Get it on Google Play
Download on the App Store

अंक चवथा - प्रवेश तिसरा

(स्थळ- बंडगार्डन. पात्रे- सुधाकर व इतर मंडळी.)

सुधाकर - काय चमत्कारिक माझी स्थिती झाली आहे! लहानपणापासून या बागेची शोभा माझ्या पुर्‍या ओळखीची; पण आज तिच्याकडे नव्यानं पाहिल्यासारखं वाटतं. सुंदर परंतु निर्दोष वस्तूकडे पतित मनाला ओशाळेपणामुळं उघडया डोळयांनी पाहण्याचा धीर होत नाही! अगदी लहानपणी एका इंग्रजी गोष्टीत वीस वर्षाच्या अखंड झोपेतून जागा झालेल्या एका मनुष्याची प्रथम जगाकडे पाहताना जी विचित्र मन:स्थिती वर्णिली आहे, तिचं आज मला अनुभवानं प्रत्यंतर पटत आहे. या बागेकडेच काय, पण एकंदर जगाकडेच पाहताना माझ्या दृष्टीतला हा भितरा ओशाळेपणा कमी होत नाही. दारूसारख्या हलक्या वस्तूच्या नादानं ज्या सोज्ज्वळ समाजातून, प्रतिष्ठित परिस्थितीतून, बरोबरीच्या माणसांतून- अगदी माणसांतूनच- मी उठलो, त्या जगात हे काळं तोंड पुन्हा घेऊन जाताना मला चोरटयासारखं होतं आहे. या सुंदर जगात माझी जागा मला पुन्हा मिळेल का? अजून तोंडाला दारूची दुर्गंधी कायम असताना माझ्या पूर्वाश्रमीच्या जिवलग बंधूंना माझी तोंडओळख तरी पटेल का? अजून दारूच्या धुंदीनं अंधुक असलेल्या माझ्या दृष्टीला माझी हरवलेली जागा हुडकून काढता येईल का? हजारो शंकांनी जीव कासावीस होऊन उदार सज्जनांच्या समोरसुध्दा आश्रयासाठी जाण्याची माझ्या चोरटया मनाला हिंमत होत नाही. फार दिवस परक्या ठिकाणी राहून परत आलेल्या प्रवाशाला आपल्या गावात हिंडताना किंवा बिछान्यात फार दिवस खितपत पडून आजारातून उठलेल्या रोग्याला आपल्या घरातच फिरताना असाच अपुरा नवेपणा वाटत असतो खरा; पण पहिल्याला प्रियजनांच्या दर्शनाची उत्कंठा आणि दुसर्‍याला पुनर्जन्माच्या लाभाचा निर्दोष आनंद, जो पवित्र धीर देतो, तो घाणेरडया व्यसनाने दुबळया झालेल्या पश्चात्तापाला कोठून मिळणार? आज अजून कोणीच कसं फिरकत नाही? (पाहून) अरेरे, हे लोक या वेळी कशाला इथं आले? दारूच्या खाणाखुणा अजून अंगावर आहेत. अशा स्थितीत निर्व्यसनी जगात जाववत नाही म्हणून मद्यपानाच्या स्नेहातल्याच ज्या वजनदार लोकांनी अडल्या वेळी मला साहाय्य देण्याची वारंवार वचने दिली, त्यांची भेट घेण्याच्या अपेक्षेनं मी इथं आलो तो माझ्या गतपातकांची ही मूर्तिमंत पिशाच्चं माझ्यापुढे दत्त म्हणून उभी राहिली! (शास्त्री व खुदाबक्ष येतात.)

शास्त्री - शाबास, सुधाकर, चांगलाच गुंगारा दिलास! तुला हुडकून हुडकून थकलो! अखेर म्हटलं, मध्येच तंद्री लागून कुठं समाधिस्थ झालास की काय कोण जाणे!

खुदाबक्ष - सगळया बैठका, आखाडे पायाखाली घातले. चुकला फकीर मशिदीत सापडायचा म्हणून सारे गुत्तेदेखील पालथे घातले!

शास्त्री - गुत्तेच पालथे घातले; त्यातल्या बाटल्या नव्हेत!

खुदाबक्ष - अरे यार, सार्‍या गटारांचासुध्दा गाळ उपसला; पण तुझा कुठं पत्ता नाही!

