Get it on Google Play
Download on the App Store

अंक दुसरा - प्रवेश तिसरा

(स्थळ: आर्यमदिरामंडळ. पात्रे, तळीराम, भाऊसाहेब, बापूसाहेब, रावसाहेब, सोन्याबापू, मन्याबापू, जनूभाऊ, शास्त्री, खुदाबक्ष, मगनभाई, वगैरे वगैरे... हुसेन सर्वांना पेले भरून देत आहे. मंडळींचे खाणे चालले आहे.)

हुसेन - सुधाकरसाहेब- (पेला पुढे करतो.)

सुधाकर - हुसेन, मला नको आता!

शास्त्री - वा:, सुधाकर, नको म्हणजे काय गोष्ट आहे? घेतला पाहिजे!

सुधाकर - पण मला अगदी आटोकाट बेताची झाली आहे! आता पुरे!

खुदाबक्ष - नाही सुधाकर, मंडळींचा बेरंग होतो आहे!

बापूसाहेब - घ्याहो, सुधाकर! उद्या तुमची सनद तुम्हाला परत मिळणार आणि आज तुम्ही असं चोरटं काम चालविलं आहे?

रावसाहेब - तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे- आणखी आमचं सांगणं मोडायचं? वा:, मग झालंच म्हणायचं.

सुधाकर - हं, आण बाबा तो पेला! आता मात्र हा शेवटचा हं! (पितो.)

शास्त्री - अहो, आम्ही तुमचे खरे मित्र आणि आमच्याबाहेर वागता तुम्ही? आम्ही तुमच्या आयत्यावेळी उपयोगी पडलो! आणि तुमचे दोस्त म्हणविणारे तुमची सनद गेल्यामुळं तुमची कुचेष्टा करायला लागले आणि सनद गेल्यामुळं तुम्ही दारू पिण्याला सुरुवात केली म्हणून गावभर तुमची निंदा करीत सुटले.

खुदाबक्ष - आता उद्या सनद सुरू होताच त्यांना जबाब द्या.!

सुधाकर - नुसता जबाब द्या! भर कचेरीत खेटरानं एकेकाची पूजा करतो. पाजी लोक!

तळीराम - नाही, नाही. दादासाहेब. उद्या त्या लोकांच्या नाकावर टिचून दारू पिऊनच कचेरीत हजर व्हा! घ्या खबर गुलामांची!

सुधाकर - हो, मी दारू पिऊन कचेरीत जाऊ शकतो! उद्या दारू पिऊन कचेरीत जातो आणि घेतो हातात पायातला! हिंमत आहे माझी!

जनूभाऊ - शाबास, जरूर दारू पिऊन जा!

रावसाहेब - तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे- तुमच्या जिवासाठी जीव देऊ! दारू पिऊनच कचेरीत जा! मग सनद कायमची रद्द झाली तरी हरकत नाही! तुम्हाला वाटेल तितक्या आम्ही नोकर्‍या देऊ! हे घ्या वचन! तुम्हाला गरज पडेल त्या वेळी तुम्हाला वाटेल तेव्हढी मोठी नोकरी लावून देण्याचं मी तुम्हाला वचन देतो! भाऊसाहेब, बापूसाहेब. आपणही त्यांना वचन द्या. (सर्व सुधाकरला वचन देतात.)

शास्त्री - सुधाकर, आता माघार घ्यायची नाही!

सुधाकर - माघार घ्यायची मला हिंमत नाही! मी आता कचेरीत जायला तयार आहे!

खुदाबक्ष - बस्स, बस्स, शास्त्रीबुवा! आता असंच करायचं, की सर्वांनी उद्या कचेरीची वेळ होईपर्यंत असं सारखं पीतराहायचं आणि सुधाकराला तसाच कचेरीत पोहोचवायचा!

शास्त्री - पसंत आहे ही कल्पना!

तळीराम - हुसेन, दादासाहेबांना दे एक प्याला आणखी!

हुसेन - हा जी साहेब! (पेला देतो.)

सुधाकर - आता नको. मी बेशुध्द होईन!

जनूभाऊ - आम्ही जिवाला जीव देऊ तुमच्यासाठी! आम्ही पण बेशुध्द होऊ!

सुधाकर - नको, आता नको आहे. मला हिंमत आहे- मी पिऊ शकतो!

तळीराम - दादासाहेब, आता हा खास शेवटचा- हं, हा एकच प्याला! (सुधाकर पितो व गुंगत पडतो. सर्वांचे पेले तयार होतात. इतक्यात रामलाल व भगीरथ एका बाजूने येतात.)

