Get it on Google Play
Download on the App Store

अंक चवथा - प्रवेश पहिला

(स्थळ: रामलालचा आश्रम. पात्रे: शरद व रामलाल.)

शरद - इतका वेळ बसून भगीरथानी बहुतेक सर्वच सर्ग समजावून दिला; पण या श्लोकावर ते थांबले! मग खरंच काम होतं, का श्लोक अडला म्हणून ते चालते झाले, कुणास कळे!

रामलाल - कोणता श्लोक?

शरद - हा, 'मरणं प्रकृति: शरीरिणाम्...

रामलाल - वा:, फारच रमणीय श्लोक! काव्याच्या ऐन उत्कर्षात भगवान् कालिदासांनी इथं तत्त्वज्ञानाचा परमावधि साधलेला आहे! दशावतारांतला श्रीकृष्णाचा आठवा अवतार आणि रघुवंशातला हा आठवा सर्ग, मला नेहमी समानस्वरूपाचे वाटतात. त्या अवताराचा पूर्वार्ध राधाकृष्णांच्या लीलाविलासांनी परिपूर्ण, तर उत्तरार्धात योगेश्वर कृष्ण गीतेसारखी उपनिषदं गात आहेत! इकडे या सर्गाच्या प्रारंभी भौतिकभाग्याची समृध्दी असून पुढं करुणरसात उतरून परमवैराग्यात शेवट झालेला आहे. भारतवर्षीय राजर्षीच्या सात्त्वि संसाराचं संपूर्ण चित्र या एकाच सर्गात कविकुलगुरूनं रेखाटलं आहे! ऐक, तुझ्या श्लोकाचा अर्थ- 'मरणं प्रकृति: शरीरिणाम्'- मरण हा सदेह प्राणिमात्राचा स्वभाव आहे; 'विकृतिर्जीविमुच्यते बुधै:'- जिवंत राहणं हे सुज्ञ लोकांना अपवादरूप वाटतं! 'क्षणमप्यवतिष्ठते श्वसन' आणि म्हणून क्षणभरच जरी जीवित लाभलं, तरी 'यदि जन्तुर्न तु लाभवानसौ'- तो प्राणी भाग्यशाली नाही काय? जीवमात्राचा जन्म केवळ एकरूप आहे; परंतु मरणाला हजार वाटा आहेत. एवढयासाठीच या संसाराला मृत्यूलोक म्हणतात! परिस्थितीकडे विचारपूर्वक पाहिलं तर मरणाच्या इतक्या हजारो कारणांतून आपण क्षणमात्र तरी कसे वाचतो, याचं प्रत्येकाला मोठं आश्चर्य वाटेल! आणि म्हणून इथं म्हटलं आहे की, पदरात पडलेल्या पळापळाबद्दल आनंद मानून भावी कलाकडे आपण उदासीन दृष्टीनंच पाहिलं पाहिजे!

शरद - श्वासमात्रानं जगण्याचा जो क्षण लाभेल त्याबद्दल आनंद मानावा, हे कवीचं म्हणणं तुम्हाला खरं वाटत असेल कदाचित! पण भाईसाहेब, असे दु:खीकष्टी जीव या जगात किती तरी सापडतील, की ज्यांना शंभर वर्षांचं दीर्घायुष्यसुध्दा शापासारखं वाटेल!

