अंक दुसरा - प्रवेश दुसरा
(स्थळ: रस्ता. पात्रे: भगीरथ व रामलाल)
भगीरथ - (स्वगत) दारूपासून सुख नाही हे खरं; पण दु:खी जिवाला दारू सुखाचं स्वप्न तरी दाखविते खास! या पापपूर्ण संसारात कधी कधी दु:खाचा अर्क वाटेल त्या रीतीनं कोळून प्यावा लागतो, हेच खरं! संसार-संसार! परमेश्वरा! संसाराचा माझ्याइतका कडू अनुभव यापुढं कोणत्याही तरुणाच्या कपाळी लिहून ठेवू नकोस आणि ठेवायचाच असला तर त्या दुर्दैवी जिवाला आतल्या आत जाळण्यासाठी दीर्घायुष्य तरी देऊ नकोस!
(राग- खमाज; ताल- त्रिवट. चाल- सनक मुख विनुत.)
प्रणय जरी भंगला । तरी नर जगता मुकला ॥धृ०॥
घोर निरयसम । त्यासी विकट जग । दीर्घ जीवित शापचि खर तयाला ॥१॥ (रामलाल येतो.)
रामलाल - (स्वगत) यांच्याशी एकदम बोलायला सुरुवात केली आणि गीतानं सांगितलेलं खरं नसलं तर- नाही पण- तिचं म्हणणं हजार हिश्श्यांनी खोटं नाहीच! बाकी हे बोलायचं ठरल्यावर त्याला याच्याइतका योग्य मनुष्य मात्र गीतेनं सांगितलेल्या पाच-सातजणांपैकी एकही नाही! शिवाय याची माझी थोडीशी ओळखही आहेच! (उघड) नमस्कार भगीरथ!
भगीरथ - ओहो! कोण? डॉक्टरसाहेब? या! डॉक्टरसाहेब, तुम्ही परत आलात एवढं कळलं, पण परतण्याचं कारण नाही कळलं!
रामलाल - तुम्हाला माहीत असेलच की, प्रथम इंग्लंडात काही दिवस काढून शेवटच्या परीक्षेसाठी जर्मनीत जाण्याचा माझा विचार होता. पुढे ही लढाईची वावटळ सुरू झाली, तेव्हा साहजिकच जर्मनीत जाण्याचा बेत रद्द केला! चार सहा महिने इंग्लंडात काढले आणि आलो परत झालं.
भगीरथ - काय एक एक अडचणी असतात पाहा!
रामलाल - बरं, ते राहू द्या तूर्त! भगीरथ, मी तुमच्याकडे आलो आहे एका कामासाठी. हवापाण्याची प्रस्तावना केल्यावाचून एकदम सरळपणानं आणि मोकळया मनानं बोलायचं आहे ते बोलू का?
भगीरथ - अगदी खुशाल बोला!
रामलाल - पाहा, मग लपवाछपवी करू लागाल! नाही ना? बरं तर मग, आज संध्याकाळी आम्हालाही तुमच्या मंडळात दाखल करून घ्या! हं, चकित होऊ नका! मला सर्व काही ठाऊक आहे! तशी मला एकटयाला जायलासुध्दा हरकत नाही! पण माहीतगारामार्फत शिरकाव झालेला बरा! माझे एक-दोन मित्रही आहेत त्यात; पण संकोचामुळे कोणी कबूल व्हायचं नाही! तेव्हा सर्वांची विमानं वर चढल्यावरच गाठी पडलेल्या बर्या!
भगीरथ - डॉक्टरसाहेब, तुम्ही या पंथातले आहात? मला नाही खरं वाटत!
रामलाल - पूर्वी नव्हतो; पण परदेशगमन करून ही विद्या शिकून आलो झालं! तिकडच्या थंड प्रदेशात या भानगडीवाचून चालतच नाही. इथं आल्यापासून मनमोकळेपणानं घेण्याची जरा पंचाईत पडू लागली आहे; तेव्हा हा मार्ग हुडकून काढला! कराल ना एवढं काम!
भगीरथ - माझी काही हरकत नाही; पण तिथला एकंदर प्रकार कितपत रुचेल तुम्हाला-
रामलाल - न रुचायला काय झालं? अहो, हा चोरटेपणाचा तरी त्रास टळेल ना, मी म्हणतो!
भगीरथ - ठीक आहे, चला मग आताच!
रामलाल - अगदी सुरुवातीपासूनच नको! मंडळी रंगात आली म्हणजे गेलेलं बरं! म्हणजे दुसर्याला संकोच नाही, आपल्यालाही संकोच नाही!
भगीरथ - तसंच करू या! पण डॉक्टर, ही कल्पना नव्हती मला! थोडया नवलाची गोष्ट आहे!
रामलाल - वा:, नवल माझ्याबद्दल की तुमच्याबद्दल अधिक? तसं म्हटलं तर तुम्ही अगदी तरुण, शिवाय पदवीधर- पण तुम्ही-
भगीरथ - मी दुर्दैवाची दिशाभूल होऊन या आडवाटेला लागलो आहे! संसाराच्या सुरुवातीलाच माझा प्रेमभंग झालेला आहे. ज्या मुलीवर माझं प्रेम होतं, तिचं दुसर्याशी लग्न लागलं आणि संसाराला रामराम ठोकून मी असा फकीर बनलो! पण जाऊ द्या. त्या कुळकथा सांगायला आपल्याला पुढं पुष्कळ वेळ सापडणार आहे. तूर्त आपल्या रस्त्याला लागू या!
रामलाल - चला. (दोघेही जातात.)
(पडदा पडतो.)