अंक पांचवा - प्रवेश चवथा
फौजदार - भाऊसाहेब, असं रागावून काय होणार? थांबा, आपण बाईंना नीट विचारून पंचनामा करू.
पद्माकर - ताई, ताई, सिंधूताई-
रामलाल - भाऊ, थांब जरा; असा हातघाईवर येऊ नकोस! तिला जरा ग्लानी आली आहे!
पद्माकर - ही ग्लानी- ही ताई- हे सारं सारं- या दारूडया राक्षसाचं अघोर कर्म आहे! दादासाहेब, काय वाटेल ते करा, पण या काळतोंडयाला- ताईच्या पंचप्राणांवर दरोडा घालणार्या या दारूडयाला काही तरी भयंकर शिक्षा भोगायला लावा!
रामलाल - भाऊ, व्हायचं ते झालं; आता यांच्यावर राग धरून झाली गोष्ट पुन्हा येणार आहे का?
पद्माकर - भाई, माझं सांत्वन करण्याचा प्रयत्न करू नकोस! या चांडाळानं माझी सोन्यासारखी ताई अन्नावाचून झिजवून झिजवून मारली- काठया दगडांनी ठेचून मारली- कोळयामाळयांच्या तोंडी येणार नाहीत अशा शब्दांनी या मात्रागमनी नीचानं तिच्या काळजाला घरे पाडून मारली! दादासाहेब, तुमच्या पाया पडतो, काही झालं तरी याला मोकळा सोडू नका हो! बुध्दिपुरस्सर गुन्हा केला म्हणून तुरुंगात नेऊन घाला किंवा दारूनं माथं फिरलं आहे म्हणून वेडयाच्या दवाखान्यात नेऊन लोटा; अक्कलवान गुन्हेगार म्हणा, किंवा निर्बुध्द पशू म्हणा, पण याला कुठल्या तरी कोंडवाडयात घाला! याच्या मोहाला गुंतूनच- माझी ताई म्हणजे देवी आहे हो- नवरा म्हणून ठरलेल्या या जनावराच्या नावाची पंचप्राणांच्या पुष्पांनी पूजा करण्यासाठी ही इथं गुंतून राहिली आहे. देवमूर्ती म्हणून मानिलेला हा दगड एखाद्या नरककुंडात रिचवून हिच्या नजरेआड केला म्हणजे हिला घरी नेऊन हिच्या औषधपाण्याची तरी व्यवस्था करता येईल हो!
फौजदार - भाऊसाहेब, जरा शांत व्हा. आपण असे बोलू लागला-
पद्माकर - दादासाहेब, माफ करा. दगडाचा पुतळा असतो तरीसुध्दा सव्वा हात जीभ बाहेर काढून बोलायला लागलो असतो! मग आता तर चांगला रक्तामांसाचा- हिच्याच रक्तामांसाचा- तिचाच भाऊ आहे- काय सांगू हो, बोट करून दाखवायला तिच्या अंगावर रक्तमांससुध्दा राहिलं नाही,- तेसुध्दा या राक्षसानं गिळून टाकलं- दारूच्या घोटाबरोबर हिच्या रक्ताचा घोट घेऊन जित्या अंगातील मांसाचे लचके तोडून या पिशाच्चानं आहारून टाकले. चार गिरण्यांच्या मालकाची ही मुलगी, या शिकलेल्या दारूबाजानं आपल्या पोटाची खळगी भरण्याकरता तिला जात्यावर दळायला लावलं. आमच्या घरी कुत्र्यांच्या पिलांना जे दूध मिळतं- मिळतं कसलं, त्यांना पाजताना हलगर्जीनं खाली सांडतं तितकंसुध्दा या गोजिरवाण्या बाळाला कधी लाभलं नाही! आमच्या घरी मोलकरणीनं उष्टंखरकटं टाकलं असेल, तितकं अन्न कधी हिला मिळालं नाही! याच्याकडे पाहिलं म्हणजे दयामाया पार जळून जातात! दगड असतो तर मनुष्य झालो असतो, आणि मनुष्य आहे, तरी दगड झालो आहे. याच्या गळयाला फास घालताना, ताईच्या गळयातील मंगळसूत्र तुटलं तरी चालेल! ताई, सिंधूताई, ऊठ बरं, बाळ! (तिला किंचित उठवून बसवतो.)
सिंधू - दादा, केव्हा आलास तू? भाई, तूही आलास? तिकडे कुणीकडे असायचं? दादा, ऊठ बरं, चुलीवर थोडा भात आहे; दोन तांबे अंगावर घालून चार घास खायला घाल! तिकडे कालपासून पोटात काही नाही!
