Get it on Google Play
Download on the App Store

अंक पांचवा - प्रवेश पांचवा

सुधाकर - (स्वगत) उघडले, भाऊसाहेब, माझे डोळे साफ उघडले! मात्र माझे डोळे असे उघडले आहेत तोवर या देवतेच्या जात्या जीवज्योतीच्या प्रकाशात या क्षणीच स्वर्गाचा रस्ता एकदा नीट पाहून ठेवतो म्हणजे मग भोवती काळाकुट्ट अंधार पडला आणि माझे डोळे कायमचे मिटले तरी दिशाभूल होण्याची भीतीच नको. (इकडे तिकडे पाहून व औषध उघडून) हं, हेच ते विषारी औषध! कुठं आहे ती जिवाला जाऊन भिडलेली साता जन्मांची वैरीण? (एका पेल्यात दारू व विष ओततो.)

सिंधू - ऐकलं का? जरा माझ्याजवळ यायचं होतं-

सुधाकर - तुझ्याजवळ येऊ? (तिच्याजवळ बसून) काय काम आहे?

सिंधू - माझं डोकं आपल्या मांडीवर ठेवावं! आपला हात माझ्या हातात द्यावा-

सुधाकर - (तसे करून) सिंधू, सिंधू, देवतास्वरूप सिंधू! काय तुझी दुर्दशा झाली ही! सिंधू, या दारूबाज नवर्‍याच्या पायी तू बुडालीस! अपशब्दांनी तुझा अपमान केला! कधी तुला गोळाभर अन्न मिळालं नाही! पोटासाठी तुला दळायला लावलं! तुझे हालहाल केले! तुझ्या पोटचा गोळा तुझ्या डोळयांदेखत चेचून टाकला! देवी, संसाराच्या वनवासात फाटकं धोतर आड करून तुला वणवणायला लावलं! सिंधू, सिंधू, उदारहृदये सिंधू, शापाच्या एका शब्दानं मला जिता जाळून टाक! पदरीचं पुण्य खर्चून, खोटं बोलून या सुधाकराला कशाला वाचवीत बसलीस? तुझ्या पुण्याईनं स्वर्गाचा संसार सजवून साजरा करण्याची तुझी योग्यता; चौर्‍याऐंशी लक्ष जन्माची संचितं या जन्मी उभी राहिली आणि विधात्यानं 'सुधाकर' हे दारूनं ओथंबलेलं नाव तुझ्या फाटक्या कपाळी कोरलं! सिंधू, देवी, मला क्षमा कर! या अनंत अपराधी पातक्याला क्षमा कर!

सिंधू - आपण असा जिवाला त्रास का बरं करून घ्यायचा? मी फुटक्या कपाळाची का म्हणून? भरल्या हाती हळदीकुंकवानं, आपल्या मांडीवर मला मरणं आलं, याहून आणखी कोणतं भाग्य हवं मला? माझं मंगल झालं! आपण मनाला त्रास करून घेऊ नये. माझ्या गळयाची शपथ आहे! आधीच प्रकृती अशी झालेली! उन्हाच्या वेळी संतापानं डोकं तापलं तर सुंठ उगाळून द्यायलासुध्दा कोणी नाही. आणखी माझं अखेरचं हात जोडून सांगणं आहे. आता आपल्या जिवाला जपणारं कुणी नाही. लोकं सारी ज्याची त्याला असतात. माझ्या कपाळी आपली सेवा एवढीच लिहिली होती,- आपण आता एकटे राहिला- आता पुढं तरी माझ्या रक्ताची शपथ आहे- आपण यापुढं कधी घेऊ नये! ऐकायचं ना माझं एवढं! एका थेंबालासुध्दा शिवायचं नाही-

सुधाकर - नाही, सिंधू, उभा जन्म तुझी पवित्र आज्ञा मोडण्यात घालविला! तुझी शेवटची आज्ञा तरी पाळण्याइतका हा पातकी सुधाकर भाग्यशाली नाही! हा शेवटचा एकच प्याला मला अजून घ्यायचा आहे. नको, दुर्दैवी जीवा, आता माझ्याकडे पाहू नकोस! या थिजत चाललेल्या डोळयांत अनाथ आशा अजून कशाला तळावते आहे. सिंधू, सिंधू, काय- रामलाल, धाव-

सिंधू - नाथ, जिवाला सांभाळा- सुधाकर! माझ्या सुधाकरांना, देवा- (सिंधू मरते. रामलाल येतो. सुधाकर पेला घेतो व उठून उभा राहतो. रामलाल सुधाकराच्या हातून पेला घ्यावयाला जातो, तोच तो झटकन विष पितो.)

