Get it on Google Play
Download on the App Store

अंक पांचवा - प्रवेश तिसरा

(स्थळ- रामलालचा आश्रम. रामलाल प्रवेश करतो.)

रामलाल - (स्वगत) माझ्या मनाचं घाणेरडं चित्र आता मला स्वच्छपणानं दिसायला लागलं! माझ्या अध:पाताला काही तरी सीमा आहे का? पित्याच्या दृष्टीनं शरदकडे पाहताना मानीव नात्याच्या मोठेपणानं रक्तामांसाचं अंगभूत तारुण्य डोळयांतून मुळीच नाहीसं झालं नाही. शरदबद्दल मला जी सहानुभूती, भूतदया म्हणून वाटत होती, ती दुबळया मनाच्या हिंदू पुरुषाची पारावतवृत्ती कामुकता होती! गरीब गीतेला विद्यादान करताना, अनाथाला कल्याणाचा मार्ग दाखविल्यामुळंच आपल्याला हे समाधान होत आहे अशी माझ्या मनाची मी फसवणूक करीत आलो; पण ते तशा उदारपणाचं नव्हतं! गीतेला शिकताना पाहून, शरदला समाधान वाटत होतं, म्हणून मला त्या वेळी उत्साह वाटे! तोसुध्दा प्रियाराधनाचाच एक मार्ग होता!

(राग- भैरव; ताल- त्रिवट. चाल- प्रभू दाता रे.) मन पापी हे । करिते निजवंचन अनुघटिदिन ॥धृ०॥ उपशमपर मतिमेषज सेवुनि सुप्तियत्न करि, परि ते । विफल अंति सुविवेकभिन्न ॥१॥

उपकारांच्या कृतज्ञतेमुळे बिचारा भगीरथ थोडयाच काळात माझ्याशी खुल्या दिलानं बोलूचालू लागला. तेव्हा त्याचा मला कंटाळा वाटू लागला. अधिक प्रसंगी मनुष्याची ती फाजील सलगी वाटून आपल्याला भगीरथाचा तिटकारा येत असावा अशी मी स्वत:ची समजूत करीत होतो; पण ते कंटाळण्याचं खरं कारण नव्हतं! भगीरथ आपल्याशी मनमोकळेपणानं वागल्याचं शरदनं वेळोवेळी सांगितल्यामुळेच, न कळत माझ्या मनात जागृत झालेला गूढ मत्सर हेच त्या कंटाळयाचं कारण होतं! त्या तरुण जिवांचा परस्परांकडे ओढा दिसू लागताच माझ्या प्रौढ मनात मत्सराची आग भडकली! तेव्हा- धिक्कार, शतश: धिक्कार असो मला! यात्किंचित् सुखाच्या क्षुद्र लोभानं पुत्राप्रमाणं मानलेल्या भगीरथाला दुखवून, कन्येप्रमाणं मानलेल्या शरदच्या कोवळया हृदयावर रसरशीत निखारे टाकून माझ्या वयाच्या वडीलपणावर, नात्याच्या जबाबदारीवर आणि विचाराच्या विवेकवृत्तीवरही पाणी सोडायला मी तयार झालो, हा आमच्या आजच्या दुर्दैवी परिस्थितीचा परिपाक आहे. पराक्रमी पुरुषार्थानं मिळवलेली सत्ता मोकळेपणाच्या उदारपणानं मर्यादित करण्याचा आम्हाला सराव नसल्यामुळं दैवयोगानं प्राप्त झालेली अल्प सत्ता दुबळया जिवांवर आम्ही सुलतानी अरेरावीनं गाजवत असतो. आज हजारो वर्षे मेलेल्या रूढींच्या ठराविक ओझ्याखाली सापडून आमची मनंही मुर्दाड झाल्यामुळं आज आमच्यात वस्तुमात्रांतील ईश्वरनिर्मित सौंदर्य शोधून काढण्याची रसिकता नाही. असं सौंदर्य मिळविण्याची पवित्र अभिलाषबुध्दी नाही. त्या अभिलाषाची पूर्णता करणारी पुरुषार्थाची पराक्रमशक्ती नाही. आणि खरं कारण मिळताच जिवलग सुखाचाही त्याग करणारी उदार कर्तव्यनिष्ठा नाही! पूर्वजांनी तोंडावर टाकलेल्या अर्थशून्य शब्दांची विचारी वेदांताची वटवट क्षुद्र सुखाच्या आशेनंही ताबडतोब बंद पडते. विद्येनं मनाला उंच वातावरणात नेऊन ठेवलं तरी आमची मनं आकाशात फिरणार्‍या घारी गिधाडांप्रमाणं अगदी क्षुद्र अमिषानंसुध्दा ताबडतोब मातीला मिळतात. पाच हजार वर्षाचं दीर्घायुष्य मोजणार्‍या भारतवर्षरूप पुराणपुरुषा! तुझ्या विराट् देहासाठी हिमाचलासारखं भव्य मस्तक निर्माण केल्यावर गंगासिंधूसारख्या पवित्र ललाटरेखांनीही विधात्याला तुझ्या सुखाचा चिरकालीन लेख लिहिता येऊ नये का? सांग, हतभाग्या भारतवर्षा! भावी काळी या रामलालासारखी कंगाल पैदास आपल्या पोटी निपजणार, या कडू भीतीमुळं दक्षिण महासागरात जीव देण्यासाठी कमरेइतका उतरल्यावर कोणत्या पापांची प्रायश्चित्तं देण्यासाठी परमेश्वरानं तुला उचलून धरला? परमेश्वरा, माझ्या अपराधाची मला कधी तरी क्षमा होईल का? भगीरथ आणि शरद यांच्याजवळ कोणत्या तोंडानं मी क्षमा मागू? नाही, मनाचा तीव्र आवेग आता मरणाखेरीज दुसर्‍या कशानेही थांबणार नाही. (भगीरथ व शरद येतात.) हतभागी रामलाल, कृतकर्माची फळं भोगण्यासाठी दगडाचं मन करून तयार हो, आणि या दुखावलेल्या जिवांची क्षमा माग.

