Get it on Google Play
Download on the App Store

गोष्ट तेवीसावी

गोष्ट तेवीसावी

सूज्ञ शत्रू परवडे, पण मूर्ख मित्र महाग पडे.

एका गावात एक ब्राह्मण राहात होता. तसा तो चांगला विद्वान होता. पण कुठल्या पूर्वजाचा अवगुण त्याच्या स्वभावात उतरला न कळे - त्याला मधूनच केव्हातरी चोरी करण्याची हुक्की येई.

एकदा त्या गावात चार ब्राह्मण व्यापारी आले. त्यांनी आपल्याबरोबर आणलेला सर्वच्या सर्व माल भराभर विकला गेल्यामुळे, त्यांच्यापाशी बराच पैसा जमा झाला. ते गावात आल्यापासून त्या विद्वान पण चोरट्या ब्राह्मणाची त्यांच्यावर बारीक नजर होती. त्यांच्याजवळच्या पैशांची चोरी करण्यासाठी त्याने त्यांची ओळख करून घेतली व त्यांना सुंदर सुंदर संस्कृत सुभाषिते सुनावून, त्यांच्यावर आपली छाप पाडली. पण ते व्यापारी धूर्त व सावध असल्यामूळे त्यांच्याजवळच्या पैशांची चोरी करणे त्या ब्राह्मणाला अशक्य झाले.

त्यातून त्या व्यापार्‍यांच्या मनात विचार आला, 'आपल्याजवळचा पैसा जर आपण आहे तसाच घेऊन गावी जाऊ लागलो, तर वाटेत चोरदरवडेखोर आपल्याला लुटतील.' मनात असा विचार आल्याने त्या चौघांनीही आपापल्या पैशांची मौल्यवान् रत्‍ने खरेदी केली आणि आपल्या मांड्या चिरून ती त्यांत दडवून ठेवली. मग कापलेल्या मांड्या शिवून होताच, त्यांनी आपल्या गावी परतण्याच्या दृष्टीने सावरासावर सुरू केली.

हा सर्व प्रकार त्या चोरट्या ब्राह्मणाने पाहिला आणि तो स्वतःशी म्हणाला, 'या व्यापार्‍यांना जर असेच जाऊ दिले, तर आयती आलेली सुवर्णसंधी आपण कायमची गमावून बसू. त्यापेक्षा यांच्याशी असेच गोडगोड बोलून यांनी आपल्यालाही त्यांच्याबरोबर न्यावे, यासाठी त्यांना विनंती करावी आणि त्याप्रमाणे त्यांच्यासंगे जात असता, वाटेत या चौघांनाही विष घालून यांच्या मांड्यात दडवलेली रत्‍ने आपण काढून घ्यावीत.'

मनात असे ठरवून तो चोरटा ब्राह्मण त्यांना म्हणाला, 'शेटजी, तुमच्या थोड्याशा सहवासानेदेखील तुमच्यावर माझा एवढा जीव जडला आहे की, यापुढे तुमच्याशिवाय राहाणे मला शक्य होणार नाही. तेव्हा तुम्ही मलाही तुमच्यासंगे तुमच्या गावाला न्या.'

त्या व्यापार्‍यांनी त्याचे म्हणणे मान्य केले आणि ते त्याला घेऊन आपल्या गावाचा रस्ता चालू लागले.

पण वाटेत एक आक्रित घडले. 'पल्लीपूर' या भिल्लांच्या गावामधून ते जात असता, झाडांवर बसलेले कावळे विशिष्ट पद्धतीने 'कावकाव' करू लागले, 'लाख सव्वालाखाचे धनी चालले आहेत. त्यांना लुटायचे असेल तर लवकर तुटा,' अशा अर्थाची ती सूचक भाषा कानी पडताच, त्या भिल्लांनी त्या पाचहीजणांना एकदम गराडले, व त्यांचे कपडे काढून त्यांना कसोशीने तपासले, पण त्यांना त्यांच्यापाशी काहीच मोलाचे असे मिळाले नाही. ते पाहून म्होरक्या भिल्ल बाकीच्यांना म्हणाला, 'आपल्या कावळ्यांचे सांगणे आजवर कधी खोटे ठरले नाही. मग आजच ते खोटे कसे ठरले ? तेव्हा या पाचहीजणांना ठार मारून यांची कातडी सोलून काढा, म्हणजे यांनी जर शरीरात सोन्याच्या चिपा किंवा रत्‍ने दडवून ठेवली असली तर ती आपल्याला मिळतील.'