शास्त्री - बरं खांसाहेब, आता उगीच वेळ घालवू नका. सुधाकर, तळीरामाचा आजार वाढत चालल्यामुळं त्याच्याभोवती आळीपाळीनं पहार्‍यासाठी जागता सप्ता बसवायचा आहे. तेव्हा त्याचा कार्यक्रम ठरविण्यासाठी आपल्या मंडळाची खास बैठक बसायची आहे, म्हणून लवकर क्लबात चल.

सुधाकर - तळीरामाचा प्राण जात असला तरी आता मला क्लबात यायचं नाही!

खुदाबक्ष - असा वैतागलास कशानं? बैठक नुसतीच नाही!

सुधाकर - एकदा सांगितलं ना मी येणार नाही म्हणून! आजच नाही, पण मी कधीच येणार नाही!

खुदाबक्ष - वा:! तू नाहीस तर बैठकीला रंग नाही! बर्फावाचून व्हिस्कीला तशी तुझ्यावाचून मजलशीला मजा नाही!

सुधाकर - काय, कसं सांगू तुम्हाला? मी दारू पिणं सोडलं आहे!

दोघे - काय? सोडलं आहे? यानंतर?

सुधाकर - हो, यानंतर!

शास्त्री - काय भलतंच बोलतोस हे? दारूच्या धुंदीतसुध्दा तू असं कधी बरळला नाहीस! मद्यपान सोडून करणार काय तू? अरे वेडया, एकदा एक गोष्ट आपली म्हणून जवळ केल्यावर पुढं अशी बुध्दी? अरे- स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:! काय खांसाहेब?

खुदाबक्ष - बराबर बोललात! अरे दोस्त, 'अपना सो अपना!' चल, हे वेड सोडून दे. (सुधाकर काहीच बोलत नाही.)

शास्त्री - चला, खांसाहेब, तापलेली काच आपोआप थंड पडू द्यावी हे उत्तम! निवविण्यासाठी पाणी घातलं की, ती एकदम तडकायचीच! हा या घटकेपुरताच पश्चात्ताप आहे. स्मशानवैराग्यामुळं डोक्यात घातलेली राख फार वेळ टिकायची नाही. जरा धीरानं घ्या, म्हणजे आपोआपच गाडं रस्त्याला लागेल. सुधाकरा, आम्ही तर जातोच; पण तू आपण होऊन क्लबात आला नाहीस तर यज्ञोपवीत काढून ठेवीन, हे ब्रह्मवाक्य लक्षात ठेव! (शास्त्री व खुदाबक्ष जातात.)

सुधाकर - (स्वगत) दारूच्या गटारात या पामर किटकांच्या बरोबर आजपर्यंत मी वाहात आलो ना? पण यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? जळलेला उल्का मातीत मिसळून दगडाधोंडयांच्या पंक्तीत बसतो याचा दोष त्याच्या स्वत:च्याच अध:पाताकडे आहे. जाऊ देत! यांच्याबद्दल विचार करण्याइतकी सुध्दा- तसंही नाही- या दोघांची सारी विशेषणं माझी मलाच लावून घेतली पाहिजेत- माझी अशी दशा व्हायला- अरेरे! किती भयंकर दशा! तिची कल्पनासुध्दा करवत नाही. बुध्दिमत्तेच्या तीव्र अभिमानामुळं बहुतांशी बरोबरीच्या माणसांच्यासुध्दा हातात हात मिळविण्याची ज्यानं कधी कदर केली नाही, तो मी आज दारूच्या समुद्रातून बाहेर निघण्याकरता त्याच समुद्राच्या काठावर बसलेल्या नालायक माणसांच्या पायांचा आधार मिळविण्यासाठी आशेनं धडपडतो आहे. (एक गृहस्थ येतो.) सुधाकरा, या क्षुद्र मनुष्याला प्रसन्न करून घेण्यासाठी आशाळभूत दृष्टीनं तोंडावर गरिबीचं कंगाल हसू आणून कृत्रिमपणानं पदर पसरायला तयार हो! (त्याला नमस्कार करतो; तो गृहस्थ नमस्कार न घेता निघून जातो- स्वगत) अरेरे! निर्दय दुर्दैवा, सुधाकराच्या स्वाभिमानाला ठार मारण्यासाठी या बेपर्वाईच्या हत्याराखेरीज एखादा सौम्य उपाय तुझ्या संग्रही नव्हता का? आरंभी या शेवटच्या शस्त्राची योजना कशाला केलीस? (दुसरा गृहस्थ येतो.)