रामलाल - (भगीरथास एकीकडे) हं भगीरथ, थोडा वेळ इथं बाजूला उभे राहू, आणि मंडळी जरा रंगात आली, की आपणही होऊ सामील!

भगीरथ - (रामलालास एकीकडे) आपल्याला यायला फार वेळ झाला आज!

मन्याबापू - (मोठयाने रडायला लागतो.) जनूभाऊ, अरे इकडे ये! (जनूभाऊच्या गळयाला मिठी मारून मोठयाने रडायला लागतो.)

जनूभाऊ - अरे, रडतोस का मन्याबापू असा!

मन्याबापू - मला जास्त चढली आहे!

जनूभाऊ - मग काय करू म्हणतोस?

मन्याबापू - मला आणखी पाज!

जनूभाऊ - हं ही घे. (मन्याबापू पितो व पुन्हा रडू लागतो.) अरे, आता का रडतोस?

मन्याबापू - मला जास्त चढत नाही!

जनूभाऊ - मग मर (जनूभाऊ स्वत: पितो.)

रामलाल - (भगीरथास एकीकडे) भगीरथ, पाहा या एकमेकांच्या लीला! आश्चर्याने माझ्याकडे पाहता भगीरथ? एका कार्यासाठी मघाशी तुमच्याजवळ खोटं बोललो त्याची मला क्षमा करा. मी मद्यपी नाही! माझ्या एका मित्राला- जो या शहराची केवळ शोभा- त्याला- सुधाकराला इथून परत नेण्यासाठी म्हणून मी तुमच्याबरोबर आलो. तुमची फसवणूक केली याबद्दल मला क्षमा करा.

मन्याबापू - दारू ही खराब चीज आहे! दारू ही भिकार वस्तू आहे. दारू ही वाईट गोष्ट आहे.

जनूभाऊ - मन्या! काय बडबडतो आहेस हे!

मन्याबापू - मी चळवळ करतो आहे! मद्यपाननिषेध करीत आहे.

जनूभाऊ - निषेध करू नकोस! मद्यपान कर!

मन्याबापू - दारू ही खराब चीज आहे, दारू हे मद्यपान आहे, दारू हा निषेध आहे, दारू ही चळवळ आहे!

जनूभाऊ - मन्या, मन्या, सांभाळ. भडकत चाललास!

मन्याबापू - दारू- आहे! दारू अशुध्द आहे!

जनूभाऊ - तीर्थोदकं च वन्हिश्च नान्यत: शुध्दिमर्हत:! वहातं पाणी किंवा अग्नी ही जात्या शुध्द असतात. दारूचा प्रचंड ओघ चारी खंडांत वाहतो आहे आणि तिच्या पोटी आग आहे. दारू दुहेरी शुध्द आहे. हे धर्मवचनावरून सिध्द होत आहे!

मन्याबापू - दारू अधर्म आहे. दारू धर्मबाह्य आहे!

जनूभाऊ - मद्यपानाला प्रायश्चित्तही आहे! रात्री दारू पिऊन सकाळी ब्राह्मणाला एक काशाचं भांडं दान केलं म्हणजे पाप राहात नाही! आता जर तोंड बंद केलं नाहीस, तर तुला प्रायश्चित्त भोगावं लागेल.

मन्याबापू - दारूमुळं आपापसात कलह माजतात-तंटे माजतात.

जनूभाऊ - मन्या! नरडं दाबून जीव घेईन आता. दारूमुळे जन्माची वैरं बंद होतात, दारूच्या दरबारात आग आणखी पाणी सलोख्यानं संसार करतात.

मन्याबापू - दारूमुळं मनुष्य असंबध्द बडबडू लागतो!

जनूभाऊ - साफ खोटं आहे! मी मघापासून असंबध्द बडबडतो आहे.

जनूभाऊ - तू मुळीच असंबध्द बडबडत नाहीस.

मन्याबापू - मी खरं बडबडतो आहे. दारू वाईट आहे, असं मी बडबडतो आहे!

जनूभाऊ - मुळीच नाही! दारू चांगली आहे, असं तू म्हणतो आहेस. दारू वाईट आहे, असं कबूल करतोस की नाही बोल?

मन्याबापू - नाही म्हणायचं तसं. दारू चांगली आहे!

शास्त्री - अरे, बोलण्याच्या गडबडीत तुम्ही आपल्या बाजू बदलून लढता आहात!

जनूभाऊ - असं का? ठीक आहे! चल मन्या, पुन्हा आपापल्या बाजू घेऊन पहिल्यापासून लढू! (एकमेकांच्या गळयात मिठया मारून थोडा वेळ दोघेही रडतात.)