भगीरथ - भाईसाहेब, लहान तोंडी मोठा घास घेतला तर तुमच्या लाडक्या भगीरथाला तुम्ही क्षमा कराल का? आपल्या पायांजवळ एक विनंती करण्यासाठी मी आलो आहे.

रामलाल - भगीरथ, माझ्याशी बोलताना आजच इतकी औपचारिक वृत्ती का वापरतोस?

भगीरथ - भाईसाहेब, लोकसेवा करण्याची विद्या शिकण्यासाठी म्हणून मी आपल्या आश्रयाला उभा राहिलो आहे; पूर्वी सर्व विद्याप्राप्ती करून गुरूगृह सोडून जाताना गुरुदक्षिणा देण्याची वहिवाट होती; पण हल्लीच्या काळात दर महिन्याला अगोदर फी द्यावी लागते! भाईसाहेब, या नव्या पध्दतीला अनुसरून मी तुम्हाला गुरुदक्षिणा अर्पण करण्यासाठी आलो आहे. तिचा स्वीकार करून या आपल्या बाळाला आशीर्वाद द्या!

रामलाल - कसली दक्षिणा देणार तू?

भगीरथ - माझ्या स्वाधीन झालेल्या शरदच्या प्राणांची! भाईसाहेब, आपल्या सांगण्याप्रमाणं आपलं सर्वस्व आपल्या चरणी अर्पण करायला मी तयार आहे!

रामलाल - शरद, भगीरथानं म्हटलं ते खरं का? (शरद खाली पाहते.)

भगीरथ - संकोचवृत्तीमुळं या प्रसंगी ती काय बोलणार?

रामलाल - (स्वगत) हो, खरंच! याच काय, पण कोणत्याही प्रसंगी बिचारी हिंदू बालविधवा काय बोलणार? गाईला आत्मा नाही, असं ख्रिस्ती धर्माचं तत्त्व नव्यानं ऐकताच आम्ही आर्यधर्माभिमानी उपहासानं हसलो, पण माझ्यासारख्या जुलमी जनावरांच्या पशुवृत्तीनं या गरीब गाईंना आत्मा तर नाहीच पण जीभसुध्दा ठेविली नाही!