सुधाकर - चांडाळा, ऐन वेळी असा घात करू नकोस!

रामलाल - सुधा, काय प्यालास हे?

सुधाकर - दारू! एकच प्याला!

रामलाल - अजून दारू! जिनं एवढा अनर्थ केला तीच दारू?

सुधाकर - होय, रामलाल, तीच दारू! जिनं माझ्या घरात एवढा अनर्थ केला तीच दारू! जिनं चारी खंडांत अनर्थांचं साम्राज्य चालविलं आहे ती दारू! कुबेराला भीक मागायला लावते ती दारू! भीमासारख्या वज्रदेही शरीराला बहात्तर रोगांचा दवाखाना बनविते ती दारू! शिकलेल्या शहाण्याच्या थोबाडाला शिमग्यातल्या शिव्याशेणांनी शोभा आणते ती दारू! महापतिव्रतांना नवर्‍याच्या हातानं बाजारात आणून बसवते ती दारू! जिवलग नात्याचे धागे कुजवून तडातड तोडते ती दारू! बापाला मुलाकडून, मुलाला बापाकडून ठार मारविते ती दारू! डुकराचं नावसुध्दा न घेणार्‍या पाक मुसलमानाला डुकरासारखं खातेर्‍यात लोळविते ती दारू! गायत्रीमंत्रानं पवित्र झालेल्या ब्राह्मणांच्या जिभेला गायत्रीच्या मांसाची चटक लावते ती दारू! एखाद्या पशूप्रमाणं पुत्राला मात्रागमन्याप्रमाणं प्रत्यक्ष जन्मस्थानी- अरेरे! बोलू नये ते बोलणं आलं! पण सुधाकराच्या ज्या जिभेनं दारूचा विटाळ मानला नाही, त्या जिभेला एक किळसवाण्या शब्दानं काय वाट लागणार! आणि समाजात ठिकठिकाणी शिकलेल्या संभावित गळयांतून जी दारूची गटारं वाहताहेत त्यात एका शब्दाची घाण वाहून जायला किती वेळ लागणार!- रामलाल, कान फोडून स्पष्ट ऐक- पुत्राला मात्रागमन्याप्रमाणं प्रत्यक्ष जन्मस्थानी लघुशंका करायला लावते ती दारू!- ती दारू मी प्यावी अं! आता तोंड वाईट करू नकोस! रागावू नकोस- तुला एकदा सांगितलं, आज शेवटचं सांगून ठेवतो, की दारूची सवय सुटण्याचा काळ ती लागण्यापूर्वी काय तो असतो! पहिला एकच प्याला घेण्यापूर्वी भावी मद्यप्याचा हात धरला तरच फायदा होईल! ज्यानं एकदा पहिला एकच प्याला घेतला त्याला हा शेवटचा असा एकच प्याला घ्यावाच लागतो! दारूबाज दारूतच मरायचा, हे ब्रह्मवाक्यच आहे! आणि माझ्यासारख्या एखाद्याला पश्चात्ताप झाला तरी हा एकच प्याला काही टळत नाही! मात्र जळफळीत औषधाला मारण्यासाठी त्यात जसं पुष्कळसं पाणी ओतावं लागतं, त्याप्रमाणं हा अखेरचा एकच प्याला घेताना, त्यातली दारूची जलाल आग मारण्यासाठी त्यात रसकापरासारखं एखादं विष बरंच घालावं लागतं!

रामलाल - काय? यात रसकापूर? आत्यंतिक घातक रसकापूर घातला आहेस? भयंकर विष प्यालास?