दुसरा गृहस्थ - (सुधाकराला पाहून स्वगत) काय पीडा आहे पाहा! हे अवलक्षण कशाला पुढं उभं राहिलं! या भिकारडया दारुबाजाबरोबर उघडपणे बोलताना जर कुणी पाहिलं तर चारचौघात अंगावर शिंतोडे उडायचे! आता ही पीडा टाळायची कशी? मांजर आडवं आलं तर तीस पावलं मागं फिरावं, विधवा आडवी आली तर स्वस्थ बसावं, पोर आडवं आलं तर कापून काढावं, पण असं आपलंच पाप आडवं आलं तर कशी माघार घ्यावी याचा कुठल्याही शास्त्रात खुलासा केलेला नाही. चार शब्द बोलून वाटेतला धोंडा दूर केला पाहिजे. (सुधाकर त्याला नमस्कार करतो. त्याला नमस्कार करून व कोरडे हसून) कोण सुधाकर? अरे वा:! आनंद आहे! (घाईने जाऊ लागतो.)

सुधाकर - रावसाहेब, आपल्याशी जरा दोन शब्द-

दुसरा गृहस्थ - सध्या मी जरा गडबडीत आहे- हे दादासाहेब गेले- (जातो.)

सुधाकर - (स्वगत) याच्या पाजी संभावितपणापेक्षा पहिल्यानं केलेला उघड अपमान पुरवला. उभ्या जगानं प्रामाणिक हसण्यानं माझा तिरस्कार केला असता तरीसुध्दा याच्या हरामखोर हसण्यानं माझ्या हृदयाला जसा घाव बसला तसा बसला नसता. (पाहून) हा तिसरा प्रसंग आहे. काही हरकत नाही. एकामागून एक अपमानाच्या या सर्व पायर्‍या चढून जाण्याचा मी मनाशी पुरता निर्धार केला आहे.

(तिसरा गृहस्थ येतो. एकमेकांना नमस्कार करतात.)

तिसरा गृहस्थ: कोण तुम्ही? काय नाव तुमचं? कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं-

सुधाकर - दादासाहेब, माझं नाव सुधाकर.

तिसरा गृहस्थ: सुधाकर! नावसुध्दा ऐकल्यासारखं वाटतं. काय म्हणालात? सुधाकर नाही का?

सुधाकर - दादासाहेब, इतकं विचारात पडण्यासारखं यात काहीच नाही. आपल्या माझ्या अनेक वेळा गाठी पडल्या आहेत. आर्यमदिरामंडळाच्या बैठकीत आपण बंधुभावानं संकटकाळी मला साहाय्य करण्याची कित्येकदा वचनं दिली आहेत. दादासाहेब, आज मी खरोखरी संकटात आहे आणि म्हणूनच त्या वचनांची आठवण देण्यासाठी.

तिसरा गृहस्थ: बेशरम मनुष्या, भलत्या गोष्टीची भलत्या ठिकाणी आठवण करून द्यायची तुला लाज वाटत नाही? मूर्खा, पहिल्यानं मी तुला न ओळखल्यासारखं केलं होतं तेवढयावरूनच तू सावध व्हायला पाहिजे होतंस! दारूच्या बैठकीत दिलेली वचनं, केलेल्या ओळखी, ही सारी दारूच्या फुटलेल्या पेल्याप्रमाणं, खान्यातल्या खरकटयाप्रमाणं, तिथल्या तिथं टाकून द्यायच्या असतात. काळोखातली दारूबाज दोस्ती अशी उजेडात उजळमाथ्यानं वावरू लागली तर तुझ्याप्रमाणंच माझीही बेअब्रू भरचवाठयावर नायाचला लागेल. दारूबाजीसारख्या हलक्या प्रकारात आमच्या बरोबरीच्या लोकांची मदत मिळत नाही, एवढयासाठीच आम्हा थोरामोठयांना तेवढयापुरतंच तुझ्यासारख्या हलकटांत मिसळावं लागतं! पण ते अगदी तेवढयापुरतं असतं. पायखान्यातला पायपोस कोणी दिवाणखान्यात मांडून ठेवीत नाही. थोरा-मोठयांच्या मैत्रीच्या आशेनं तुझ्यासारखे कंगाल दारूबाज मुद्दाम या व्यसनाशी सलगी करतात, हे आम्हाला पहिल्यापासून ठाऊक असतं. चल जा. माझ्यासारखा आणखी कोणाला अशा संकटात पाडू नकोस. (जातो.)