भगीरथ - शरद, भाईसाहेबांना माझं म्हणणं खरं वाटत नाही; माझ्या शब्दासाठी तू-

रामलाल - थांब, भगीरथ, शरदचा त्याग तू इतक्या सहजासहजी करायला तयार झालास हे तुझ्या प्रेमाचंच लक्षण समजू का? मला वाटतं, शरदवर तुझं मनापासून प्रेम मुळीच नव्हतं!

भगीरथ - असं आपल्याला वाटतं! सर्वसाक्षी सर्वेश्वराला काय वाटतं, ते- भाईसाहेब, क्षमा करा, शरदविषयी माझ्या तोंडचे असले उद्गार तिच्या माझ्या नव्या नात्याला कमीपणा आणतील! आपल्या पदवीला पोहोचल्यामुळं शरदबद्दल सलगीनं बोलण्याला मला अधिकार नाही!

रामलाल - (स्वगत) शाबास, भगीरथ, शाबास! तू जितका थोर आहेस तितकाच हा रामलाल नीच आहे! माझ्या मनाच्या हलकेपणामुळे बिचार्‍या शरदच्या प्रेमाचे तुला मलाचे धिंडवडे निघाले. (उघड) अशा पवित्र प्रेमानं तिच्याशी वचनबध्द झाल्यावर तिचा त्याग करणं तुला उचित आहे का?

भगीरथ - एक वेळ नाही, पण हजार वेळ उचित आहे! ज्या कार्यासाठी आपण मला जीवदान दिलं, त्या कार्यासाठी मला हा मोह सोडायचा आहे! शरदच्या लोभात मी सापडलो, तर आपला उपदेश मला साधणार नाही आणि भावी आयुष्याचा सन्मार्ग मला सापडणार नाही! समाजस्वरूप विराट्पुरुषाची सेवा करण्यासाठी, माझ्या देशाच्या कारणी पडण्यासाठी, आपल्या उपदेशासाठी, संसारसुखाचा आणि प्रेमाचा पाशबंध हा भगीरथ ताड्कन तोडून टाकीत आहे! आपल्यासारख्या थोर पुरुषाचा उपदेश-

रामलाल - भगीरथ, उपदेश करणं हे इतकं सोपं काम आहे, की त्यामुळं मला थोर म्हणणं केवळ हास्यास्पद आहे! उपदेश करण्यापेक्षाही उपदेश ऐकून मोहाला झुगारून देणाराच नेहमी श्रेष्ठ असतो. मोठया मनाच्या मुलांनो, त्यागधर्माच्या तेजोमय तत्त्वानं देदीप्यमान झालेल्या तुम्हा दोघांच्या मुखमंडलांकडे तोंड वर करून उघडया डोळयांनी पाहण्याची या क्षुद्र मनाच्या रामलालची योग्यता नाही! क्षणमात्राच्या पातकी मोहावेगाची मला क्षमा करा! बेटा शरद, माझ्या अभद्र शब्दांची, पामर मनाची आणि या शेवटच्या पापस्पर्शाची मला एकदाच क्षमा कर! भगीरथ, शिष्यानं गुरूला आधी गुरुदक्षिणा द्यावी, हा जसा हल्लीचा परिपाठ आहे, त्याचप्रमाणं कुशाग्रबुध्दीच्या शिष्याला उत्तेजनासाठी पारितोषिक द्यावं, असाही नियम आहे. माझ्या उपदेशाचा पहिला धडा तू इतक्या हुशारीनं शिकला आहेस, की तुझा गौरव करणं माझं कर्तव्य आहे! उदार बाळा, हे आपलं सुंदर चित्र घेऊन जन्माचा सुखी हो!