भिल्लांच्या म्होरक्याचे हे शब्द ऐकून तो चोरटा ब्राह्मण मनात म्हणाला, 'अरेरे ! मी या व्यापार्‍यांना मारून यांच्याजवळची रत्‍ने मिळवायला म्हणून आलो आणि आता ती रत्‍ने मिळवण्याऐवजी या चौघांबरोबर माझ्यावरही प्राण गमावण्याचा प्रसंग आला ! आता एवीतेवी मरण जर चुकत नाही, तर आपण या भिल्लांना केवळ 'नमुना' म्हणून आपल्याला मारायला सांगावे आणि आपल्या शरीरात दडवलेले सोने वा रत्‍ने न सापडल्यास या चार व्यापार्‍यांना सोडण्याबद्दल विनवावे. आपल्यामुळे जर हे व्यापारी सुटले तर निदान मरता मरता हातून एक महान् पुण्यकृत्य घडेल व आजवरचे आपले पाप धुवून निघेल.'

मनात असा विचार करून त्या चोरट्या पण सूज्ञ ब्राह्मणाने त्या भिल्लप्रमुखाला त्याप्रमाणे विनविले आणि त्याने ते अमान्य केले. मग त्या भिल्लांनी त्या ब्राह्मणाला ठार मारून, त्याच्या अंगावरचे कातडे सोलून काढले, पण त्याच्या शरीरात सोने वा रत्‍न न मिळाल्याने बाकीचे चौघेही असेच असतील, असे म्हणून त्यांनी त्या चारहीजणांना सोडून दिले.' ही गोष्ट सांगून करटक दमनकाला म्हणाला, 'म्हणून मी म्हणतो की, मूर्ख मित्रापेक्षा सूज्ञ फार बरा.'

दमनक म्हणाला, 'दादा, तुझं तत्त्वज्ञान तू तुझ्यापाशी सांभाळून ठेव. सध्याचे जग हे असे सरळ वागणार्‍यांसाठी नाही.' असे बोलता बोलताच, तिकडे पिंगलकाकडून ठार झालेल्या संजीवकाकडे लक्ष वेधवून दमनक करटकाला पुढं म्हणाला, 'ते बघ, माझे कारस्थान फळाला आले. पिंगलकमहाराजांनी संजीवकाला ठार मारले. माझ्याशी कधीही शत्रुत्व न करणार्‍या, पण माझे महत्त्व कमी व्हायला कारणीभूत होणार्‍या त्या संजीवकाचा अंत झाला असल्याने, आता मी महाराजांचा प्रधान होणार आणि अमर्याद वैभव व सत्ता उपभोगणार.'

तिकडे संजीवकाच्या प्रेताकडे पाहात पिंगलक अश्रु ढाळीत म्हणत होता, 'अरेरे ! झाले हे फार वाईट झाले. देशाचा एखादा भाग दुसर्‍या राजाने घेतला तर तो परत जिंकून घेता येतो, पण निष्ठावंत व बुधिमान् सेवक मेल्याने, राजा त्याला कायमचा मुकतो. बाकी संजीवकाची आता आपल्या ठिकाणी निष्ठा कुठे राहिली होती ? पण याला पुरावा काय ? आपण तर त्याचे म्हणणे ऐकून न घेताच त्याचा प्राण घेतला. म्हणजे आपण मित्राचा विश्वासघातच केला म्हणायचा ! आणि मित्राचा विश्वासघात करणारा तर महापापी मानला जातो. म्हटलंच आहे ना ?-

मित्रद्रोही कृतघ्नश्च यश्च विश्वासघातकः ।

ते नरा नरकं यान्ति यावच्चन्द्रदिवाकरौ ॥

(मित्रद्रोही, कृतघ्न आणि विश्वासघातकी जे असतात, ते चंद्रसूर्य असेपर्यंत नरकाचे धनी होतात.)