सुधाकर - विष पिऊ नको तर काय करू? ही पाहा- ही देवता मला सोडून गेल्यावर जगात माझं काय राहिलं आहे?

रामलाल - काय, ताई गेली? (सिंधूजवळ जाऊन बसतो.)

सुधाकर - हो, रामलाल, ती गेली! माझी सिंधू गेली! माझी पुण्याईची सिंधू आटली! माझी दयेची सिंधू, करुणरसाची सिंधू, काळ-सागराला मिळाली- नाही, या पातकी सुधाकरानं निर्मिलेल्या दारूच्या समुद्राला मिळाली. या सुधाकराचं जग दारूच्या एकच प्याल्यात बुडून गेलं!

(राग- भैरवी; ताल- दादरा. चाल- पिया सोने दे.)
त्यजी देवा हतदैवा । जगी राही काय ॥धृ०॥
सिंधू सुखाचा । पुण्यांशाचा । सकळ आटे तापे मम । विशाल जरी हाय ॥१॥

वामनअवतारी देवाला त्रिभुवनाचं माप घेण्यासाठी अवाढव्य त्रिविक्रमरूपानं तीन पावलं टाकावी लागली, पण या सुधाकराचं उभं त्रिभूवन या देवीच्या दोन पावलांपुरतंच होतं! त्याच पायांवर मस्तक ठेवलं असता मला मरण यायला पाहिजे. या देवतेचे पाय धरून असा हिच्याबरोबर मी गेलो तरच हिच्या पुण्यबलानं माझी पातकं जळून मला स्वर्गद्वारात प्रवेश करता येईल! गेली! दिव्यतपस्विनी मंगलनिधान पूण्यमूर्ती सिंधू गेली! रामलाल, तुझी ताई गेली आणि माझी मानलेली आई गेली! रामलाल, रामलाल, हा सारा अनर्थपात होण्याचं कारण मी पहिल्यानं घेतलेला दारूचा एकच प्याला! त्या दिवशी केलेल्या पातकानं भ्रष्ट झालेलं तोंड या देवीच्या रक्तानं- या मूर्तिमंत अमृतानं धुऊन टाकतो. (तिच्या रक्ताचे चुंबन घेतो.) म्हणजे माझा पवित्र देह स्वर्गाला पात्र होईल! रामलाल, असा भेदरून जाऊ नकोस, हा घे तो एकच प्याला! हा एकच प्याला नीट चव्हाटयावर मांडून सार्‍या जगाला दाखीव आणि आल्यागेल्याला, शिकलेल्याला- अडाण्याला, राजाला-रंकाला, ब्राह्मणाला-महाराजाला-म्हातार्‍याला आणि मुलाला, तुझ्या जिवाभावाच्या दोस्ताला आणि सात जन्मांच्या दुश्मनाला, हात जोडून कळकळीनं सांग, की सार्‍या अनर्थाचं कारण हा दारूचा पहिला एकच प्याला असतो! त्याच्यापासून दूर राहा! जो जो भेटेल त्याला त्याला सांग- सिंधूच्या पवित्र रक्तानं तोंड धुऊन मी सांगतो आहे- मला मोठयानं ओरडवत नाही- तू मुक्तकंठानं प्रत्येकाला सांग, की काय वाटेल ते पातक कर- पण दारू पिऊ नकोस! (सिंधूच्या पायावर डोके ठेवून मरतो.)

रामलाल - अरेरे, काय हा अनर्थ! एकदम तीन जिवांच्या तीन परी झाल्या! मूल गेलं, सिंधू गेली, सुधाकर गेला! घर बुडालं आणि वंश बुडाला! या जगात सुधाकराचं आता काय राहिलं आहे? सर्वस्वासह हे तीन जीव ज्याच्यात बुडाले तो तेवढा दारूचा हा एकच प्याला!!

ब्रह्मार्पण ब्रह्महविर्ब्रह्माग्ना ब्रह्मणा हुतम् । ब्रह्मैव तैन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना॥

- श्रीगीतोपनिषत्सु श्रीभगवान्