रामलाल - भगीरथ, प्रेमभंगाचा ताप चुकविण्यासाठी, या गोठणीवर येऊन तुम्ही विसावा घेता? (सोन्याबापू रडू लागतो.)

खुदाबक्ष - का सोन्याबापू, तुम्ही का रडायला लागलात?

सोन्याबापू - दारूच्या सद्गुणांचं केवढं उदात्त चित्र हे! अरेरे, याचा फायदा घेऊन पुरुषांप्रमाणेच आमच्या स्त्रीवर्गाला आपली उन्नती करून घेता येत नाही, हे केवढं दुर्भाग्य आहे!

जनूभाऊ - सोन्याला कंठ फुटला वाटतं हा! या सुधारकांना प्रत्येक बाबतीत बायकांचे देव्हारे माजविण्याची मोठी हौस! कसला रे कपाळाचा स्त्रीवर्ग? यामुळेच या सुधारकांची चीड येते!

सोन्याबापू - खुदाबक्ष, अबलांचा अन्याय होतो आहे! तुम्ही अविंध आहात! यवन आहात! मुसलमान आहात! स्त्रीजातीचा काही अभिमान धरा!

खुदाबक्ष - बायकांना आत्मा नसतो!

जनूभाऊ - भले शाबास! खांसाहेब, खाशी खोड मोडलीत! बायकांचे चोचले माजविल्यामुळं या सुधारकांचा सारखा वीट येत चालला आहे! खरं की नाही शास्त्रीबुवा?

शास्त्री - नाही, माझा सुधारकांच्यावर कटाक्ष या मुद्दयावर नाही! सुधारणेच्या नावाखाली सुधारकांनी जो सावळागोंधळ मांडला आहे, धर्माचा जो उच्छाद मांडला आहे, तो आम्हाला नको आहे! सुधारणेचे नाव सांगून उद्या तुम्ही जर अपेयपान करू लागलात, अभक्ष्य भक्षण करू लागलात, सुधारक म्हणून मांसाहार करू लागलात- खुदाबक्ष, आज मटण शिजलं आहे चांगलं नाही?- तुम्ही जर खाण्यापिण्याचा ताळ सोडू लागलात, तर ते आम्हा जुन्या लोकांना कधी खपायचं नाही. मांसाहार कधी खपायचा नाही- अरे हुसेन, आणखी आण मटण ... थोडं. आगरकरांचा तिटकारा येतो तो या कारणानं! टिळकांबद्दल आम्हाला आदर वाटतो तो या कारणामुळं!

सोन्याबापू - मग टिळकांच्या गीतारहस्याबद्दल एवढी आरडाओरड का माजली आहे ती? (शास्त्री बुचकळयात पडतो.)

खुदाबक्ष - मी सांगतो त्याचं कारण. एरव्ही टिळकांच्याबद्दल आम्हाला आदर आहे; पण गीतारहस्यात टिळकांनी श्रीमंत शंकराचार्यांना छेडले आहे. त्यांनी आर्यधर्माच्या ऐन गड्डयाला हात घातला आहे! सनातनधर्माची ही हानी आहे, म्हणून ...

शास्त्री - भले शाबास (त्याच्या गळयाला मिठी मारतो.) खुदाबक्ष, आज तू सनातन आर्यधर्माची बाजू राखलीस! आज मी मुसलमान झालो! अरे, कोणी शेंडी उपटून ती हनवटीखाली चिकटवून मला दाढीदीक्षित करा! खुदाबक्ष, आज आपण पगडभाई झालो! (पगडयांची अदलाबदल करू लागतात.)

रामलाल - अरेरे, भगीरथ, संस्काराने पवित्र मानलेल्या आपापल्या धर्मासाठी पूर्वीच्या हिंदू-मुसलमानांचं वैरसुध्दा या नरपशूंच्या स्नेहापेक्षा जास्त आनंददायक वाटतं. कुठं पवित्र योग्यतेचा गीतारहस्य ग्रंथ, कुठं श्रीशंकराचार्य, कुठं सनातनधर्म आणि कुठं हे रौरवातले कीटक! आगरकर आणखी टिळक या महात्म्यांचा परस्परविरोध म्हणजे आकाशातल्या नक्षत्रांच्या शर्यती! तुमच्या-आमच्यासारख्या पामरांनी भूलोकावरूनच त्यांच्याकडे पहावं, आणखी त्यांच्या तेजानं आपला मार्ग शोधून काढावा! शूचिर्भूत ब्राह्मणांनासुध्दा संध्येच्या चोवीस नावांबरोबरच टिळक-आगरकर यांची नावं भरतीला घालावी, भगीरथ पाहा, या कंगालांचा किळसवाणा प्रकार! भगीरथ, भगीरथ, पुरे झाला हा प्रसंग!