पिंगलक याप्रमाणे दुःख करीत असता त्याच्यापाशी जाऊन दमनक म्हणाला, 'महाराज, केलेल्या कृतीबद्दल असा पश्चात्ताप वा दुःख करीत बसणे राजाला शोभून दिसत नाही. त्यातून संजीवक हा तर आपल्या जिवावर उठला होता, हे मी त्याच्यासमक्ष आपल्याला सांगितले आहे. मग त्याला मारण्यात आपली चूक ती काय ? कारण शास्त्रच मुळी सांगतं-

पिता वा यदि वा भ्राता पुत्रो भार्याऽथवा सुह्रद् ।

प्राणद्रोहं यदा गच्छेत् हन्तव्यो नास्ति पातकम् ॥

(बाप असो वा भाऊ, मुलगा, पत्‍नी किंवा मित्र असो, जो आपल्या जिवावर उठतो, त्याला दुसरा पर्याय नसल्यास ठार मारण्यात पाप नाही.)

दमनक पुढे म्हणाला, 'महाराज, ज्याला राज्य चालवायचं आहे, त्याला एवढे हळवे व सोवळे राहून चालत नाही. ही राजनीती काही एखाद्या कुलवती स्त्रीप्रमाणे चारित्र्याला जपणारी नाही. ती कशी आहे ते ऐकायचं आहे ? ऐका -

सत्यानृता च परुषा प्रियवादिनी च

हिंस्त्रा दयालुरपि चार्थपरा वदान्या ।

भूरिव्यया प्रचुरवित्तसमागम च

वेश्याङ्गनेव नृपनीतिरनेकरूपा ॥

(कधी खरे बोलणारी, तर कधी खोटे बोलणारी, कधी कठोरभाषा तर कधी मधुभाषी, कधी घातक तर कधी दयाळू, कधी अप्पलपोटी तर कधी दानशूर, कधी जास्तीतजास्त पैशांचा सांभाळ करणारी तर कधी जास्त खर्च करणारी, अशी ही राजनीती एखाद्या वेश्येप्रमाणे नाना रूपे घेणारी आहे.)

दमनकाचा हा प्रभावी उपदेश ऐकून पिंगलकाने आपले दुःख आवरले आणि प्रधान व्हायला तूच योग्य आहेस,' असे म्हणून त्याला आपला प्रधान नेमले.

पंचतंत्र

संकलित
Chapters
गोष्ट पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट चौथी गोष्ट पाचवी गोष्ट सहावी गोष्ट सातवी गोष्ट आठवी गोष्ट नववी गोष्ट दहावी गोष्ट अकरावी गोष्ट बारावी गोष्ट तेरावी गोष्ट चौदावी गोष्ट पंधरावी गोष्ट सोळावी गोष्ट सतरावी गोष्ट अठरावी गोष्ट एकोणिसावी गोष्ट वीसावी गोष्ट एकवीसावी गोष्ट बावीसावी गोष्ट तेवीसावी गोष्ट चोवीसावी गोष्ट पंचवीसावी गोष्ट सव्विसावी गोष्ट सत्ताविसावी गोष्ट अठ्ठावीसावी गोष्ट एकोणतीसावी गोष्ट तीसावी गोष्ट एकतिसावी गोष्ट बत्तिसावी गोष्ट तेहेतिसावी गोष्ट चौतिसावी गोष्ट पस्तिसावी गोष्ट छत्तिसावी गोष्ट सदोतिसावी गोष्ट अडतिसावी गोष्ट एकोणचाळीसावी गोष्ट चाळीसावी गोष्ट एकेचाळिसावी गोष्ट बेचाळिसावी गोष्ट त्रेचाळीसावी गोष्ट चव्वेचाळिसावी गोष्ट पंचेचाळिसावी गोष्ट सेहेचाळिसावी गोष्ट सत्तेचाळिसावी गोष्ट अठ्ठेचाळिसावी गोष्ट एकोणपन्नासावी गोष्ट पन्नासावी गोष्ट एक्कावन्नावी गोष्ट बावन्नावी गोष्ट त्रेपन्नावी गोष्ट चोपन्नावी गोष्ट पंचावन्नावी गोष्ट छप्पन्नावी गोष्ट सत्तावन्नावी गोष्ट अठ्ठावन्नावी गोष्ट एकोणसाठावी गोष्ट साठावी गोष्ट एकसष्ठावी गोष्ट बासष्ठावी गोष्ट त्रेसष्ठावी गोष्ट चौसष्ठावी गोष्ट पासष्ठावी गोष्ट सहासष्ठावी गोष्ट अडु्सष्ठावी गोष्ट एकोणसत्तरावी गोष्ट सत्तरावी गोष्ट एकाहत्तरावी गोष्ट बहात्तरावी गोष्ट त्र्याहत्तरावी