रामलाल - (स्वगत) हिंदू समाजातल्या बालविधवेच्या या प्रश्नाला कालिदासाच्या बुध्दीमत्तेनंसुध्दा उत्तर देणं शक्य नाही! (उघड) शरद, सुदृढ आणि उदार विचारशक्तीनं ज्या वेळी समाज सर्व कार्य करीत होता आणि धीरगंभीर नीतिमत्ता ज्या वेळी क्षुद्रवृत्ती झालेली नव्हती, त्या कालाला कालिदासाची ही उक्ती समर्पक होती! त्या वेळी जीविताचा प्रत्येक क्षण सुखमय होता! हाच सर्ग पाहा! किती रमणीय सुखाचं वर्णन आहे यात! यातलं इंदूमतीचं मरणसुध्दा मनोहर आहे! दिव्य सौंदर्यालाच मुक्ती देण्यासाठी या आर्य कवीनं स्वर्गातल्या पारिजात पुष्पासारख्या कोमल शस्त्राची योजना केली आहे आणि आज राक्षसी रूढीच्या आहारासाठी असली नाजूक फुलं तापल्या तव्यावर परतून घेण्याची नीतिमत्ता निर्माण झाली आहे! शरद, तुझ्यासारखी सुंदर बालिका वैधव्याच्या यातना भोगताना पाहिली म्हणजे आर्यावर्ताच्या अवनत इतिहासाची दीन मूर्तीच आपल्यापुढं उभी आहे, असं वाटायला लागतं! सौंदर्य कोणत्याही स्थितीत आपली नाजूक शोभा सोडीत नाही! सौंदर्याला वैधव्याचा अलंकारसुध्दा करुण शोभाच देतो! शरद, पुनर्विवाहाबद्दल आम्ही तुला सर्वजण आग्रह करीत असताही (तिच्या पाठीवरून हात फिरवीत) बेटा, अजून तुला- (स्वगत) हिच्या अंगाचा स्पर्श होताच माझ्या हातावर असा खरखरीत काटा का बरं उभा राहिला? हा अनुभव अगदी नवीन- पण नको हा अनुभव! माझा हात सारखा थरथर कापत आहे! (तिच्या पाठीवरून हात काढतो. शरद रामलालकडे पाहते.) अशा चमत्कारिक दृष्टीनं का पाहतेस माझ्याकडे? बेटा, तुझ्या बापानं तुझ्या पाठीवर असा हात ठेवला नसता का?

शरद - हाच हात ठेवला असता; पण असा चपापून काढून घेतला नसता! भाईसाहेब, तुम्हाला तुमच्या मनात विकल्प आल्यासारखं वाटलं! असं काहीतरी भलतंच तुम्हाला वाटलं! भाईसाहेब, खरं सांगा. काही तरी वेडंबिद्रं मनात आलं ना? बोला हो-

रामलाल - तुझ्याजवळ खोटं मी अजून कधी सांगितलं नाही; माझ्या मनात वेडंवाकडं काहीएक आलं नाही! मनाला जरासं असं मात्र वाटलं-

शरद - की, जसं बापाला मुलीच्या पाठीवरून हात फिरविताना वाटत नाही, किंवा भावाला बहिणीच्या पाठीवरून हात फिरविताना वाटत नाही!

रामलाल - शरद, शरद, असं तीव्र भाषण करू नकोस.

(राग- मालकंस; ताल- झपताल. चाल- त्याग वाटे सुलभ.)
सोडि नच मजवरी वचनखरतशरा । दग्ध करिसी तये हाय । मम अंतरा ॥धृ०॥
स्मृति काय पूर्वीची । लोपली आजची । केवि तव मति रची । कल्पना भयकरा ॥१॥

ईश्वरसाक्ष सांगतो की, भलती भावना माझ्या मनात मुळीच आली नाही! का कुणाला ठाऊक, मला जरा- अगदी नाहीच म्हणेनास- जरा चोरटयासारखं मात्र झालं!

शरद - आता माझ्यापासून काही चोरून- स्वत:पासून काही चोरून ठेवू नका!

(राग- जीवनपुरी; ताल- त्रिवट. चाल- पिहरवा जागो रे.)
खर विषा दाहाया हृदया या का वर्षिता ॥धृ०॥
जे स्रवत सुधा । वदन हे सदा । हलाहल ते वमते आता ॥१॥

भाईसाहेब, होऊ नये ते झालं! आज माझा आधार तुटला! माझे बाबा वारले तेव्हापासून दादांनी मला सांभाळली! त्या दिवशी दादानं- माझं नशीबच फुटलं हो! तिथून तुम्ही मला सांभाळलं! आज देवानं माझ्यावर अशी वेळ आणली! भाईसाहेब, इतके दिवस या जगात तुम्ही माझ्याजवळ बापासारखे उभे होता! तुमच्या जिवावर मी निर्भयपणानं वागत होते! आणखी आज असं- भाईसाहेब, बाबा वारले त्या वेळी मला कळत नव्हतं म्हणून मी रडले नाही! तेवढयासाठी आज देवानं ते संकट माझ्यावर पुन्हा आणून मला जाणतेपणानं रडायला लावलं! आज मी पोरकी झाले!

