गीताई अध्याय बारावा
अर्जुन म्हणाला
असे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती । कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते ॥ १ ॥
श्री भगवान् म्हणाले
रोवूनि मन माझ्यात भजती नित्य जोडिले । श्रद्धेने भारले माझ्या ते योगी थोर मानितो ॥ २ ॥
परी अचिंत्य अव्यक्त सर्व-व्यापी खुणेविण । नित्य निश्चळ निर्लिप्त जे अक्षर उपासती ॥ ३ ॥
रोधिती इंद्रिये पूर्ण सर्वत्र सम जाणुनी । माझ्या कडे चि ते येती ज्ञानी विश्व-हिती रत ॥ ४ ॥
अव्यक्ती गोविती चित्त क्लेश त्यांस विशेष चि । देहवंतास अव्यक्ती सुखे बोध घडे चि ना ॥ ५ ॥
परी जे सगळी कर्मे मज अर्पूनि मत्पर । अनन्य भक्ति-योगाने भजती चिंतुनी मज ॥ ६ ॥
माझ्यात रोविती चित्त त्यास शीघ्र चि मी स्वये । संसार-सागरांतूनि काढितो मृत्यु मारुनी ॥ ७ ॥
मन माझ्यात तू ठेव बुद्धि माझ्यात राख तू । म्हणजे मग निःशंक मी चि होशील तू स्वये ॥ ८ ॥
जाईल जड माझ्यात चित्तास करणे स्थिर । तरी अभ्यास-योगाने इच्छूनि मज मेळवी ॥ ९ ॥
अभ्यास हि नव्हे साध्य तरी मत्कर्म आचरी । मिळेल तुज ती सिद्धि मत्कर्म हि करूनिया ॥ १० ॥
न घडे हे असे कर्म योग माझ्यात साधुनी । तरी सर्व चि कर्माचे प्रयत्ने फळ सोड तू ॥ ११ ॥
प्रयत्ने लाभते ज्ञान पुढे तन्मयता घडे । मग पूर्ण फल-त्याग शीघ्र जो शांति देतसे ॥ १२ ॥
कोणाचा न करी द्वेष दया मैत्री वसे मनी । मी माझे न म्हणे सोशी सुख-दुःखे क्षमा-बळे ॥ १३ ॥
सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढ-निश्चयी । अर्पी मज मनो-बुद्धि भक्त तो आवडे मज ॥ १४ ॥
जो न लोकांस कंटाळे ज्यास कंटाळती न ते । हर्ष शोक भय क्रोध नेणे तो आवडे मज ॥ १५ ॥
नेणे व्यथा उदासीन दक्ष निर्मळ निःस्पृह । सोडी आरंभ जो सारे भक्त तो आवडे मज ॥ १६ ॥
न उल्लासे न संतापे न मागे न झुरे चि जो । बरे वाईट सोडूनि भजे तो आवडे मज॥ १७ ॥
सम देखे सखे वैरी तसे मानापमान हि । शीत उष्ण सुखे दुःखे करूनि सम मोकळा ॥ १८ ॥
निंदा स्तुति न घे मौनी मिळे ते गोड मानितो । स्थिर-बुद्धि निराधार भक्त तो आवडे मज ॥ १९ ॥
जे धर्म-सार हे नित्य श्रद्धेने मी चि लक्षुनी । सेविती ते तसे भक्त फार आवडती मज ॥ २० ॥
अध्याय बारावा संपूर्ण