सुधाकर - (स्वगत) दुर्दैवा, सुधाकराच्या निर्लज्जपणात अजून थोडी धुगधुगी आहे. (चौथा गृहस्थ येतो- नमस्कार होतात.) रावसाहेब, मला आपल्याशी दोन शब्द बोलायचे आहेत. माझं नाव सुधाकर! माझा चेहेरा आपल्याला कुठं तरी पाहिल्यासारखा वाटत असेल, पण खरोखरी पाहता तो आपल्या पूर्ण परिचयाचा आहे.

चौथा गृहस्थ - सुधाकर, असं तीव्रपणानं बोलायचं काय कारण आहे? तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे आणि आम्हाला हे बोलणं?

सुधाकर - उतावळेपणानं आपल्या उदार मनाचा उपमर्द केला याची क्षमा करा. पण मला आता मिळालेल्या अनुभवाच्या औषधाचा कडवटपणा अजून माझ्या तोंडात घोळत आहे. प्रसंगात सापडलेल्या आपल्या जिवलग मित्राचं नाव आठवत नसलं म्हणजे आपल्या सोईसाठी त्याला नावं ठेवायला सुरुवात करावी, हा जगातला राजमार्ग आहे. ओळखीचा चेहेरा पटत नसला, म्हणजे इतका चिकित्सकपणा दाखवावा लागतो, की हुंडीवरची सही पटवून घेताना पेढीवरच्या कारकुनानंसुध्दा तो कित्त्यादाखल पुढं ठेवावा. पण जाऊ द्या. तुमच्यासारख्या सत्पुरुषाला हे ऐकविणं असभ्यपणाचं आहे. रावसाहेब, मी आज विलक्षण परिस्थितीत आहे. मला एखादी नोकरी पाहिजे! अतिशय काकुळतीनं आपणाजवळ एवढी भीक- रावसाहेब, अगदी पदर पसरून भीक मागतो की, कुठं तरी एखादी नोकरी मला लावून द्या; म्हणजे तीन जिवांचा- (कंठ दाटून येतो.)

चौथा गृहस्थ - तुम्हाला नोकरी- सुधाकर- तुम्हाला आम्ही नोकरी काय पाहून द्यायची? तुमची विद्वत्ता, तुमची हुशारी, तुमची लायकी-

सुधाकर - माझ्या लायकीबद्दल कशाला या थोर कल्पना? माझी लायकी एखाद्या जनावरापेक्षाही हलक्या दर्जाची आहे! पट्टेवाल्याची, हमालाची, कुठली तरी नोकरी- रावसाहेब, तीन पोटांचा प्रश्न आहे म्हणून पंचाईत! नाही तर एका पोटासाठी गाढवाच्या रोजमुर्‍यावर कुंभाराचा उकिरडा वाहण्याची सुध्दा आता माझी तयारी आहे!

चौथा गृहस्थ - तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे- आम्ही तुमच्यासाठी काय नाही करणार? आहे एक नोकरी- दरमहा पंधरापर्यंतची-

सुधाकर - फार झाले पंधरा- रावसाहेब-

चौथा गृहस्थ - पण ती आहे कंत्राटदाराकडे स्टोर सांभाळण्याची. खोरी, फावडी, होय नव्हे- म्हणजे आज पाचपन्नासांचा जंगम माल तुमच्या हाती खेळायचा आणि- राग मानू नका. सुधाकर, तुम्ही आमच्या पाठच्या भावासारखे! तुमच्याजवळ खोटी भाषा नाही व्हायची- त्या जागी अगदी लायक, सचोटीचा माणूस पाहिजे- हो, एखादा छंदीफंदी असला आणि त्यानं निशापाण्यासाठी दोन डाग नेले कलालाकडे- निदान त्याला जामीन तरी हवीच!