(राग- बेहागडा; ताल- त्रिवट. चाल- चरावत गुंय्यां.)
जगी हतभागा । सुखी चिर असुख ॥धृ०॥
जनके त्यजिता । लाधे दुसरा । ये विनाश त्या । माते जधि विधी विमुख ॥१॥

रामलाल - शरद, काय हे वेडयासारखं करतेस? नुसता माझा हात - तुझ्या मानलेल्या बापाचा- तुझ्या अंगाला लागताच-

शरद - नाही हो! रामलाल, हा बापाचा हात नाही! मुलीला बापाचा हात अगदी आईच्या हातासारखाच- जरासा राकट- देवाच्या पाषाणमूर्तीच्या हाताइतका राकट असतो! तुमचा हात बापाचा हात नव्हता! हा पुरुषाचा हात होता! मुलीच्या दृष्टीला बाप पुरुषासारखा दिसत नाही; तर देवासारखा निर्विकार दिसतो! बापासमोर मुलगी मोकळेपणानं वागते! आज माझा तो मोकळेपणा नाहीसा झाला! आज माझे वडील मला अंतरले! आज तुम्ही माझ्यासमोर तरुण पुरुष म्हणून उभे आहात आणि मी तुमच्यासमोर तरुण स्त्री म्हणून उभी आहे! स्त्रीनं पुरुषासमोर वागताना सावधगिरीनं राहायला पाहिजे. भाईसाहेब, आजपर्यंत तुमच्या जिवावर जगातल्या पुरुषांत मी सुरक्षितवृत्तीनं वावरत आले! आज माझा सांभाळ करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली! भाईसाहेब, मी आता विश्वासानं कुणाच्या तोंडाकडे पाहू हो?

रामलाल - काय? एवढयानंसुध्दा तुझा माझ्यावरचा विश्वास उडाला?

(राग: वसंत; ताल- त्रिवट. चाल- जपिये नाम जाकोजी.)
गणिसी काय खल माते, अलंकार केवळ कुजनांते । न विश्वासलव योग्य जयाते ॥धृ०॥
वद का स्मरसी चिरसहवासी । घडली कृती अनुचित या हाते । जनकधर्म कधी त्यजि काय सुते ॥१॥

शरद - एका क्षणात उभ्या जन्माचा विश्वास उडाला! भाईसाहेब, बायकांच्या मनात धास्ती बसायला वेळ लागत नाही! पदराच्या वार्‍यानंसुध्दा बायकांचं हृदय हादरायला लागतं!

(राग- गरुडध्वन; ताल- त्रिवट. चाल- परब्रह्ममो रघु.)
ललनामना नच अघलवशंका अणुहि सहते कदा ॥धृ०॥
सृजनि त्याच्या विधी तरल घे विमल प्रकृतिसी पुण्य परम॥1॥

भाईसाहेब, जाते मी आता. माझ्यानं तुमच्यासमोर उभं राहवत नाही!

रामलाल - थांब शरद, आण तो 'रघु' इकडे! त्यातले चार श्लोक वाच म्हणजे झालेल्या प्रकाराबद्दल तुझ्या मनाला अंमळ विसर पडेल!

शरद - आता वाचणं नको, काही नको! काही केल्या माझ्या मनातली भीती मोडायची नाही! तुमच्याकडे पाहायचासुध्दा मला धीर होत नाही! जाते मी आता! देवा, काय रे केलेस हे (जाऊ लागते.) हे पाहा, भगीरथाच्या बरोबर मी दादाच्या घरी एकदा-

रामलाल - भगीरथ कशाला? मीसुध्दा- तुझी तशी इच्छा असेल तर तुला घेऊन जाईन तिकडे. पण थांब. शरद, तुला एक विनंती करायची आहे.

शरद - काय? सांगा लवकर.

रामलाल - ही हकीकत कुणाजवळ- भगीरथाजवळसुध्दा- बोलणार नाहीस ना?

शरद - नाही.भगीरथांना नाही का ऐकून वाईट वाटणार? (जाते.)

रामलाल - माझ्या मनाची काय स्थिती झाली ती माझी मलाच कळत नाही! काय भलतंच झालं हे! शरद, मी खरोखरीच अपराधी आहे किंवा नाही, हे नीट समजून घेतल्यावाचून तू विनाकारण दोष दिलास- पण तिनं दोष का देऊ नये? माझं मन खरंच चलित झालं आहे की- छे:, मला काहीच सुचेनासं झालं आहे! परमेश्वरा, माझा मार्ग मला नीटपणे दाखवायला तुझ्याखेरीज दुसरा कोण समर्थ आहे? (जातो.)