सातारा
सातारा हे शहर महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात येते. सातारा हे नाव शहराला त्या भोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे पडले आहे.हे शहर समुद्रसपाटीपासून २,३२० मी. उंचीवर कृष्णा-वेण्णेच्या संगमावर वसले आहे. हे शहर पुणे-बंगळुर महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे.
सातारा शहर इतिहासात मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. १७०८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सातारा शहरात झाला. त्यानंतर मराठा राज्याच्या अखेरपर्यंत सातारा शहर मराठ्यांची राजधानी होते. त्यामुळे सातारा शहराला शाहूनगरी म्हणूनही ओळखले जाते.
सातारा शहरचे जगाच्या नकाशावरचे स्थान १७.६९१३९° उत्तर अक्षांश, ७४.०००७२° पूर्व रेखांश असे आहे. सातारा शहर अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. सातारा शहराच्या दक्षिणेकडे अजिंक्यतारा, उत्तरेकडे पेढयाच्या भैरोबाची टेकडी, पश्चिमेकडे यवतेश्वराचा डोंगर व पूर्वेकडे जरंडेश्वराचा डोंगर या टेकड्यांनी वेढले आहे.
शहराजवळून कृष्णा व वेण्णा या नद्या वाहतात. माहुली इथे या दोन्ही नद्यांचा संगम होतो. सातारा शहराच्या पश्चिमेकडील कासचे पठार वनौषधींसाठी प्रसिद्ध आहे. शहरातून ह्याच टेकडीकडे पाहिल्यास मृत ज्वालामुखीचे मुख दिसते. सातारा शहराच्या पश्चिमेकडे असणारी ही डोंगराची रांग पश्चिमघाटात मोडते. त्यामुळे साताऱ्यात पावसाचे प्रमाण खूप आहे.
साताऱ्यात प्रतिवर्षी साधारण १००० मिलीमीटर एवढा पाऊस पडतो.
शैक्षणिक
सातारा शहर म्हणल्यास लगेच आठवतात कर्मवीर भाऊराव पाटील! कर्मवीरांनी सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय साताऱ्यात आहे. रयत शिक्षण संस्थेची अनेक शाळा-महाविद्यालये शहरात आहेत. सयाजीराव हायस्कूल, इस्माइल मुल्ला विधि- महाविद्यालय, य़शवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ही त्यातील काही उल्येखनीय नावे. रयत शिक्षण संस्थेशिवाय सातारा शिक्षण संस्थेचे सातारा पॉलिटेक्निक व अनंत इंग्लिश स्कूल, डेक्कन शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची कन्याशाळा ह्या नावाजलेल्या संस्था आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी कमवा आणि शिका हा मंत्र साताऱ्यातच शिकवला. सातारा शहर देशात येथील सैनिक स्कूलमुळे ओळखले जाते.. २३ जून १९६१ मध्ये साताऱ्यात भारतातल्या पहिल्या सैनिक स्कूलची स्थापना झाली. येथील अनेक विद्यार्थ्यांनीं राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवला आहे. आर्यांग्ल आर्युवेदिक महाविद्यालय येथे वैद्यकीय व नर्सिंगचे अभ्यासक्रम चालवले जातात.