(शरदचा हात भगीरथाच्या हातात देतो.)
(राग- देसकार; ताल- त्रिवट. चाल- अरे मन राम.)
स्वीकारी रम्य अमल चित्रा या । योग्य तुला प्रतिफल घ्याया ॥धृ०॥
छात्रा पटु गुणी । अभ्यसनी । हे वितरित गुरुमाया ॥१॥

भगीरथ, लोकसेवेचं खडतर व्रत आचरिताना कधी कधी पुढार्‍याला लोकापवादाला पात्र व्हावं लागतं, अशा वेळी निंदकांच्या वाग्बाणांनी दुभंगलेल्या हृदयाच्या जखमा बर्‍या करण्यासाठी शरदच्या प्रेमळ अश्रूंची तुला भविष्यकाळी जरूर पडेल. रामलालचं हे रिकामं हृदय- (गीता रडत येते; तिला पोटाशी धरून) ये बाळ, ये! रामलालचं हे रिकामं हृदय तुझ्यासारख्या अनाथ जिवांसाठी अर्पण केलं आहे! तळीरामाच्या अकाली मृत्यूमुळं तुझ्यावर जो अनर्थ गुदरला त्यात तुला पैशाखेरीज काही उपयोगी पडणार नाही. माझ्या पोक्त वयातली काही वर्षे बाद करून स्वत: तरुण होण्याचा आणि त्यांची शरदच्या कोवळया आयुष्यात बोजड भर टाकून तिला पोक्त करण्याचा नीच प्रयत्न करण्यापेक्षा तुझ्या वयातली काही वर्षे आपल्यासाठी घेऊन तुझ्यासारख्या कन्येशी पितृधर्मानं वागण्यातच या रामलालच्या वृध्दत्वाचं सार्थक होईल. माझ्या चुलत्याची मला मिळालेली सर्व संपत्ती मी तुला देत आहे! तीच तुझ्या कामी येईल! तुझ्यासारख्या कुरूप विधवेबद्दल सहानुभूती वाटण्याइतकी व्यापक सुधारणा अजून आपल्या समाजात जन्मली नाही! भगीरथासारखं अपवादभूत रत्न एखादंच सापडण्याचा संभव! बाकी बहुतेक समाज रामलालसारख्या मनाचाच आहे! माझ्या उदाहरणावरून मला वाटायला लागलं आहे की, आमची सुधारणेत बरीचशी आत्मवंचना आहे! अनाथ बालविधवेची दया येण्यालाही आम्हाला चांगल्या चेहेर्‍याचा आधार लागतो. आमची सुधारणा अद्याप डोळयांपुरतीच झालेली आहे! आमची विद्या अजून जिभेवरच नाचत आहे. जिभेचा शेंडा कापून टाकला तर आमच्यात संस्कृत व प्रौढ मानलेला सुशिक्षित कोणता हे देवालाही कळायचं नाही! इतका वेळ शरदच्या प्रेमाला पात्र होत नव्हतो म्हणून मला खेद वाटत होता; पण प्रेमाला पात्र होणं हा मनुष्याचा धर्म असेल तर दया हा देवांचा गुण आहे! (पद्माकर येतो.)

पद्माकर - भाई, सुधाकरानं आपल्या मुलाचा खून केला आहे आणि ताईला घातक जखम केली आहे! त्याला फौजदाराच्या ताब्यात देण्यासाठी मी निघालो आहे- चल माझ्याबरोबर-

रामलाल - काय- म्हणतोस तरी काय हे?

पद्माकर - वाटेनं सर्व सांगतो; पण आधी लवकर चल; आणखी हेही सांगतो, की सुधाकराबद्दल या वेळी रदबदली करू नकोस. त्या नरपशूच्या मोहातून सुटली तर माझी अनाथ ताई अन्नाला तरी लागेल! चल, चल लौकर!

रामलाल - अरे, पण असा अविचार-

पद्माकर - माझ्या ताईनं भोगलेल्या हालअपेष्टांची शपथ घेऊन सांगतो, की सुधाकराला सरकारी शासन देवविल्याखेरीज मी आता थांबणार नाही! याला अविचार म्हण, सूड म्हण, काय वाटेल ते म्हण! चल लौकर!

रामलाल - भगीरथ, शरद आणि गीता यांना घेऊन ये. सुधाकराकडे चल. (सर्व जातात.)