार्वजनिक जीवन जर येथे पै किंमतीचे झाले असेल, तर या राष्ट्राला कोणती आशा ?
साधना : जून ११, १९४९