भगीरथ - रोज सुरुवातीपासून यांच्याबरोबर पीत गेल्यामुळं हा सर्वस्वी निंद्य प्रकार माझ्या कधीही लक्षात आला नाही.

रामलाल - भगीरथ, पाहा या प्रेतांच्याकडे! यांच्याबरोबर तुम्ही दारू पिऊन बसता? हतभागी महाभागा, तू ताज्या रक्ताचा तरुण आहेस, तीव्र बुध्दीचा आहेस, थोर अंत:करणाचा आहेस, रोमारोमात जिवंत आहेस आणि म्हणूनच तुझ्यासाठी अंतरात्मा तळमळून मी बोलतो आहे. संसारात प्रेमभंग झाला म्हणून तू या दारूच्या व्यसनाकडे वळलास? एकोणीसशे मैल लांबीचा आणि अठराशे मैल रुंदीचा, नाना प्रकारच्या आपदांनी भरलेला, हजारो पीडांनी हैराण झालेला, तुझा स्वदेश तेहतीस कोटी केविलवाण्या किंकाळयांनी तुला हाका मारीत प्रेमभंगामुळं अनाठायी पडलेलं जीवित सार्थकी लावायला तुला दारूखेरीज दुसरा मार्गच सापडला नाही का? असल्या प्रेमभंगानं स्वार्थाच्या संसारातून तुला मोकळं केल्याबद्दल, तुझ्या जन्मभूमीची अशा अवनतकाली सेवा करायची तुला संधी दिल्याबद्दल भाग्यशाली भगीरथ, आनंदाच्या भरात परमेश्वराचे आभार मानायच्या ऐवजी तू वैतागून दारू प्यायला लागलास, आणखी या नरपशूंच्या पतित झालास? पवित्र आणखी प्रियतम गोष्टींना संकटकाली साहाय्य करण्याचं भाग्य पूर्वपुण्याई बळकट असल्याखेरीज प्राणिमात्रांना लाभत नाही. पतितांच्या उध्दारासाठी, साधूंच्या परित्राणासाठी वारंवार अवतार घेण्याचा मोह प्रत्यक्ष भगवंतालासुध्दा आवरत नाही. भगीरथ, दीन, हीन, पंगू, अनाथ, अशी ही आपली भारतमाता तुम्हा तरुणांच्या तोंडाकडे आशेने पाहात आहे. पाणिग्रहणांवाचून रिकामा असलेला तुझा हात- चुकलेल्या बाळा, जन्मदात्री स्त्रीजात गुलामगिरीत पडली आहे, लक्षावधी निरक्षर शूद्र ज्ञानप्राप्तीसाठी तळमळत आहेत, साडेसहा कोटी माणसांसारखी माणसं नुसत्या हस्तस्पर्शासाठी तळमळत आहेत, या बुडत्यांपैकी कोणाला तरी जाऊन हात दे-

(राग- अडाणा, ताल- त्रिवट, चाल- सुंदरी मोरी का.)
झणी दे कर या दीना । प्रेमजलातुर मृतशा दे जल ते या मीना ॥धृ०॥
वांछा तरी उपकारमधूच्या । या करि संतत पाना ॥१॥

भगीरथ - रामलाल, भगीरथाला पुनर्जन्म देणार्‍या परमेश्वरा, मी अजाण आहे, रस्ता चुकलो आहे; यापुढं मला मार्गदर्शक व्हा. आजपासून हा भगीरथ भारतमातेचा दासानुदास झाला आहे.

शास्त्री - भगीरथ, काय गडबड आहे? तळीराम, भगीरथाला दे! (तळीराम पेला भरतो.)

भगीरथ - मित्रहो, माझ्याकरता हे कष्ट घेऊ नका. आजपासून हा भगीरथ तुम्हाला आणि तुमच्या दारूला पारखा झाला.

तळीराम - भगीरथ, काय भलतंच मांडलं आहेस हे? अरे मंडळींच्या आग्रहाखातर- फार नको फक्त एवढा एकच प्याला! बस्स, एकच प्याला!

भगीरथ - (पेला जमिनीवर पाडून) एकच प्याला! एकच प्याला!

अंक दुसरा समाप्त.

© Wiseland Inc. No content on this website may be reproduced without prior permission from us or the respective authors/rights owners. In year 2018 we sent 14 legal notices to violators to protect our intellectual property. Any DMCA take down notices must be sent to dmca@bookstruck.app.

Privacy and Terms | Sadhana108 | Contact Us | Marathi Community | New Interface