पद्माकर - याच्या तोंडात चार घास घालण्यापेक्षा याच्या पिंडब्रह्मांडाचा एकच घास करून काळाच्या पोटात कोंबण्यासाठी मी आलो आहे! ताई, हे पाहा फौजदारसाहेब तुझा जबाब घेण्यासाठी आलेले आहेत. या खुनी दारूबाजानं काय काय केलं ते सगळं यांना नीटपणे सांग! दादासाहेब, विचारा तिला काय विचारायचं ते-
फौजदार - बाई, यांनी काय काय केलं ते सांगा बरं! शरद
सिंधू - यांनी काही केलं नाही- कुणी सांगितलं आपल्याला हे?
फौजदार - मग मुलाला काय झालं? तुम्हाला हे कपाळावर लागलं कसं?
सिंधू - मी दोन दिवसांची उपाशी होते. मला राहूनराहून भोवळ येत होती. मुलाला घेऊन माळयावरून उतरताना मला घेरी आली; पडल्यामुळं मला कपाळावर खोक पडली! मूल माझ्या अंगाखाली चेंगरलं! इकडचा काही संबंध नाही त्यात!
पद्माकर - ताई, अगदी खोटं सांगितलंस! मग या काठीला रक्त कसं लागलं?
सिंधू - काठी टेकीत रक्तभरल्या हाती मी इथपर्यंत आले. तिकडचा काही संबंध नाही त्यात!
फौजदार - बाई, हे सारं खरं आहे का?
सिंधू - खरं- अगदी खरं आहे! माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा!
पद्माकर - नाही हो; दादासाहेब, उघड उघड हे खोटं आहे! ताई, तुला माझी, बाबांची, तुझ्या नवर्याची शपथ आहे. खरं सांग.
सिंधू - दादा, असा का अंत पाहतोस? मी सांगितलं ते खरं आहे अगदी!
पद्माकर - दादासाहेब, हे खोटं आहे हो! काय करावं आता?
फौजदार - भाऊसाहेब, काही करता येणार नाही आता! आपला राग कितीही अनावर झाला, तरी यांच्या पुण्याईपुढं तुमचं-आमचं काय चालणार? न्यायाचं शस्त्र कितीही तीक्ष्ण असलं तरी अशा पवित्र पतिव्रतेच्या पुण्याईची ढाल आड आल्यावर ते काय करणार?
पद्माकर - दादासाहेब! हिच्या खोटया बोलण्यामुळं या हरामखोराला मोकळा सोडता काय?
फौजदार - भाऊसाहेब, प्रत्यक्ष गंगाप्रवाहात पोहणारावर उगीच आग पाखडून काय होणार!
रामलाल - शाबास, सिंधूताई, शाबास! भाऊसाहेब, देवब्राह्मणांच्या सत्यतेपेक्षाही अशा पुण्यरूप सतीच्या असत्यालाच परमेश्वराच्या आशीर्वादाचं अधिक बळ असतं! भाऊ, जाऊ देत! झालं ते झालं! सिंधूताई, तू मात्र धन्य आहेस! तुझ्यासारख्या आर्या अजून आहेत, म्हणूनच या पुण्यभूमीला आर्यावर्त नाव शोभतं! भारतवर्ष साध्वीसतीचं माहेरघर आहे! सरकारनं सतीचा कायदा करून आमच्या साध्वींना सहगमनानं देह जाळून घेण्याची बंदी केली तर जितेपणीत आतल्या आत जळून नवर्याच्या नावासाठी या मंगलदेवता आत्मयज्ञ करीत आहेत! भाऊसाहेब, सिंधूताईच्या इच्छेसाठी तरी सुधाकरावरचा राग सोडून द्या!
सिंधू - दादा, इकडे ये, माझ्या शेजारी बैस असा! दादा, आपल्या माणसावर असा राग करून चालेल का? माझी जातीघडी सरत आली! बाबांच्याखेरीज आणि तुम्हा दोघांखेरीज तिकडे आपलं म्हणायला कोणी आहे का आता? असं रत्न मी मागे टाकून जाते, ती तुझ्या धीरावर ना? तूच आता त्यांच्या उन्हात तापल्या जिवावर पदर घालायला नको का? तुझ्या ताईचं सौभाग्य तूच आता जपून ठेवलं पाहिजेस. लहानपणी माझ्या कुंकवाला तजेला यावा म्हणून तू माझ्या करंडयात मृगाची इवलाली पाखरं आणून ठेवीत होतास, आठवतं का? मग आताच ती माया कुठे गेली? माझ्या सौभाग्याचं कुंकू तुझ्याच ठेवणीला देऊन मी जात आहे!
पद्माकर - छाकटया सैताना, ऐक, ऐक माझ्या लाडक्या ताईचा एक एक बोल! पण तुझे डोळे कुठले उघडायला? ताई, ताई, काय म्हणतेस हे तू?
रामलाल - भाऊ, फौजदारसाहेबांना जायला वेळ होत नाही का?
फौजदार - चला, भाऊसाहेब- पण केव्हा तरी तेवढी फिर्याद काढून घ्या म्हणजे झालं! (फोजदारांना पोहोचविण्यासाठी रामलाल व पद्माकर जातात.)