सुधाकर - मग माझ्यासाठी आपण जामिनकी पत्करायला-

चौथा गृहस्थ - आता काय सांगावं? सुधाकर, तुम्ही आमच्या पाठच्या भावासारखे! तुमच्याजवळ आपलं स्पष्ट बोलायचं- हे बघा, तुम्ही बोलूनचालून व्यसनी, तुमची जामिनकी म्हणजे धोतरात निखारा बांधूनच हिंडायचं- हो तुम्हीच सांगा- व्यसनी माणसांचा भरवसा काय घ्या? म्हणून माझं आपलं तुम्हाला हात जोडून सांगणं आहे की, मला या संकटात- आमच्या पाठच्या भावासारखे तुम्ही- तुम्हाला नाही म्हणायचं जिवावर येतं अगदी- पण तुम्हीच दुसर्‍या कोणाला तरी- हो, तेही खरंच, दुसरं कोण मिळणार? हो, जाणून बुजून काटयावर पाय द्यायचा- मोठं कठीण कर्म आहे! जग म्हणजे एवढयासाठी! तुम्ही आमच्या पाठच्या भावासारखे! तेव्हा तुम्हाला उपदेश करायचा आम्हाला अधिकारच आहे- तात्पर्य काय, की दारू पिणं चांगलं नाही. दारू म्हटली की, माणसाची पत गेली, नाचक्की झाली! दरवाज्यात कुणी उभं करायचं नाही, खर्‍या कळवळयाचं कुणी भेटायचं नाही- सगळे दादा बाबा म्हणून लांबून बोलतील- पाठचा भाऊ ओळख द्यायचाच- तुम्ही आमच्या पाठच्या भावासारखे म्हणून सांगायचं तुम्हाला- सुधाकर, तुम्ही दारू सोडा! बरं, येऊ आता? वेळ झाला!

सुधाकर - (स्वगत) बस्स! दुर्दैवाची दशावतार पाहण्याची आता माझ्यात ताकद नाही! रात्री प्यालेल्या दारूची घाण अजून ज्याच्या तोंडाभोवती घोटाळत आहे, त्यानं मला दारू सोडण्याचा उपदेश करावा! जोडयाजवळ उभं राहण्याची ज्याची लायकी नाही त्यानं जोडयानं माझं मोल करावं? जिथं कवडी किमतीच्या कंगालांनी माझी पैजारांनी पायमल्ली केली, तिथं सद्गुणी मनुष्याची सहानुभूती मला कशी मिळणार? दारूबाज दोस्तांनी लाथाडलेलं हे थोबाड आता कुणाला कसं दाखवू? माझं उपाशी बाळ, काबाडकष्ट उपसणारी सिंधू- यांच्यापुढं कोणत्या नात्यानं जाऊन उभा राहू? बेवकूब बाप- नालायक नवरा- मातीमोलाचा मनुष्य- दीडदमडीचा दारूबाज- देवा, देवा, कशाला या सुधाकराला जन्माला घातलंस, आणि जन्माला घालून अजून जिवंत ठेवलंस? मी काय करू? कुठं जाऊ? या जगातून बाहेर कसा जाऊ? कोणत्या रूपानं मृत्यूच्या गळयात मगरमिठी मारू? पण सुदृढ मनालासुध्दा आत्महत्येसाठी मृत्यूच्या उग्र रूपाकडे पाहताना भीती वाटते. मग दारूबाज दुबळया मनाला एवढं धैर्य कुठून येणार? दारूबाजाच्या ओळखीचं मृत्यूचं एकच रूप म्हणजे दारू! तडफडणार्‍या जिवाच्या जाचण्या बंद करण्याचा दारूखेरीज आता मार्ग नाही! मुलासकट माणुसकीला, सिंधूसकट संसाराला, सद्गुणांसकट सुखाला, जगासकट जगदीश्वराला, सुधाकराचा हा निर्वाणीचा निराशेतला शेवटचा प्रणाम! आता यापुढं एक दारू- प्राण जाईपर्यंत दारू- शेवटपर्यंत दारू! (जातो. पडदा पडतो.)